Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Buldana Seed Production : बुलडाणा बनतेय बीजोत्पादन ‘हब’

 गोपाल हागे

Buldana News : जिल्ह्यात घाटावरील सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, मेहकर, चिखली या तालुक्यांमध्ये मागील काही वर्षांत बीजोत्पादनाचे काम वेगाने पुढे जात आहे. या नव्या पीकपद्धतीच्या माध्यमातून शेतकरी दरवर्षी ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक बियाणे तयार करीत आहेत.

या बीजोत्पादनाच्या कार्याला आता जिल्हा प्रशासनाची साथ मिळणार असून जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांमध्येही बीजोत्पादन करण्याबाबतची सूचना बियाणे कंपन्यांना करण्यात आली आहे. हे प्रत्यक्षात आल्यास जिल्ह्याच्या शेती क्षेत्रात एक नवीन सुरुवात होण्यास हातभार निश्‍चित लागेल, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जिल्ह्याचे लागवडीखालील क्षेत्र सात लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. १३ तालुक्यांच्या या विस्तारीत जिल्ह्याचे घाटावर व घाटाखाली, असे दोन भौगोलिक विभाग मानले जातात. मराठवाड्याला लागून असलेल्या उपरोक्त तालुक्यांत मागील काही वर्षात बीजोत्पादनाचे काम विस्तारत आहे.

एकाच गावशिवारात शंभर-दोनशे सीडनेट उभ्या राहिलेल्या बघायला मिळतात. १० गुंठ्यातील या तांत्रिक पीकपद्धतीने पारंपरिक पीक उत्पादनापेक्षा कैकपट अधिक मिळकत मिळवता येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

या क्षेत्रात असलेल्या संधी पाहता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी यावर बारकाईने काम सुरू केले. नुकतीच बुलडाण्यात शेतकरी गट, कंपन्यांचे प्रतिनिधी, बियाणे कंपनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्याला ‘सीडहब’ बनवण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

सोबतच त्यांनी बियाणे कंपन्यांनी घाटाखालील तालुक्यांमध्येही बीजोत्पादनाला संधी व पुरेशा सुविधा उपलब्ध असल्याचे सांगत त्याभागात काम सुरू करण्याची सूचना केली. बियाणे कंपन्यांकडून या प्रस्तावाला होकारही मिळालेला आहे. त्यामुळे येत्या काळात घाटाखालील तालुक्यांत बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढ सुरू होणार आहे.

सध्या जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे ११ हजार हेक्टरपर्यंत बीजोत्पादन क्षेत्र आहे. या माध्यमातून दोन लाख १२ हजार क्विंटल बियाणे तयार होते. यातून सुमारे २१३ कोटींची उलाढाल होत आहे. तर कृषी खात्याच्या लेखी नोंद असलेल्या भाजीपाला वर्गीय पिकांच्या बीजोत्पादनात मिरचीचे ३११ हेक्टर क्षेत्र आहे. यात १ लाख २४ हजार क्विंटल बियाणे तयार होते. १०० कोटींपर्यंत या बियाण्याची किंमत आहे.

तर ढोबळी मिरचीच्या बियाण्याचे ९५ हेक्टरमध्ये उत्पादन काढले जाते. यातून ११५ क्विंटल बियाणे तयार होत आहे. या बियाण्याची किंमत १३ कोटींवर सांगितली जाते. टोमॅटोचे क्षेत्र पावणे दोनशे हेक्टरपेक्षा अधिक असून यातून साडेतीनशे क्विंटल बियाणे बनते.

हे बियाणे सुमारे ४०कोटींपेक्षा अधिक किमतीचे आहे. कारल्याचे २३ हेक्टर क्षेत्र असून त्यात १८०० क्विंटल बियाणे बनते. याची किंमत १८ कोटींपर्यंत आहे. याशिवाय कलिंगड, खरबूज, कांदा, काकडी, दोडका अशा विविध पिकांचेही सध्या बीजोत्पादन शेतकरी घेतात.

जिल्ह्यात बीजोत्पादनासारख्या क्षेत्रात चांगली संधी आहे. काही तालुक्यांतील शेतकरी आज कमी जागेत चांगली मिळकत करीत आहेत. जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यांमध्येही बीजोत्पादनाचा विस्तार करणार आहोत. यासाठी शेतकऱ्यांना केव्हीकेच्या माध्यमातून तांत्रिक प्रशिक्षणे दिली जातील. बियाणे कंपन्यांनीही बीजोत्पादनासाठी पुढाकार घेण्याविषयी होकार दिला आहे.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा
पारंपरिक पिकांपेक्षा ही शेडनेडमधील तसेच खुल्या पद्धतीची बीजोत्पादक शेती खूप फायदेशीर ठरते आहे. पारंपरिक पिकांना बाजारात दर कमी मिळतात. उत्पादन खर्च वाढला आहे. दुसरीकडे शेडनेटमध्ये पिकवलेल्या बियाण्याचे दर निश्‍चित असतात. १० गुंठ्यातील बीजोत्पादनातून शेतकरी एक ते तीन लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
- विनोद चव्हाण, बीजोत्पादक शेतकरी, सेवानगर, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT