NAFED  Agrowon
ॲग्रो विशेष

NAFED Onion Inspection : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीची केंद्रीय पथकाकडून झाडाझडती

Team Agrowon

Nashik News : गत रब्बी हंगामात केंद्राच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत जवळपास सव्वादोन लाख टनांवर कांदा खरेदी ‘नाफेड’ने केली. मात्र खरेदीत अनियमितता दिसून आली. त्यामुळे गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. या संदर्भात तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे झाल्या. अखेर उशिरा का होईना या कार्यालयाने दखल घेतली. त्यानंतर केंद्राच्या पथकाने लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथे भेटी देऊन खरेदीतील गैरव्यवहाराची सत्यता पडताळण्यासाठी झाडाझडती घेतली आहे.

‘नाफेड’चे वरिष्ठ व नाशिक शाखा कार्यालयांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांचे लागेबांधे असून त्यांच्या संगनमताने खरेदीतील भ्रष्टाचार झाल्याचे आरोप शेतकरी, शेतकरी संघटना व शेतकरी नेत्यांनी जिल्हाधिकारी, केंद्रीय मंत्र्यांकडे वेळोवेळी केल्या होत्या. मात्र यासंबंधी कुठलीही चौकशी आजवर झालेली नव्हती. मात्र यासंबंधी गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ‘नाफेड’ला चौकशी करण्याबाबतचे आदेश दिले होते. या बाबत आता चौकशी सुरू झाल्यामुळे ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

खरेदीमध्ये काही बोगस फेडरेशनचा समावेश झाल्याने अनेक पारदर्शकतेने काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांना डावलण्यात आल्याने या बाबतचा रोष यापूर्वीच होता, असे सूत्रांनी सांगितले. तर काही राजकीय वरदहस्त असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय वजन वापरून खरेदीचे काम मिळविले. मात्र खरेदीत गोंधळ असून खरेदी साठा आढळून येत नसल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.

त्यातच खरेदी संदर्भातील कथित यादी व्हायरल झाल्याने त्यामुळे अनेक आरोपांना तोंड फुटले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर या संदर्भातील नोंद या कार्यालयाने घेतली. त्यानुसार गुजरात येथील पथक दोन दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर आले आहे. कांदा खरेदीसंबंधी खरेदी, साठवणूक यासंबंधी सर्व कागदपत्रे पिंपळगाव बसवंत येथील कार्यालयात कसून तपासण्यात येत आहेत. दरम्यान मोठी गोपनीयता पाळत जवळपास तीन तास ही सर्व चौकशी ‘नाफेड’च्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशाने थेट कार्यालयात झाली. मात्र यातील खरा अहवाल समोर येणार का की पुन्हा हे सखोल प्रकरण दाबले जाणार? असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे.

चौकशीत ‘नाफेड’चे अधिकारी अडकणार?

कांदा खरेदी विभागाच्या कामकाजात यापूर्वी सहव्यवस्थापकीय संचालक सुनील सिंग यांनीही मनमानी करत आर्थिक हितसंबंध जोपासत कामे दिल्याचा आरोप अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वारंवार केला. ‘नाफेड’चे नवनिर्वाचित अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी जिल्हा दौऱ्यावर येत स्वतः गैरव्यवहार समोर आणले. त्यांच्याकडे अनेक पुरावे होते. तर आता या पथकात गुजरात येथील ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कांदा खरेदीतील आरोप, गैरप्रकाराची चौकशी करणार असल्याने ‘नाफेड’मधील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही राजकीय नेते, उत्पादक कंपन्यांची धावपळ सुरू असून अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे हा चौकशीचा फेरा पिंपळगाव बसवंत कार्यालयातील अधिकारी वर्गाला अडचणीत आणणार असल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT