Animal Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Market : जातिवंत पहाडी बैलांसाठी चला चांदूर बाजारला

Chandur Bull Market : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे भरणारा जनावरांचा बाजार हा जातिवंत बैल, गायी आणि म्हशींच्या खरेदीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशच्या भैसदेही जिल्ह्याच्या सीमा या तालुक्‍याशी जुळलेल्या आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले

Amaravati News : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे भरणारा जनावरांचा बाजार हा जातिवंत बैल, गायी आणि म्हशींच्या खरेदीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशच्या भैसदेही जिल्ह्याच्या सीमा या तालुक्‍याशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे या भागातील प्रसिद्ध पहाडी बैल देखील बाजारात उपलब्ध होतो. दर रविवारी भरणाऱ्या या बाजाराची वार्षिक उलाढाल क्षमता १६० ते १८७ कोटींच्या आसपास पोहोचली आहे.


ब्रिटिश काळात मध्य प्रदेशातील घाटभागातून यवतमाळ जिल्ह्यातील चांदूर येथे गुळाची आवक मोठ्या प्रमाणावर व्हायची. घाटाचा गूळ याच नावाने तो ओळखला जायचा. त्या भागातून व्यापारी बैलगाडीने चांदुरात गुळाची भेली (ढेप) आणून त्याची विक्री करायचे. साधारणतः एक भेली ४० ते ५० किलोची असायची. ग्राहकाच्या मागणीनुसार ती फोडून त्यातील गुळाची विक्री व्हायची. ब्रिटिश काळ संपल्यानंतरही २० ते २५ वर्षे हा बाजार भरतच होता. त्यामुळेच चांदूर गावाला पुढे चांदूर बाजार अशी ओळख मिळाली असे सांगितले जाते. चांदूर बाजारशी तब्बल १०९ गावे जुळलेली आहेत.

जनावरांच्या बाजाराची परंपरा

चांदूरबाजार बाजार समितीची स्थापना २३ मे १९७४ मध्ये झाली. त्यानंतर काही वर्षांतच जनावरांचा बाजार भरविण्यास सुरुवात झाली. त्या वेळी तो नगरपालिकेच्या जागेवर भरायचा. त्यास निंबाडी जुना बैल बाजार असे म्हटले जायचे. सन १९९६ पासून ते आजगायत बाजार समितीच्या मुख्य आवारातच तो भरत आहे. बाजार समितीचा एकूण विस्तार २४ एकर असून, त्यातील सात एकरावर जनावरांचा बाजार भरतो.

जातिवंत जनावरांची उपलब्धता

जर रविवारी भरणाऱ्या या बाजारात विविध जातींच्या जनावरांची आवक होत असते. मध्य प्रदेशातील भैसदेही जिल्ह्याच्या सीमा चांदूरबाजार तालुक्‍याशी जुळल्या आहेत. त्यामुळे या भागातील प्रसिद्ध
जातिवंत पहाडी बैल येथील बाजारात उपलब्ध होतो. त्याशिवाय मराठवाड्यातील लाल कंधारीसह अन्य जाती, जर्सी, काठियावाडी, एचएफ, मुऱ्हा, गुजर यासह अन्य गावरान गायी- म्हशींच्या जातींचा यात समावेश होतो. दुधाळ जनावरांबरोबर शेळ्या-मेंढ्यांनाही बाजारात मागणी राहते. बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात जनावरांची आवक आणि उलाढाल या काळात वाढीस लागते. यामध्ये प्रति बाजार उच्च हंगामात ८०० ते ११००, जुलै ते सप्टेंबर या काळात ३०० ते ४०० तर ऑक्टोंबर ते फेब्रुवारी काळात ५०० ते ७०० जनावरे खरेदी-विक्री होते. शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीचे हेच प्रमाण २५० ते ४०० याप्रमाणे हंगामनिहाय राहते. बैलजोडीचे दर तीस हजारांच्या पुढे व कमाल सव्वा लाख रुपयांपर्यंत आहेत. गायी- म्हशींचे दर ५० ते ६० हजार व त्यापुढे आहेत.

...अशा आहेत सुविधा

बाजार समितीकडून बाजारस्थळी विविध सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. जनावरे बांधण्यासाठी लोखंडी रेलिंग, बाजारात फिरण्यासाठी अंतर्गत सिमेंट रस्ते, जनावरांना चढण्या-उतरण्यासाठी ‘रॅम्प’, मोठ्या व छोट्या जनावरांचा बंदिस्त स्वतंत्र बाजार, त्यासाठी लोखंडी जाळीचा आधार, गैरप्रकार तसेच चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्हीचा कॅमेराचा वापर, खरेदी विक्री पावती करण्यासाठी स्वतंत्र कक्ष यासह सावलीसाठी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.


बाजार शुल्क

प्रति जनावर (बैल, गाय, म्हैस) पाच रुपये तर शेळी-मेंढी यांच्यासाठी तीन रुपये प्रति जनावर याप्रमाणे आवक शुल्क आकारणी होते. जनावरांच्या खरेदीवर एक टक्‍के बाजार शुल्क तर पाच पैसे
शेकडा शुल्क आकारले जाते. बाजार समितीला सरासरी २२ ते २५ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते.

बाजारातील उलाढाल

वर्ष आवक, उलाढाल (रु.)
२०२०-२१ ः ४८९३२ - १८७ कोटी -
२०२१-२२ ः २७२३० - ८५ कोटी -
२०२२-२३ ः ५०७०५ - १६० कोटी



शेतकरी-व्यापारी सांगतात...

गावरान तसेच मध्यप्रदेशात मिळणाऱ्या जातिवंत नागोर बैलांची उलाढाल चांदूर बाजारात मोठ्या प्रमाणात होते. त्याला शेतकऱ्यांची मागणी असल्याने छिंदवाडा (बरघाट) तसेच भंडारा भागातून देखील गावरान, नागोर जातीच्या बैलांची खरेदी करून त्याच्या विक्रीवर भर राहतो. या भागातून आठवड्याला सरासरी ५५ ते ६० नागोर जातीचे बैल खरेदीला आणले जातात. त्यांच्या बैलजोडीची किंमत सरासरी ८० हजार ते एक लाख रुपये राहते. मराठवाडा भागातून लाल कंधारी बैलांची आवकही मोठ्या प्रमाणात आवक होते अशी माहिती व्यापारी मझहर अली यांनी दिली.


संकरित (एचएफ) गायींच्या व्यापारात वीस वर्षांपासून सातत्य राखले आहे. अमरावती जिल्ह्यातील खेड्या-पाड्यांतून खरेदी करून चांदूरबाजारात ४० हजारांपासून ते ६० हजार रुपये दरांपर्यंत
त्यांची विक्री करतो. गायीच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार व्यवहार होतो असे व्यापारी अमोल आवारे सांगतात.

गावरान तसेच जातिवंत जनावरांसाठी चांदूरबाजारचा बाजार प्रसिद्ध आहे. मी येथेच खरेदील येत असतो. पिण्याच्या पाण्याची सोय तसेच अन्य पूरक सुविधाही आम्हाला इथे पुरवण्यात आल्याचे समाधान आहे.
प्रदीप बंड, जसापूर, अमरावती

मनीष भारंबे, ८८०६३७६३७०
(सचिव, बाजार समिती, चांदूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT