Hailstrom  Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstrom : नुकसानकारक गारपिटीचा व्हावा विचार

Hailstrom Heavy Rain : ज्या ढगांतून मेघगर्जना होते आणि वीज लखलखते अशाच ढगांतून गारा पडतात, दुसऱ्या ढगांतून नाही. आकाशात ही चिन्हे दिसल्यास शेतकऱ्यांनी गारपिटीची शक्यता लक्षात घ्यावी. गारा लहान असल्या तर नुकसान करीत नाहीत, मोठ्या गारा मात्र शेतीस नुकसानकारक ठरतात.

डॉ. रंजन केळकर

डॉ. रंजन केळकर

Harmful Hailstrom : पाऊस जर आपल्या शेतावर आपल्याला पाहिजे तितका आणि पाहिजे तेव्हा पडला असता, तर ते किती सोयीचे झाले असते ना? पण पृथ्वीच्या जलचक्रावर निसर्गाचे नियंत्रण आहे, आपले नाही. हे आपल्याला माहीत असूनही पुष्कळदा आपण ते मान्य करायला तयार नसतो.

मॉन्सून वेळेवर आला पाहिजे, त्याने चांगला पाऊस दिला पाहिजे, त्याने वेळेवर परतले पाहिजे, वादळी वारे वाहू नयेत, गारा कधी पडू नयेत, म्हणून आपण आग्रह धरतो, आशा बाळगतो, पूजाप्रार्थना करतो.

आपल्या अपेक्षेनुसार पाऊस पडला नाही, की ‘दुष्काळ! दुष्काळ!’ आणि नको त्या वेळी पाऊस पडला, की ‘अवकाळी! अवकाळी!’ असे लगेच म्हणून आपण निसर्गापुढे हवालदिल होतो. आजच्या विज्ञानयुगात अशी प्रतिक्रिया योग्य नाही. लोकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढू नये, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.

पृथ्वीचे जलचक्र हे एक दुष्टचक्र नाही, हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई यांच्या व्यतिरिक्त विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषिविज्ञान आणि हवामानशास्त्र यांच्यात सतत होत असलेल्या प्रगतीचा अधिकाधिक लाभ घेणे आता आवश्यक आहे आणि ते शक्यही आहे.

वादळी (अवकाळी) पाऊस

महाराष्ट्रावरील पावसाची सरासरी आपण पाहिली तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या राज्याच्या चारही विभागांत ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि मे महिन्यांत बऱ्यापैकी पाऊस पडतो. डिसेंबर, जानेवारी आणि एप्रिल हे महिनेसुद्धा कुठेही कोरडे जात नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत सुद्धा पावसाची थोडीफार शक्यता असतेच.

सारांश, ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांत पडणारा पाऊस अनपेक्षित किंवा असामान्य असतो असे नाही. भारतीय द्वीपकल्पाचा महाराष्ट्र एक मोठा भाग आहे. या द्वीपकल्पाच्या पश्‍चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. मॉन्सूनच्या प्रक्रियेत या दोन्ही समुद्रांचे मोठे महत्त्व आहे.

पण मॉन्सून नसतानासुद्धा ते महत्त्व कमी होत नाही. कधी कधी अशी काही वातावरणीय परिस्थिती निर्माण होते, की या समुद्रावरचे वारे महाराष्ट्रावर बाष्प घेऊन येतात आणि मग राज्यात पाऊस पडतो. अवकाळी पावसाचे दुसरेही एक कारण आहे. भारत हा एक उष्ण कटिबंधीय देश असला, तरी भारताचे जे अगदी उत्तरेकडचे प्रदेश आहेत ते शीत कटिबंधात मोडतात.

आता उष्ण कटिबंधावरचे वारे सामान्यतः पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वाहतात, तर शीत कटिबंधावरचे वारे सामान्यतः पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. क्वचितप्रसंगी असे घडते, की विरोधी दिशांनी वाहणारे हे प्रवाह एकमेकांच्या समीप येतात आणि त्यांच्यात उष्ण आणि शीत हवेची देवाणघेवाण होते. मग महाराष्ट्रावर कधी वादळी पाऊस पडतो, गारपीट होते. हिवाळ्यात अशी परिस्थिती उद्‍भवली तर तापमानात अचानक लक्षणीय घट होते.

गारपीट

उत्तर भारतात म्हणजे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम व अरुणाचल प्रदेशात हिवाळ्यात हिमवृष्टी होते. सिमला, मसुरी, श्रीनगर, गुलमर्ग अशा ठिकाणी हिवाळ्यातल्या पहिल्या हिमपाताची पर्यटक उत्कंठेने वाट बघत असतात. हिम आणि गारा यांतील मूलभूत फरक हा आहे, की गारा कधीही पडू शकतात, फक्त हिवाळ्यात असे नाही.

पाणी गोठण्यासाठी तापमान शून्य अंश असावे लागते. जेव्हा ढग खूप उंच वाढतात तेव्हा हे शक्य होते. मग त्यातील जलबिंदूंचे घनीभवन होऊन सूक्ष्म हिमकणांत रूपांतर होते. ढगातील हे हिमकण ढगातच खालीवर फेकले जातात. त्यांच्यावर बर्फाचे थर चढत जातात आणि त्यांचा आकार आणि वजन वाढते.

शेवटी ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊ लागतात आणि जमिनीवर पडतात. तेव्हा त्यांना आपण गारा म्हणतो. आता या गारा जर मुळातच लहान असल्या, तर त्या जमिनीपर्यंत पोहोचतसुद्धा नाहीत. वाटेतच त्या विरघळून जातात आणि त्यांचे पावसाच्या थेंबांत रूपांतर होते.

जमिनीवर पडणाऱ्या गारा जर अगदी लहान असल्या, तर त्या नुकसानही करत नाहीत, उलट त्या शेताची कोरडी जमीन ओली करतात एवढेच. पण गारा जर खूप मोठ्या आणि वजनदार असल्या तर मग गारपीट झाली असे आपण म्हणतो आणि यांत शेतपिकांचे मोठे नुकसानही होते.

२०१४ च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्यात विस्तृत आणि जबरदस्त अशी गारपीट झाली होती. अनेक ठिकाणी तर क्रिकेटच्या चेंडूएवढ्या गारा पडल्या होत्या आणि पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते.

अशी परिस्थिती पुन्हा उद्‍भवलेली नसली तरी गारपिटीच्या सामान्य घटना होत राहिल्या आहेत आणि होत राहतील. ज्या ढगातून मेघगर्जना होते आणि वीज लखलखते अशाच ढगांतून गारा पडतात, दुसऱ्या ढगांतून नाही. आकाशात ही चिन्हे दिसल्यास शेतकऱ्यांनी गारपिटीची शक्यता लक्षात घ्यावी.

पुढे काय?

२०१४ पासून आतापर्यंत हवामानाच्या अंदाजांची गुणवत्ता खूप वाढली आहे आणि त्यांत सतत सुधारणा होत असल्याचे आपण पाहत आहोत. गारपीट आणि अवकाळी पाऊस कुठे पडण्याची शक्यता आहे आणि त्याची तीव्रता किती राहील याविषयीचे अचूक इशारे आता ३-४ दिवस आधीच शेतकऱ्यांना मोबाइलवर मिळू लागले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांची योग्य दखल घेतली पाहिजे आणि त्यांना करता येतील ते उपाय त्यांनी करायला हवेत.

पिकांचा बचाव करणे नेहमीच शक्य नसते. कधी वेळ अपुरा असतो, कधी पैसा हाती नसतो, तर कधी मनुष्यबळ उपलब्ध नसते. म्हणून पिकांना वाचविणे महत्त्वाचे असले, तरी पीक नियोजन त्याहून अधिक महत्त्वाचे आहे.

ज्वारी-बाजरीसारख्या रब्बी हंगामातल्या पारंपरिक पिकांत अवकाळी पावसाचा प्रतिकार करायची क्षमता असते, पण अवकाळी पावसामुळे आणि गारा पडल्यामुळे मोठे नुकसान होते ते उभ्या पिकांचे, तसेच कांदा, भाज्या आणि आंबा, द्राक्षे, व अन्य फळबागांचे. अशा संवेदनशील पिकांचा बचाव करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल यावर मात्र विचार व्हायला हवा.

गारपीट ही नित्याची घटना नाही. ती वर्षांत फार तर एक-दोन वेळा होणारी दुर्मीळ घटना आहे. कोकणात तर गारपीट क्वचितच होते. तरी गारपिटीमुळे काय परिणाम होऊ शकतात हे आधीच लक्षात घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. पारंपरिक पिकांच्या जागी दुसरी पिके लावण्याचा निर्णय जेव्हा शेतकरी घेतात तेव्हा त्या पिकांना हवामानाविषयीच्या कोणत्या संभाव्य धोक्यांचा सामना करावा लागेल याचा जाणीवपूर्वक विचार व्हायला हवा.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT