Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील पेरणी झालेली हरभरा पीक यंदा धोक्यातच आहे. लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हरभऱ्यावर मर, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो आहे.
यंदा मराठवाड्यातील रब्बी पेरणीवर पावसाळ्यात झालेल्या अल्प पावसामुळे गंडांतर आले. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अपेक्षित पेरणी झालीच नाही. नोव्हेंबरअखेर झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला पसंती दिली.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्वसाधारण २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याची १ लाख ४२ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.
दुसरीकडे १५ डिसेंबर अखेरपर्यंत लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत सर्वसाधारण ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८ लाख ३२ हजार ५७४ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यातील २ लाख ६९ हजार ५४७ हेक्टर क्षेत्रासह धाराशिव जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ६६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
आधी पाऊस नसल्यामुळे जमिनीतील ओल तुटल्याने पेरणी केलेला हरभरा संकटात सापडला. तर त्या संकटातूनही कसाबसा वाचलेला हरभरा नोव्हेंबरअखेर व डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यात सापडला. यात भरीस भर म्हणून ढगाळ वातावरणाने कीड-रोगांना आमंत्रण दिले.
बीड जिल्ह्यातील परळी तालुका अंतर्गत येत असलेल्या नागापूर परिसरात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यांतर्गत येत असलेल्या आसाडी, रहिमाबाद, अन्वी, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोलाडगाव व इतर परिसरात हरभऱ्यावर मरचा प्रादुर्भाव आढळून आला.
कीड-रोगाबरोबरच परळी तालुक्यातील नागापूर शिवारात हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली. शिवाय आळ्यांनीही हरभऱ्याचे नुकसान केले. महिना दीड महिना पेरणी करून झालेल्या हरभऱ्याची वाढ ही अपेक्षित झाली नाही.
आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाचा हवामान अंदाज असल्याने हरभऱ्यावरील धोका अजून टाळलाच नसल्याची स्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.