Kolhapur News : देशात साखरेचे दर सध्या स्थिर आहेत. गेल्या महिन्यापासून साखरेचे दर प्रतिक्विंटल ३५०० ते ३६०० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. दिवाळीनंतर कमी झालेली मागणी अजूनही वाढली नाही. हंगाम संपल्यानंतरच साखरेचे दर वाढतील, अशी शक्यता कारखानदार तसेच उद्योगातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
साखर उत्पादन कमी होईल या शक्यतेने केंद्राने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले. या नंतर साखरेचे दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी उतरले. सणासुदीचे दिवस संपल्यानंतर मागणी एकदमच कमी झाली. ती अजूनही वाढली नसल्याचे चित्र आहे. सध्या तरी साखर बाजारात मंदीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबरच्या तुलनेत केंद्र सरकारने नोव्हेंबर, डिसेंबरसाठी जादा प्रमाणात कोटे दिले. बाजारात साखरेची टंचाई होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने विक्री कोट्यात वाढ केली. पण दिवाळीनंतर मागणीत एकदम घट झाल्याने अनेक कारखाने केंद्र सरकारने दिलेल्या कोट्याइतकी साखर विक्री करण्यासाठीही धडपडत असल्याचे चित्र आहे.
अजूनही काही कारखान्यांचे डिसेंबरचे कोटे शिल्लक आहेत. केंद्र सरकार सातत्याने साखरेची उपलब्धता स्थानिक बाजारात मुबलक प्रमाणात व्हावी यासाठी निर्णय घेत आहे. यामुळे साखर कमी प्रमाणात बाजारात येईल, अशी शक्यता कमी असल्याने व्यापारीही मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करण्यास धजावत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले.
सध्या तरी देशातील हंगाम वेगात सुरू असल्याने येत्या दोन-तीन महिन्यात साखरेची टंचाई फारशी भासणार नाही. इथेनॉलसाठी साखरेचा वापर कमी करण्यावर केंद्र सरकारचा भर राहिल्याने इथेनॉलकडे वळविण्यात येणारी साखर ही देशांतर्गत बाजारात उपलब्ध होण्याच्या शक्यतेने साखरेची टंचाई कमी प्रमाणात भासेल, असे कारखाना सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे निर्यातही पूर्णपणे बंद असल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम साखरेची खरेदी कमी होण्यावर झाला आहे. यामुळेच दरात फारशी वाढ नसल्याचे चित्र आहे.
कर्नाटकातील कारखान्यांकडून कमी दराने साखर विक्री
कर्नाटकातील काही कारखाने महाराष्ट्रातील कारखान्यांपेक्षा कमी दराने साखर विक्री करत आहेत. याचा फटका महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसला आहे. विशेष करून सीमा भागातील साखर कारखान्यांना कर्नाटकातील कारखान्यांमुळे नुकसान होत आहे. हे कारखाने महाराष्ट्रातील कारखान्यांपेक्षा कमी दराने टेंडर काढत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची साखरविक्री मंदावत असल्याचे एका कारखानदाराने सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.