Fish Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Pond : मत्स्य तळ्यातील स्थानिक माशांचे नियंत्रण

Fish Seeds : मत्स्यबीज सोडण्यापूर्वी तळ्यातील तण किंवा पाणवनस्पतींचे निर्मूलन आणि तळ्यातील स्थानिक, निकृष्ट किंवा संहारक मासे नष्ट करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

बालाजी पवार

Fish Management : मत्स्यबीज सोडण्यापूर्वी तळ्यातील तण किंवा पाणवनस्पतींचे निर्मूलन आणि तळ्यातील स्थानिक, निकृष्ट किंवा संहारक मासे नष्ट करणे आवश्यक आहे. तळ्यात आधीच वाढलेल्या मत्स्यभक्षक माशांची पिले, आपण नंतर सोडलेल्या मत्स्यबीजांना नष्ट करतील. या कारणांसाठी मत्स्यबीज सोडण्यापूर्वी स्थानिक, संहारक व मंद गतीने वाढ होणारे मासे तळ्यातून काढून टाकावेत. वर्षाखेरीस तळे कोरडे पडले तर स्थानिक मासे मरून गेल्यामुळे उत्पादकताही वाढते.

डेरीस रूट पावडरचा वापर : ही एका वनस्पतीची मुळे कुटून बनविलेली भुकटी आहे. १००० भाग पाण्यात ६ ते १० भाग भुकटी मिसळली तर सर्व प्रकारचे संहारक मासे मारले जातात. त्याच्या विषाचा परिणाम एक आठवडाभर राहतो. मत्स्यबीज सोडण्यापूर्वी एक महिना आधी ही विषारी भुकटी पाण्यात मिसळावी, म्हणजे मत्स्यबीजाला त्याचा उपद्रव होणार नाही.

मोहाच्या पेंडीचा वापर : १० लाख भाग पाण्यात २०० ते २५० भाग पेंड मिसळली तर मासे मरतात. मत्स्यबीज सोडण्यापूर्वी दोन-तीन आठवडे आधी ही पेंड पाण्यात मिसळावी लागते. नंतर हीच पेंड पाण्यात खत म्हणून उपयोगी पडते, त्यामुळे उत्पादकता वाढते. पेंड घातल्यापासून काही तासांतच मासे मरतात. ही पेंड मानवी शरीराला बाधक नसते.

तळ्यात पाणी सोडणे

मत्स्यशेतीच्या तळ्यातील पाणवनस्पतींचे निर्मूलन आणि निकृष्ट किंवा संहारक मासे नष्ट केलेले असतील तर पुढची पायरी म्हणजे तळ्यात पाणी सोडणे. पाणी सोडताना पाण्याच्या पाइपच्या तोंडावर बारीक जाळी बसवावी. त्यामुळे स्थानिक मासे किंवा त्यांची पिले पुन्हा तळ्यात येणार नाहीत.

पाण्याचा झोत तळ्यात पडताना जोर कमी व्हावा म्हणून तोंडास जाड पत्रा बसवतात. तसेच, जेथे पाणी पडते तेथे दगडी घडीव फरश्‍या टाकलेल्या असतात. त्यामुळे तळाशी खड्डा पडत नाही तसेच त्या फरश्‍यांवर पाणी पडल्याने पाणी पसरट होऊन पाण्याचे फवारे उडतात, त्यामुळे पाण्यात प्राणवायूचे प्रमाण वाढते.

कीटक, मत्स्यबीजांच्या शत्रूचे नियंत्रण

मत्स्यबीज सोडण्यापूर्वी पाण्यातील कीटक आणि इतर शत्रूंचा नाश करणे आवश्यक असते. पाण कीटकांमध्ये प्रामुख्याने पाणनावडी, पाणढेकूण, पाणविंचू, रानाट्रा (वॉटर बग्ज) तसेच जलढाल कीटक, लिथोसर्कस, बेलोस्टोमा आणि डायस्टिस्कससारखे वॉटर बग्ज; शिवाय भिंगरी किंवा चतुर (ड्रॅगन फ्लाइज) येतात. हे सारे माशांच्या बीजावर हल्ला करून त्यांना मारून टाकतात. त्याचप्रमाणे वाढणाऱ्या माशांच्या अवस्थांशी ते अन्नासाठी स्पर्धा करतात.

या कीटकांचा नाश करताना तेल आणि साबण मिसळून त्याचे दुधासारखे मिश्रण करून वापरावे. मत्स्यबीज सोडण्यापूर्वी बारा ते चौदा तास आधी हे मिश्रण वापरावे. हेक्टरी ६० किलोग्रॅम स्वस्त तेल आणि २० किलोग्रॅम साबण याचे मिश्रण लागते. दोन्ही घटक चांगले ढवळून एकजीव करावेत. त्याचे भुरकट करडे रसायन तयार होते. हे रसायन पाण्याच्या पृष्ठभागावर पसरून घ्यावे. पाण्यावर या रसायनाचा अतिपातळ थर तयार होतो. काही मिनिटातच हवा न मिळाल्यामुळे पाणकीटक मरू लागतात.

खत मात्रेचा वापर

तळ्यामधील प्राथमिक उत्पादकता वाढणे आवश्यक असते. त्यासाठी पाण्यात, पोषक द्रव्ये मिसळावी लागतात. आता ही पोषक द्रव्ये पाण्याबरोबर येतील किंवा तळ किंवा बांधाच्या मातीतून मिळतील.

सेंद्रिय खते : उदाहरणार्थ, शेणखत, पेंड वगैरे

असेंद्रिय खते : उदाहरणार्थ, युरिया, फॉस्फेट्स, नायट्रेट्स वगैरे

खत कोणत्या प्रकारचे आणि किती मिसळावे, हे निरनिराळ्या विभागांतील जमिनीच्या पोतावर अवलंबून राहते. सेंद्रिय व असेंद्रिय खतांमुळे उत्पादनात चांगली वाढ होते. काही मासे तर सेंद्रिय खतावर वाढतात.

तळ्यात वाढीकरिता वापरली जाणारी विविध प्रकारची खते शेतीसाठी वापरली जातात. उदाहरणार्थ, शेणखत, युरिया, सुपर फॉस्फेट, अमोनिअम सल्फेट, कॅल्शिअम, अमोनिअम नायट्रेट.

तळ्यात वापरासाठी खतांच्या निरनिराळ्या मात्रा सुचवलेल्या आहेत. यामध्ये दोन-तीन खते एकाचवेळी तळ्यात वापरावयाची असतात. उदाहरणार्थ,

प्राथमिक सेंद्रिय खताची मात्रा : उदाहरणार्थ, प्रति हेक्टरी ५००० ते १०००० किलो शेण

पाठोपाठ प्रत्येक महिन्यात हेक्टरी १००० किलो शेण

रासायनिक मिश्र खत सामान्यपणे १०० किलो प्रति महिना प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी पर्याय २ आणि ३ मध्ये सुचवलेली खते १५ दिवसाच्या फरकाने द्यावयाची असतात. कोणतेही खत देताना ते प्रथम पाण्यात भिजत ठेवतात. नंतर ते संपूर्ण मिश्रण व्यवस्थित कालवून पाण्याच्या पृष्ठभागावर सारखे पसरले जाते. त्यामुळे ते हळूहळू पाण्यामध्ये मिसळते. गरजेपेक्षा अधिक खत वापरणे टाळावे. कारण त्यामुळे माशांचे कल्ले कुजण्याचा (गिल रॉट) रोग होऊ शकतो. तसेच तळ्याच्या पाण्यात प्राणवायूची तूट पडते. त्याचा दुष्परिणाम मत्स्यबीजांच्या जगण्याशी निगडित असतो. संगोपन तळ्यात रासायनिक खताचा वापर करू नये. कारण त्याच्यामुळे अति शेवाळ वृद्धी होते, ती बराच काळ टिकते. ही शेवाळवृध्दी नाजूक मत्स्यबीजाला हानिकारक असते.

बालाजी पवार,९९६०५६३१०७

(सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT