Soybean Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Disease: सोयाबीन पिवळे पडण्यामागील कारणे, उपाययोजना

Yellow Mosaic Virus: महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. बरेच ठिकाणी पेरणी झालेली असून, पीक १५ ते २० दिवसांचे झाले आहे. लवकर पेरणी झालेल्या पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहे.

Team Agrowon

राजीव घावडे, मंगेश दांडगे, डॉ. सतीश निचळ

Crop Health Tips: महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. बरेच ठिकाणी पेरणी झालेली असून, पीक १५ ते २० दिवसांचे झाले आहे. लवकर पेरणी झालेल्या पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहे. त्याच वाढ कमी असल्याचेही अनेकांचे मत आहे. शेतातील सोयाबीन पिवळे पडणे किंवा वाढ कमी असणे या मागील नेमक्या कारणाचा शोध घेऊन वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सोयाबीन पिवळे होण्याची कारणे...

आमच्या सर्व्हेक्षणामध्ये सोयाबीन पीक पिवळे पडण्याची मुख्यतः दोन कारणे दिसतात. एक म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता किंवा त्यावर होत असलेल्या रोगाचा प्रादुर्भाव.

सुरुवातीला जर सोयाबीन पीक पिवळे पडत असेल, तर ते प्रामुख्याने अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पडते. शेवटच्या अवस्थेत पीक पिवळे पडणे, हे पिवळा मोझॅकसारख्या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचे लक्षण असते.

आपली जमीन आणि माती कशी आहे, व त्यात कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सोयाबीन पिवळे पडते. जमीन चांगली असूनही पीक पिवळे पडत असल्यास आपले खत व्यवस्थापन तपासले पाहिजे. अशा वेळी खते कमी देणे, त्यांची अयोग्य प्रमाणात खतमात्रा देणे, मुख्य अन्नद्रव्यांसोबतच आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर न करणे या बाबी पीक पिवळे पडण्यासाठी कारणीभूत असू शकतात.

चुनखडीयुक्त जमिनीचा सामू (पीएच) वाढलेला असतो. त्यातून काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून ऱ्हास होतो. ती पिकांना उपलब्ध होत नाहीत. उदा. नत्र, स्फुरद, पालाश, मँगेनीज, जस्त, तांबे, मॅग्नेशिअम आणि लोह. सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने गंधक - जस्त आणि लोह यांची कमतरता जाणवल्यामुळे पीक पिवळे पडताना दिसते.

गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. गंधक कमी पडल्यास १८ टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते. गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढविण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते.

जमिनीचा सामू वाढला की नत्र आणि स्फुरद पिकाला उपलब्ध होत नाही. सोडिअम या घटकाचे प्रमाण वाढते. अन्नद्रव्ये सहजासहजी झाडाला उपलब्ध होऊ देत नाहीत. पीक पिवळे पडते व त्याची वाढ खुंटते.

गेल्या काही काळापासून शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खतांचा वापर शेतामध्ये घटत आहे. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे खतांच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होऊन सोयाबीन पीक पिवळे पडते.

उपाययोजना

आपल्या शेतात वरीलपैकी नेमके कोणते कारण असावे, याचा विचार करावा. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पीक पिवळे पडत असल्यास पुढील उपाययोजना उपयोगी ठरू शकतात.

अन्नद्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्याने जमिनीच्या सुपीकतेशी संबंधित विषय आहे. आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पेरणीपूर्वी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र आता बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरणी पार पडलेल्या आहेत. तिथे अन्नद्रव्यांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी पुढीलपैकी योग्य त्या विद्राव्य खताची फवारणी घ्यावी.

नत्र अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : युरिया २० ग्रॅम प्रति लिटर पाणी.

गंधक अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : सल्फेटयुक्त खताची ५ मिलि प्रति लिटर पाणी.

लोह अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : चिलेटेड फेरस ५ ग्रॅम प्रति लिटर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड-२) ची ५ मिलि प्रति लिटर पाणी.

जस्त अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : चिलेटेड झिंक ५ ग्रॅम प्रति लिटर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड-२) ची ५ मिलि प्रति लिटर पाणी.

स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : १२:६१:० किंवा १७:४४:० किंवा ०:५२:३४ खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.

बोरॉन अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड-२) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी १९:१९:१९ हे विद्राव्य खत १०० ग्रॅम अधिक अमोनिअम सल्फेट २०-२५ ग्रॅम अधिक चिलेटेड झिंक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी यांची फवारणी करावी.

रोगाचा प्रादुर्भाव

हंगामामध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येतो. या विषाणूजन्य रोगामुळेही पीक पिवळे पडते. मात्र हा रोग पिकाच्या सुरुवातीच्या काळात येत नाही. तो प्रामुख्याने २५ ते ३० दिवसांनंतर दिसून येतो.

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे

पिकामध्ये पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. हिरवे पिवळी पाने असलेले झाड दुरून ओळखता येते.

शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.

पानांमधील हरितद्रव्य नाहीसे झाल्याने अन्न निर्मितीमध्ये बाधा येते.

शेंगाचा आकार लहान राहून यामध्ये दाणे सुद्धा कमी राहतात.

उत्पादनातील घट

पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोरा येण्याअगोदरच झाले असल्यास उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट येते. एकंदर पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. परंतु ७५ दिवसांनंतर रोगाचा प्रसार झाल्यास फारसे नुकसान संभवत नाही. एकंदरीत उत्पादनामध्ये घट येते.

व्यवस्थापन

पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पांढरी माशी व अन्य रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

पेरणीची वेळ ः योग्यवेळी पेरणी न केल्यास पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. सोयाबीनची पेरणी जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान करावी. जिथे पेरणी राहिलेली आहे, त्यांनी या आठवड्यामध्ये पूर्ण करून घ्यावी.

पेरणीनंतर २० व ३५ दिवसांनी निंबोळी अर्काची (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

नत्राचा वापर अधिक असल्यास रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे नत्राचा अधिक वापर टाळून पिकास शिफारशीप्रमाणे संतुलित खतमात्रा द्यावी.

पांढऱ्या माशीच्या वाढीसाठी पूरक अशा शेतामधील व बांधावरील तणांचा व वनस्पती काढून टाकाव्यात. त्यामुळे वाहकांची संख्या कमी राहून विषाणूचा व संभाव्य रोगाचा प्रसार कमी राहतो.

प्रथमावस्थेत रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावीत. कारण त्यातूनच अन्य झाडांवरही प्रसार होऊ शकतो.

पिवळे चिकट सापळे हेक्टरी २२ ते २३ याप्रमाणे लावावेत.

पांढरी माशी या रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता खालील पैकी एका आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

*बीटा सायफ्लुथ्रीन (८.४९%) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मिलि किंवा

थायामेथोक्झाम अधिक लॅंबडा सायलोथ्रीन (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रनिलीप्रोल (९.३० टक्के) अधिक लॅंबडा सायलोथ्रीन (४.६० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ मिलि.

राजीव घावडे, ९४२०८४१४२१

सहायक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित सोयाबीन प्रकल्प, अमरावती अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT