Jalgaon News : भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) राज्यात विविध भागांत कापूस खरेदीसंबंधी सबएजंट किंवा नोडल संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित यांची नियुक्ती केली होती. परंतु विविध कारणांमुळे पणनच्या कापूस खरेदीस विलंब झाल्याने राज्यात पणन महासंघाकडून निश्चित ३० खरेदी केंद्रे सीसीआय सुरू करणार आहे.
सीसीआयने सबएजंट म्हणून नियुक्ती करून किंवा करार करूनही राज्यात पणन महासंघाची खरेदी केंद्र अद्याप बंद असल्यासंबंधीचे वृत्त ‘अॅग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन सीसीआयने पणन महासंघाकडून निश्चित खरेदी केंद्र सुरू करण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.
पणन महासंघाला मागील महिन्यात कापूस खरेदीसंबंधी सबएजंट म्हणून सीसीआयने नियुक्त केल होते. याच कालावधीत महासंघात संचालकांची निवडणूक व इतर कार्यवाही झाली. यातच कापूस खरेदीसाठी आवश्यक निधी पणन महासंघ उभारू शकला नाही. हा निधी बँका व इतर वित्तीय संस्थांकडून उभारला जातो. परंतु यात अडथळे आल्याने कापूस खरेदीसंबंधी केंद्र पणन महासंघ सुरू करू शकला नाही.
केंद्राचे सीसीआयला पत्र
राज्यात पणन महासंघ कापूस खरेदी केंद्र सुरू करू न शकल्याने केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाने राज्यात ३० खरेदी केंद्र सीसीआयने सुरू करावीत, असे पत्र दिले आहे. यानुसार राज्यात पणन महासंघाकडून निश्चित ३० खरेदी केंद्र सीसीआय सुरू करणार आहे. त्यात १५ खरेदी केंद्रे अकोला किंवा विदर्भ विभागात तर १५ खरेदी केंद्रे मराठवाडा, खानदेश विभागात सुरू केली जातील. या केंद्रांवर सर्व यंत्रणा सीसीआय उभारणार आहे.
पणन महासंघातर्फे राज्यात निश्चित ३० खरेदी केंद्रे सीसीआय सुरू करीत आहे. त्याची कार्यवाही झाली असून, लवकरच केंद्र सुरू केले जातील. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.- पी.अमरनाथ रेड्डी, व्यवस्थापक, सीसीआय, छत्रपती संभाजीनगर विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.