Rahul Gandhi  Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : शेतकऱ्यांकडून वसुली; धनदांडग्यांचे मात्र कर्जमाफ

बाळासाहेब पाटील

Mumbai News : ‘‘गरीब, आदिवासी, मागास, वंचितांसह शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करून २०-२२ धनदांडग्यांची घरे भरली जात आहेत,’’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (ता. १७) मोदी सरकारवर केला.

‘‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघाला तेव्हा असे सांगितले गेले की, कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी बनेल, त्याची सवय बिघडले मग २०-२२ उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले तर त्यांची सवय बदलत नाही का,’’ असा सवालही श्री. गांधी यांनी केला.

खासदार राहुल गांधी यांनी रविवारी सकाळी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली. या वेळी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर आदी उपस्थित होते. पदयात्रेनंतर न्याय संकल्प सभा झाली.

श्री. गांधी म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले. त्यामुळे दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आल्या. काँग्रेसने जनतेला विचारून सर्वांची मते विचारात घेऊन या गॅरंटी दिल्या आहेत. भाजप हे करू शकत नाही कारण त्यांच्याकडे सर्वकाही वरून येते.

सर्व काही नरेंद्र मोदी सांगतात तसेच चालते. कामगार, शेतकऱ्यांना काहीच समजत नाही, असे ते समजतात. देशातील विद्वान शास्त्रज्ञांजवळ जेवढे ज्ञान आहे तेवढेच ज्ञान शेतकऱ्यांजवळ आहे. त्यांना आर्थिक मदत करा, मग बघा किती फरक पडतो, त्यांच्या हातातून मेक इन इंडिया घडेल.’’

‘‘हिंदुस्थान द्वेषाचा देश नाही तर प्रेमाचा देश आहे. भारतीयांच्या डीएनएमध्येच आदर, प्रेम भरपूर आहे. हिंदुस्तान प्रेमाचा देश आहे तर त्यात द्वेष का पसरवला जातो? तर या द्वेषाचे कारण अन्याय आहे. गरीब, शेतकरी, दलित, महिला, तरुण या घटकांवर अन्याय होत आहे. देशातील केवळ दोन तीन टक्के लोकांना न्याय मिळतो, त्यांच्यासाठी न्यायपालिका काम करतात, सरकार काम करते, सर्व संस्थांमध्ये त्यांना स्थान आहे पण ९० टक्के लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे,’’ अशी टीका श्री. गांधी यांनी केली.

‘दोन आत्म्यांमधील ही लढाई’

‘‘मोदी-राहुल, भाजप-काँग्रेस यांच्यातील ही लढाई नाही तर देशाच्या स्वभावातील दोन आत्म्यांमधील ही लढाई आहे. एक आत्मा म्हणतो हिंदुस्थान मध्यातून चालवावा, वरून आदेश देऊन चालवावा आणि दुसरा म्हणतो विकेंद्रीकरण करून सर्वांची मते विचारात घेऊन चालवला पाहिजे,’’ असे श्री. गांधी म्हणाले.

‘सत्य व हिंदुस्थान आपल्या बाजूने’

‘‘घाबरू नका, भाजप सत्तेत येईल व संविधान बदलेल असे काही होणार नाही, भाजप असे काहीही करू शकत नाहीत आणि त्यांच्यात तेवढी धमकही नाही. सत्य व हिंदुस्थान आपल्या बाजूने आहे,’’ असेही श्री. गांधी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT