Grape Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : द्राक्ष शेतीमध्ये प्लास्टिक कव्हरचा योग्य वापर

Grape Farming Plastic Cover Use : आपल्याकडे सध्या जे बागायतदार लवकर छाटणी करून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द्राक्षे बाजारात आणण्याचे नियोजन करत आहेत ते प्रामुख्याने बागेमध्ये प्लॅस्टिक कव्हरचा जास्त वापर करताना दिसतात.

डाॅ. एस.डी. सावंत

Grape Crop Management : आपल्याकडे सध्या जे बागायतदार लवकर छाटणी करून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द्राक्षे बाजारात आणण्याचे नियोजन करत आहेत ते प्रामुख्याने बागेमध्ये प्लॅस्टिक कव्हरचा जास्त वापर करताना दिसतात. या बागांमध्ये सर्वसाधारणपणे जुलै-ऑगस्टमध्ये छाटणी होते. सटाणा, फलटण, मायणी आणि जत जवळील काही भागांत लवकर छाटणी केली जाते.

या सर्व ठिकाणी पाण्याची उपलब्धता चांगली नसल्यामुळे येथे ठरावीक क्षेत्रामध्ये बागा आहेत. हवामानाचा कल पाहता या भागात पाऊस जास्त पडत नाही, म्हणून येथे हे शक्य होते. परंतु काही वर्षांपासून येथे अवेळी पाऊस जास्त होत असल्यामुळे बागेमध्ये प्लॅस्टिक कव्हर जरुरीचे झाले आहे.

पाऊस किंवा गारपिटीमुळे वेलींना होणारी दुखापत, घडांची कुज, केवडा रोग आणि जास्त आर्द्रतेमुळे मण्यांचे क्रॅकिंग या समस्यांपासून संरक्षण होण्यासाठी प्लॅस्टिक कव्हरचा वापर केला जातो. परंतु प्लॅस्टिक कव्हरचा यशस्वी वापर होण्यासाठी शास्त्रीय बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

प्लॅस्टिक कव्हर वापरताना

प्लॅस्टिक कव्हर वापरताना सर्वांत महत्त्वाचा विषय तापमान नियंत्रण हा आहे. प्लॅस्टिक कव्हर खालील पाने आणि घडांचे तापमान वापरलेल्या प्लॅस्टिकच्या प्रकारानुसार, उघड्या वातावरणातील कॅनोपीच्या तुलनेत सर्वसाधारणपणे ५ ते १० अंश सेल्सिअस जास्त असते. तापमान जास्त असणे हे चांगले का वाईट हे बाहेरच्या वातावरणातील तापमानावर अवलंबून आहे.

सर्वसाधारणपणे पानामध्ये कर्बग्रहण क्रिया ही ३० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत चांगली होते. त्यापेक्षा जास्त तापमानामध्ये ती हळूहळू कमी वेगाने होते आणि ३५ अंश सेल्सिअसनंतर संपूर्णपणे थांबते. लवकर छाटणी करणारे शेतकरी छाटणी करण्याआधी काही दिवसच प्लॅस्टिक अंथरतात.

मागील काही वर्षांचा तापमानाच्या नोंदी पाहिल्यास असे दिसून येते, की महाराष्ट्रातील द्राक्ष विभागांमध्ये जुलै ते डिसेंबरमध्ये किमान तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त फार कमी वेळा जाते. या अनुषंगाने विचार केल्यास प्लॅस्टिकचा वापर यशस्वी होण्यासाठी प्लॅस्टिक खालील कॅनोपीचे तापमान वातावरणापेक्षा ५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊन उपयोग नाही. यासाठी पुढील मुद्यांचा जरूर विचार करावा.

तापमान नियंत्रण

 प्लॅस्टिक पेपर तयार करताना त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन वापरून तापमान नियंत्रणाचा विचार केला जातो. प्लॅस्टिक कमी पारदर्शक केल्यास खाली कमी प्रकाश जातो. कव्हरखालील तापमान कमी राहते. असे करताना एक दक्षता घ्यावी लागते, की प्लॅस्टिक ४०० ते ७०० एनएम लांबीची सूर्यकिरणे अडवणार नाही.

कारण ४०० ते ७०० एनएमची सूर्य किरणे (पीएआर) कर्बग्रहण क्रियेसाठी वापरली जातात. ही किरणे प्लॅस्टिकने आडविल्यास प्लॅस्टिकखालील कॅनॉपीमध्ये कर्बग्रहण क्रिया होणार नाही. काहीवेळा प्लॅस्टिक ४०० ते ७०० एनएमची सूर्य किरणे कमी करते.

प्लॅस्टिक कव्हर तयार करताना त्यामध्ये विशिष्ट रसायन वापरून किंवा त्यावर वेगवेगळी नक्षी बनवली जाते. यामुळे जेणेकरून प्लॅस्टिकमधून सूर्यकिरणे जाऊन बाहेर पडताना वेगवेगळ्या दिशांना पसरवली जातात. त्यामुळे प्लॅस्टिक जवळची पाने जास्त उष्णतेने पिवळी पडत नाहीत. सूर्यकिरणे कॅनॉपीमध्ये सर्वत्र सारखी पसरतात, सर्व पाने चांगल्या रीतीने कर्बग्रहण करतात, त्यांची क्षमता वाढते.

कॅनॉपीपासूनची उंची

 सर्वसाधारणपणे वाय (Y) ट्रिलयसेसच्या सर्वांत उंच तारेपासून प्लॅस्टिक २ ते २.५ फुटांवर असावे. असे केल्याने कॅनॉपी आणि प्लॅस्टिक कव्हरमधील भागामध्ये हवा खेळती राहून तापमान नियंत्रित राहते. आम्ही असे पहिले आहे, की काही ठिकाणी कव्हर कॅनॉपीपासून ६ फूट उंचीवर लावले आहे.

असे उंच लावलेले कव्हर तापमान कमी करेल तसेच बागेला पाऊस आणि गारपिटीपासूनसुद्धा वाचवेल, परंतु हे कव्हर उंच असल्यामुळे वादळी पाऊस किंवा वाऱ्यामध्ये जास्त धोक्याचे आहे. अलीकडे उपलब्ध असलेले हायटेक प्लॅस्टिक कव्हर कॅनॉपीमध्ये वेगवेगळे फायदे मिळण्यास उपयुक्त आहे. परंतु हे कव्हर जास्त उंच लावल्यास हे सर्व फायदे मिळणार नाहीत.

कव्हरखाली वायुविजन

प्रत्येक ओळीवरील कव्हर अखंड प्लॅस्टिकचे न लावता, दक्षिणोत्तर ओळींच्या पश्‍चिमेला आणि पूर्वेला वेगवेगळे तुकडे लावून वरच्या बाजूला ते एकमेकांवर अशा रीतीने यावे, की त्यांच्या उंच भागातील फटीतून पावसाचे पाणी आत न येता, तेथून गरम हवा बाहेर जाण्यास जागा मिळावी. कव्हरच्या या रचनेमुळे कॅनॉपीमधील तापमान आणि आर्द्रता दोन्ही नियंत्रित राहून फायदा होतो.

बाहेरच्या देशामध्ये प्लॅस्टिक पेपर बनवतानाच पेपर वरच्या तारेवर जेथे स्थिरावतो, त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी छिद्रे दिलेली असतात. यातून गरम हवा बाहेर गेल्यास तापमान नियंत्रित राहू शकते. दोन ओळींतील अंतर नऊ फूट ठेवले असल्यास शेजारच्या दोन ओळींतील कव्हरमधील अंतर दीड ते दोन फूट राहते. त्यामुळे बागेतील वायुविजन चांगले होते.

पुढील भागात सप्टेंबर आणि त्यानंतर छाटणी करणाऱ्या बागांमध्ये प्लॅस्टिक कव्हरचा होणारा फायदा आणि अडचणी याबाबत चर्चा करणार आहोत.

थंडीपासून संरक्षण

द्राक्ष विभागातील मागील काही वर्षांतील किमान तापमानाच्या नोंदी पाहिल्यास असे दिसून येते, की डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात एक ते दोन थंडीच्या लाटा येतात. काही दिवस तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. ६ ते ७ अंश सेल्सिअस तापमान नाशिक, पुणे भागांत दरवर्षी नोंदविण्यात आले आहे. काही ठिकाणी रात्री थोड्या वेळेसाठी ते याहूनही कमी होते. काही भागातील पानांवर किंवा लोखंडाच्या पृष्ठभागावर पातळ बर्फाचा थर जमलेला दिसून आला आहे. यामुळे पाने करपतात किंवा घडामध्ये उकड्या होतो. सर्व घड उकळत्या पाण्यातून काढल्यासारखे काळपट दिसतात. यामुळे मोठे नुकसान होते.

थंडीच्या वेळी पांढऱ्या मुळ्या काम करत नाहीत, त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही. विशेषतः कॅल्शिअमची कमतरता आणि त्याच्याशी निगडित घड कुज दिसते. या सारख्या विकृती प्लॅस्टिक कव्हरने टाळणे शक्य आहे.

दिवसा सूर्यप्रकाशातून येणारी उष्णता बागेमध्ये पाने, खोड, लोखंडाचे अँगल आणि जमीन शोषून घेते. ही उष्णता सूर्यास्तानंतर इन्फ्रा रेड उत्सर्जनाद्वारे हवेत निघून जाते. प्लॅस्टिक पेपर तयार करताना इन्फ्रा रेड किरणे अडवू शकणारी किंवा परावर्तित करणारी रसायने मिसळलेली असल्यास बागेतील उष्णता प्लॅस्टिक कव्हरमधून हवेत जाऊ शकत नाही. त्यामुळे कव्हर खालील भाग रात्री उष्ण राहतो. कॅनॉपीचे थंडीपासून संरक्षण होते.

- डॉ. एस. डी. सावंत, ९३७१००८६४९

(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT