Banana Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Processing : केळीप्रक्रियेतून व्यावसायिक संधी

Team Agrowon

Processing Industry : केळी प्रक्रियेमुळे तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांना चांगली मागणी आहे. यामुळे काढणीपश्‍चात फळांचे होणारे २५ ते ३० टक्के नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया उद्योग हा सक्षम पर्याय आहे. तसेच पानापासून कप व प्लेट्स तयार करतात. खोडापासून धागानिर्मिती केली जाते.

चिप्स :

१) पूर्ण वाढ झालेली १० टक्के परिपक्व केळी निवडावीत. ही केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत. स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी.

२) केळी सोलण्याच्या यंत्राची ताशी ४५० केळी एका दिवसात सोलण्याची क्षमता आहे. यंत्राच्या साह्याने ०.३ ते ०.५ मि.मी. जाडीच्या चकत्या कापाव्यात. यंत्र उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत.

साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात. काप काळसर पडून नयेत व ते पांढरेशुभ्र होण्यासाठी ०.१ टका सायट्रिक अॅसिड किंवा पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर चकत्या उकळत्या पाण्यात ४ ते ५ मिनिटे थंड करून प्रति किलो चकत्यास ४ ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी द्यावी.

३) चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअस एवढे ठेवावे. चकत्या हाताने दाबल्या असता मोडल्यास त्या तयार झाल्या आहेत, असे समजावे आणि सुकविण्याचे काम थांबवावे.

४) वेफर्स हाय डेन्सिटी पॉलिथिन पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.

रस :

१) पूर्ण पक्व केळ्यांचा पल्पर यंत्राने गर काढतात. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरूपात रस काढता येत नाही. त्याकरिता पाच मि.लि. प्रतिकिलो या प्रमाणात पेक्टीनेज एन्झाइम मिसळून दोन तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळतो.

२) रसाची गोडी २४ ते २६ डिग्री ब्रिक्स असते. या रसात दीड पट पाणी मिसळून, आवश्यकतेनुसार सायट्रिक आम्ल टाकून आरटीएस बनविता येते. त्याची गोडी १५ डिग्री ब्रिक्स व आम्लता ०.३ टक्का असते. हे पेय ८५ अंश सेल्सिअस तापमानाला पाश्‍चराइज्ड करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे. रस सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतो. केळीपासून ८८ टक्के रसाचे प्रमाण मिळते.

जॅम :

१) पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद आगीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्का पेक्टीन, ०.३ टक्का सायट्रिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे.

२) मिश्रणाचा ब्रिक्स ६८ डिग्री ब्रीक्स झाल्यावर जॅम तयार झाला असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावा. हा पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो.

भुकटी :

१) केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. भुकटी तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात.

२) प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या साह्याने लगदा करून घेतात.

३) भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंवा फोम मेंट ड्रायरच्या साह्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जंतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात.

४) भुकटीचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो. बिस्किटे, बेकरी तसेच आइस्क्रीममध्ये भुकटीचा वापर केला जातो

सुकेळी :

१) पूर्ण पिकलेली, परंतु टणक फळे निवडून त्यांची साल काढून टाकावी. फळे उभी चिरून त्याचे दोन भाग करून पुन्हा आडवे लहान

काप द्यावेत. त्यांना ३० मिनिटे गंधकाची (एक किलो केळीसाठी ३ ग्रॅम गंधक) धुरी द्यावी.

२) धुरी प्रक्रियेमुळे केळीच्या कापांना आकर्षक सोनेरी छटा येते, तसेच सुकेळीची प्रतदेखील उंचावते. असे काप सुकवून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये किंवा निर्जंतुक केलेल्या बरणीत भरावेत.

इतर मूल्यवर्धित उत्पादने :

१) पानापासून कप व प्लेट्स तयार करतात. खोडापासून धागानिर्मिती केली जाते.

२) खोडाच्या चोथ्यापासून बायोगॅस इंधननिर्मिती करतात. खोडाच्या रसाचा कापड उद्योगात स्टेन म्हणून उपयोग केला जातो.

२) फळांच्या सालीचा उपयोग इथेनॉलनिर्मितीसाठी केला जातो.

३) कच्ची फळे, खोडाचा गाभा व केळफुलापासून भाजी बनवली जाते. दांड्यापासून टोपल्या, चटई, पिशव्या यांसारख्या विविध वस्तू तयार केल्या जातात.

४) खोड, पाने, केळफूल जनावरांना खाद्य म्हणून वापरतात.

संपर्क ः डॉ. शुभम भोसले, ७७१९९१२३८५

(सहायक प्राध्यापक, श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालय, पानीव, जि. सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT