Fish Seed Storage : मत्स्यबीज संचयनाचे नियोजन

Fish Farming : मत्स्यतळ्याचे उत्पादन हे तळ्यातील मातीच्या भोवती, रासायनिक आणि जीवशास्त्रीय गुणधर्मावर अवलंबून असते. तळाला सेंद्रिय घटकांचे क्षारीकरण होऊन पोषणतत्त्वे बाहेर पडत असतात.
Fish Farming
Fish FarmingAgrowon
Published on
Updated on

बालाजी पवार

Fish Pond Management : मत्स्यशेतीमधील मत्स्यबीज हा महत्त्वाचा घटक आहे. तळ्यात संचयन करण्यापूर्वी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मासे जिवंत राहण्याचे आणि उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी तळ्यामधील नको असलेले मासे व पाणवनस्पती काढून टाकणे आवश्यक आहे. बांबूला दोन्ही बाजूंनी दोर बांधून तळ्यातून ओढल्यास पाण वनस्पती काढता येतात. पाणवनस्पती जास्त असतील तर तळ्यातील पाणी कमी करून मुळापासून त्या काढून काढाव्यात. तळ्यामध्ये गवत्या, सायप्रिनस, गुरामी इत्यादी पाणवनस्पती खाणारे मासे सोडावेत.

मत्स्यतळ्याचे उत्पादन हे तळ्यातील मातीच्या भोवती, रासायनिक आणि जीवशास्त्रीय गुणधर्मावर अवलंबून असते. तळ्यामध्ये तळाला सेंद्रिय घटकांचे क्षारीकरण होऊन पोषणतत्त्वे बाहेर पडत असतात. भौतिक गुणधर्मात मातीचा पोत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता; तसेच रासायनिक गुणधर्मात सामू, सेंद्रिय कार्बन, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद हे

महत्त्वाचे घटक आहेत. या घटकांना गृहीत धरून मत्स्यतळ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे. किंचित आम्लयुक्त तथा आम्ल किंवा किंचित अल्कली माती (सामू ८) उत्पादनशील मानली जाते. मातीचा सामू आम्लयुक्त असेल तर अशी माती कमी उत्पादनशील असते, त्यासाठी तळ्यात चुन्याचा वापर करावा.

तळ्यातील साप, कासव, बेडूक इत्यादी परपोशी प्राणी आणि मरळ, मांगूर, सिंगी इत्यादी मांसाहारी मासे कार्प माशांच्या बोटुकलीस खाऊन टाकतात. त्यासाठी पाण्यात बोटुकली संचयन करण्यापूर्वी मत्स्यतळे पूर्णपणे रिकामे करून कोरडे करून घ्यावे. मत्स्यतळ्यात जाळे टाकून असे मासे बाहेर काढता येतात.

Fish Farming
Fish Products : माशांपासून मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती

मत्स्यबीजाच्या साठवणुकीपूर्वी तळ्याची पूर्वतयारी

तळे कोरडे करणे

बांधकाम पूर्ण झाल्यावर परिसराच्या पूर्वतयारी तळे उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे करून ते पूर्णपणे सुकवणे ही पहिली महत्त्वाची पायरी आहे. वर्षभर तळ्याच्या पाण्यात मेलेल्या वनस्पती, प्राणी, वनस्पती प्लंवग आणि प्राणी प्लवंग तळाशी कुजत असतात. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेने त्यांचे परिवर्तन होऊन ते मातीत एकरूप होतात त्यामुळेच सबंध तळे नांगरून काढणे योग्य ठरते. त्यामुळे कुजलेले पदार्थ एकजीव होण्यास मदत होते. मातीच्या आणि पर्यायाने तळ्याच्या उत्पादकतेस हातभार लागतो. यामुळे आणखी एक गोष्ट साधते, ती म्हणजे नैसर्गिक खताचा पुरवठा होतो.

तळे सुकवताना त्यातील झाडेझुडपे, गवत आणि तण पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक असते. कारण वनस्पतीच्या आश्रयाने कीटक अंडी घालतात. पुन्हा तळ्यात पाणी सोडले तर त्यांच्या पुढच्या अवस्थांचा विकास होतो. या वनस्पती तळ्यातील पाण्यात राहू दिल्या तर त्या पाणी आणि जमिनीतून पोषक अन्नाचा उपयोग करून घेतात. म्हणजे पर्यायाने या पोषक अन्नाचा माशांना तुटवडा होतो.

तळे सुकवण्याचा फायदा म्हणजे त्यातील संहारक मासे व इतर अनावश्यक प्राणी यांचा नाश होतो.

तळ्यात चुना मिसळणे

चुन्यामुळे तळ्याच्या तळाशी साठलेले विषारी वायू नाहीसे होतात. आम्लाचा निर्देशांक वाढून तो स्थिर राहण्यास मदत होते. मत्स्यबीजाला रोग होण्याची शक्यता कमी होते.

पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे होऊन बाहेर पडतात. त्याची जिवाणूंच्या व वनस्पती प्लवंगांच्या वाढीला मदत होते. त्याचबरोबर सूक्ष्म व पाण वनस्पती व सूक्ष्म प्राणीसुद्धा वाढतात.

चुनखडी (कॅल्शिअम कार्बोनेट ९० ते ९५ टक्के) भुकटी करून एक हेक्टर क्षेत्रामध्ये २५० किलो याप्रमाणात तळभागावर पसरावी किंवा तळ्याच्या पाण्यात मिसळावी. जमीन आम्लधर्मी असेल तर चुन्याची मात्रा १००० किलोपर्यंत वाढवावी. जमीन अल्कलीधर्मी असेल, तर चुन्याची मात्रा २०० किलोपर्यंत कमी करावी.

Fish Farming
Fish Conservation : शोभिवंत मत्स्यपालनात तयार झाली ओळख

तळ्यातील तण, निकृष्ट प्रजातीच्या माशांचे निर्मूलन

मत्स्यबीज सोडण्यापूर्वी तळ्यातील तण किंवा पाणवनस्पतींचे निर्मूलन आणि तळ्यातील स्थानिक, निकृष्ट किंवा संहारक मासे नष्ट करणे आवश्यक आहे. तळ्यातील वनस्पती पाण्यात, त्यांच्या वाढण्याच्या स्थानावरून किंवा वाढण्याच्या पद्धतीवरून चार-पाच प्रकारांत मोडतात.

पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पती : उदाहरणार्थ, इकोर्निया, अझोला, पिस्टिया

तळ्याच्या मातीत अगर चिखलात मुळे घुसलेली असणाऱ्या आणि पानेफुले मात्र पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर येणाऱ्या वनस्पती : उदाहरणार्थ, निम्फीया, ट्रापा, व्हॅलीसनेरिया.

सहसा मुळे नसणाऱ्या; पण पाण्यात पूर्ण बुडालेल्या वनस्पती : उदाहरणार्थ, सेरॅटोफायलम

मुळे चिखलात गेलेली आणि वनस्पती पाण्यात संपूर्ण बुडालेली : उदाहरणार्थ, हायड्रीला, नाजास

तळ्याच्या काठावर, बांधाच्या भरावावर अगर उतारावर वाढणारे गवत : उदाहरणार्थ, टायफा या सर्व वनस्पती सूर्य किरणांना पाण्यात जास्त खोलवर जाण्यापासून रोखतात. या वनस्पती पाण्यातील पोषकद्रव्ये वापरत असल्याने वनस्पती प्लवंग निर्मितीवर त्यांच्या अस्तित्वाचा प्रतिकूल परिणाम होतो. या पाणवनस्पती श्‍वसनासाठी पाण्यात विरघळलेला प्राणवायू वापरत असल्याने माशांना श्वसनासाठी तो कमी पडला तर मोठ्या प्रमाणात मासे मरतात.

या पाचही प्रकारच्या पाणवनस्पती निरनिराळ्या कीटकांना, विशेष करून स्थानिक माशांना आश्रय देतात. त्यातल्या त्यात स्थानिक मासे संहारक असतील किंवा मत्स्यभक्षक असतील तर तळ्यात सोडलेल्या मत्स्यबीजावर हल्ला करतात. यामुळे मत्स्यशेतीतील उत्पादनावर वाईट परिणाम होतो. ही सर्व कारणे आणि त्यांचे मत्स्यशेतीवर होणारे परिणाम लक्षात घेतले तर तळ्यात वाढणाऱ्या वनस्पतीचे निर्मूलन करणे अत्यावश्यक ठरते.

पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पती हाताने किंवा जाळी लावून काढून टाकाव्यात.

पृष्ठभागाच्या वर येणारी पाने, शेंडे, फुले वारंवार कापत राहिल्या तर त्यांच्या वाढीला पायबंद घालता येईल.

काटेरी तारा किंवा दोर पाण्यात तळापासून ओढून फिरवले तर पाण्यात पूर्ण बुडालेली मुळे असलेल्या वनस्पती काढून टाकता येतील.

सर्वांत चांगला उपाय म्हणजे गवत्या मासा सोडावा. एक किलो वजनाचा गवत्या मासा दिवसाकाठी एक किलो वनस्पती खातो. तळे बारमाही असेल आणि पाणी पूर्णपणे काढून टाकणे शक्य नसेल, तर मात्र पाणवनस्पतींच्या निर्मूलनासाठी विषारी रसायनांचा वापर करावा लागतो.

स्थानिक संहारक प्रजातींच्या माशांचे निर्मूलन

तळ्यात पाण्याबरोबर स्थानिक मासे येऊ शकतात. मत्स्यबीज सोडण्यापूर्वी तळ्याच्या पाण्यातील असे मासे नष्ट करणे आवश्यक ठरते. हे मासे मरळ, शिवडा आणि जिताडा जातीचे असतात. कार्पसारखी त्यांची वाढ झपाट्याने होत नाही. ते वनस्पती प्लवंग व प्राणी प्लवंग संपवून टाकतात. त्यामुळे प्रथम बीजाला आणि नंतर वाढणाऱ्या माशांना अन्न कमी पडते. या माशांची प्रजनन क्षमतासुद्धा मोठी असते.

पावसाची एखादी सर पडून थोडा फार पाणी साठल्यावर स्थानिक माशांचे प्रजनन होते. ही मत्स्य पिले प्राथमिक उत्पादनातून अन्न संपवतात. स्थानिक माशात काही मत्स्यभक्षक मासे असतात. हे मत्स्यभक्षक मासे तळ्यात राहू दिल्यास मत्स्यशेतीतील मुख्य माशांना अन्न कमी पडून पर्यायाने त्याची वाढ खुंटते.

तळ्यात आधीच वाढलेल्या मत्स्यभक्षक माशांची पिले, आपण नंतर सोडलेल्या मत्स्यबीजांना नष्ट करतील. या कारणांसाठी मत्स्यबीज सोडण्यापूर्वी स्थानिक, संहारक व मंद गतीने वाढ होणारे मासे तळ्यातून काढून टाकावेत. वर्षाखेरीस तळे कोरडे पडले तर स्थानिक मासे मरून गेल्यामुळे उत्पादकताही वाढते.

तळे बारमाही असेल तर मात्र उन्हाळ्याच्या अखेरीला पाण्याची पातळी खूप कमी झाल्यावर एकतर वारंवार जाळे फिरवून स्थानिक मासे पकडून काढून टाकावेत. नवीन ताजे पाणी तळ्यात आत घेताना बारीक जाळी बसवून पाणी घेतल्यास इतर मासे येणार नाही. एवढे करूनही स्थानिक मासे नाहीसे होत नसतील तर पुढील उपाय करावेत.

बालाजी पवार, ९९६०५६३१०७

(सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com