Farmer Management :
शेतकरी नियोजन
पीक : डाळिंब
शेतकरी : विष्णू प्रभाकर काळे
गाव : बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर
एकूण शेती : १० एकर
डाळिंब क्षेत्र : ७ एकर
बेंबळे (ता. माढा) येथे विष्णू प्रभाकर काळे यांची १० एकर शेती आहे. त्यात ३ एकरांत ऊस, तर ७ एकरांवर डाळिंब लागवड आहे. संपूर्ण डाळिंब लागवड ही टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे. सुरवातीच्या टप्प्यात साडेतीन एकर क्षेत्रावर डाळिंबाच्या भगव्या वाणाची लागवड करण्याचे ठरविले. त्यानंतर क्षेत्रामध्ये वाढ करत गेले. २०१७ मध्ये प्रथम १५०० हजार झाडांची लागवड केली. त्यानंतर मागील तीन महिन्यांपूर्वी साडेतीन एकरांवर
नव्याने दुसरी लागवड केली आहे. सध्या एकूण सात एकरांमध्ये डाळिंबाची ३००० हजार झाडे आहेत. संपूर्ण लागवड १२ बाय ८ फूट अंतरावर करण्यात आलेली आहे.
बागेत दरवर्षी आंबिया हा एकच बहार धरला जातो. या एकाच बहराचे काटेकोर व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेणअयाचा त्यांचा प्रयत्न असतो. एकरी सरासरी ८ ते ९ टन डाळिंब उत्पादन विष्णू काळे घेतात.
यंदा पाऊसमान जास्त झाल्यामुळे फळांवर काळ्या ठिपक्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आला. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या. सोबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कीटकनाशक फवारण्या घेतल्या. योग्यवेळी उपाययोजना केल्यामुळे रोग नियंत्रणात येण्यास मदत होत असल्याचे विष्णू काळे सांगतात. शेतीमध्ये वडील प्रभाकर काळे आणि छोटा भाऊ माणिक यांच्यासह आम्ही संपूर्ण कुटुंबीय काम करते.
व्यवस्थापनातील बाबी
सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता चांगली आहे. मात्र डाळिंबाची गुणवत्ता आणि उत्पन्न चांगले मिळविण्यासाठी वर्षातून एकच बहार धरण्याचे त्यांचे नियोजन असते. तसेच मार्केटचा विचार करता, आंबिया बहरातील फळांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे दरवर्षी आंबिया हा एकच बहार धरण्यावर भर दिला जातो.
डाळिंब बागेमध्ये रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन्ही पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. त्यात ८० टक्के सेंद्रिय आणि २० टक्के रासायनिक खतांचा वापर केला जातो.
आंबिया बहरासाठी जानेवारी-फेब्रुवारीपासून तयारी केली जाते. हा काळ तसा कमी पाण्याचा असतो, पण योग्य नियोजनामुळे हंगाम यशस्वी होतो. या बहरातील फळे साधारण जून-जुलैमध्ये विक्रीसाठी येतात. या कालावधीत दरही चांगले मिळतात, असा काळे यांचा अनुभव आहे.
आगामी नियोजन
हा ताण साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटी ठिबकद्वारे सिंचन करत तोडण्याचे नियोजन आहे.
फेब्रुवारीच्या मध्यात बागेतील झाडांची छाटणी केली जाईल. झाडावरील अतिरिक्त फुटी काढल्या जातील. त्यानंतर बोर्डोची फवारणी केली जाईल.
झाडांवरील अनावश्यक फळे काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाईल.
वातावरण बदलानुसार बागेचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला जाईल. बागेचे निरिक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशक-बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.
आंबिया बहर नियोजन
मागील हंगामातील फळांची ऑक्टोबर महिन्यात काढणी पूर्ण झाली. त्यानंतर बागेची स्वच्छता केली. वॉटरशूट काढून हलकी छाटणी केली.
साधारण ऑक्टोबरच्या शेवटी बाग ताणावर सोडण्यात आली. हा ताण साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटी तोडण्याचे नियोजन आहे.
छाटणी केल्यानंतर झाडांना खतांचे बेसल डोस दिले. त्यामध्ये निंबोळी पेंड, कंपोस्ट खत, सिलिकॅान, मॅग्नेशिअम आणि गांडूळखत यांच्या मात्रा दिल्या. याशिवाय चांगले कुजलेले शेणखत २० किलो प्रति झाड या प्रमाणे दिले.
हलक्या छाटणीनंतर दर १५ दिवसांनी शिफारशीत घटकांची फवारणी घेतली. त्यात ०ः५२ः३४, ०ः०ः५०, ६ बीए आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या फवारण्या केल्या.
ताण कालावधीत बागेत कोणतीही कामे केली जात नाही.
मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडांची खोडे बोर्डोचा वापर करून धुवून घेतली.
बागेतील तण काढून स्वच्छता केली.
कीड-रोग प्रादुर्भावासाठी बागेचे निरिक्षण करून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणी घेतली आहे.
विष्णू काळे ९७६३३५९६०९
(शब्दांकन : सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.