Sugar Market Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Export : ब्राझिलची वाढती ताकद निर्यातीसाठी धोक्याची

Team Agrowon

Pune News : जागतिक साखर उद्योगातील बलाढ्य ब्राझील आपली क्षमता सातत्याने वाढवतो आहे. साखर निर्मितीवर ब्राझिलने दिलेला भारतीय साखर निर्यातीला धोक्याचा ठरू शकतो, अशी भीती भारतीय साखर कारखाने संघटनेचे (इस्मा) कार्यकारी समिती सदस्य रवी गुप्ता यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत शनिवारी (ता.१३) आयोजित केलेल्या ‘साखर कारखान्यांमधील आर्थिक शिस्त व व्यवस्थापन’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जागतिक साखर उद्योगाचे अभ्यासक व जर्मनीतील बार्टेनचे संपादक अरविंद चुडासामा होते. ‘‘ब्राझिलने ऊस उत्पादन वाढवून ६५० दशलक्ष टनावर नेले आहे.

इथेनॉलच्या तुलनेत साखर उत्पादनाचे प्रमाण वाढवून ४८.५ टक्के केले आहे व ते पुढील वर्षी ५१ टक्क्यांपर्यंत राहू शकते. साखर निर्यात वाढवून दरमहा आता ३.५ दशलक्ष टनापर्यंत नेली आहे. ब्राझीलकडून इथेनॉल निर्मितीदेखील वाढवली जात आहे. ब्राझिलची घौडदौड सुरू असताना थायलंड, भारत, युरोपातील साखर निर्मितीत घट होते आहे,’’ असेही निरीक्षण श्री.गुप्ता यांनी वर्तविले.

रोख तरलता वाढली

‘‘देशातील साखर कारखान्यांनी व्यवसाय व कामकाजात सुधारणा केल्यामुळे रोख तरलता (कॅश लिक्विडीटी) वाढली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना ऊस दर अदा करण्यात होतो आहे,’’ असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

‘‘साखर साठ्याचे वेळेत विक्री व्यवस्थापन होत असल्यामुळे खेळत्या भांडवलावरील व्याजाचा भार कमी झालेला आहे. कारखान्यांनी गेल्या सहा वर्षांत ३४९ लाख टन साखर निर्यात केली. त्यामुळे इंडोनेशिया, श्रीलंका, बांगलादेश, इराक, सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये बाजार व्यवस्था तयार झाली,’’ असे ते म्हणाले. चालू २०२३-२४ मधील हंगामात देशात ४३४० लाख टन ऊस उपलब्ध होईल. ५२० साखर कारखान्यांमधील गाळपातून ३०५ लाख साखर तयार होईल. २८५ लाख टन देशांतर्गत वापर होईल, असाही अंदाज श्री. नाईकनवरे यांनी वर्तविला.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता दिशा देईल’

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर म्हणाले, की भारताच्या ऊस शेतीला दिशा देण्याची क्षमता कृत्रिम बद्धिमत्तेत (एआय) आहे. या तंत्रावर आधारित एक व्यावसायिक प्रारूप आम्ही तयार केले आहे.

त्याची अंमलबजावणी व्हीएसआयच्या सहकार्यातून केली जाणार आहे. ‘एआय’च्या मदतीने ऊस उत्पादनातील अडथळे अचूकपणे शोधले जातील. त्यातून मशागत खर्चात बचत, उत्पादनात वाढ आणि पिकात गुणवत्ता वृद्धी असा तिहेरी हेतू साध्य होईल.

‘आर्थिक शिस्त पाळावी लागेल’

दालमिया शुगर उद्योगचे सहायक कार्यकारी संचालक संतोष कुंभार म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांनी आर्थिक शिस्त पाळण्यासाठी नियमित सेवांचा आढावा दर आठवड्याला तर आर्थिक आढावा दरमहा घेण्याची गरज आहे. सॅपसारखी गुणवत्तापूर्ण सॉफ्टवेअर वापरायला हवीत. कारखान्यांनी वीज व वाफ वापरातील यंत्रांचे आधुनिकीकरण करायला हवे. प्रत्येक खाते प्रमुखाला खर्चबचतीचे उद्दिष्ट देत त्याचा आढावा दरमहा घ्यायला हवा.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT