Pomegranate Insurance Scheme : आंबिया बहरामधील डाळिंबासाठी विमा योजना
विनयकुमार आवटे
Pomegranate Ambia Bahar : डाळिंब पिकासाठी विमा योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. गारपीट या हवामान धोक्यापासून आंबिया बहरामधील फळपिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी नियमित विमा व्यतिरिक्त वेगळा विमा हप्ता बँकेत भरावा लागतो.
योजनेअंतर्गत दोन वर्षे वय पूर्ण असलेल्या उत्पादन देणाऱ्या डाळिंब पिकास विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते. या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.
डाळिंब पिकासाठी बुलडाणा, जळगाव, सोलापूर, नाशिक, जालना, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, वाशीम, परभणी, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, हिंगोली या १७ अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात विमा योजना लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्राच्या आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.
या योजनेअंतर्गत दोन वर्ष वय पूर्ण असलेल्या उत्पादन देणाऱ्या डाळिंब पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण दिले जाते.
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग
या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.
पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करुन सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)
शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनी योजनेत सहभाग घ्यावा.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीवर फक्त विमा घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता ३५ टक्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हा निहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरवायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
गारपीट या हवामान धोक्यापासून आंबिया बहारामधील फळपिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी वरील नियमित विमा व्यतिरिक्त वेगळा विमा हप्ता बँकेत भरावा लागतो.
या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे. ) आणि उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके आणि दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यंत राहील.
सदर फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.
विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे.
भाडेपट्टीने शेती करत असल्यास भाडे करार नोंदणीकृत असावा .
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
(अधिक माहितीसाठी ः शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा. )
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रती हेक्टर
अवेळी पाऊस, जास्त तापमान, जास्त पाऊस १,६०,००० रु. ८,००० ते २०,००० रू.
गारपीट ५३,००० रू. २,६५० रू.
जिल्हे विमा कंपनी
जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, वर्धा, रत्नागिरी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड
जालना फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.
ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातुर, बुलडाणा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशीम बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
डाळिंब पिकासाठी हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर
हवामान धोका प्रमाणके (ट्रिगर) कालावधी व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु)
अवेळी पाऊस १५ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये १ दिवसात ५ मि.मी. पाऊस व आर्द्रता ७० टक्के पेक्षा जास्त दोन्ही एकत्रित घडल्यास नुकसान भरपाई रक्कम २४,००० रुपये देय राहील.
१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीमध्ये १ दिवसात १५ मि.मी. पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम ४०,००० रुपये देय राहील.
जादा तापमान १ एप्रिल ते ३१ मे १) या कालावधीमध्ये कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग २ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम २४,००० रुपये देय राहील.
या कालावधीमध्ये कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा जास्त सलग ३ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम ४८,००० रुपये देय राहील.
जास्त पाऊस १ जून ते ३० जून या कालावधीमध्ये १ दिवसात ४० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम ३२,००० रुपये देय राहील.
१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये १ दिवसात ५५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम ७२,००० रुपये देय राहील.
गारपीट १५ जानेवारी ते ३० एप्रिल विमा संरक्षित रक्कम ५३,००० रुपये (नुकसान भरपाई ही सर्वेक्षण आधारित राहील)
टीप : गारपीट हवामान धोक्यासाठी प्रती हेक्टरी २,६५० रुपये प्रमाणे वेगळा विमा हप्ता भरावा लागेल.
(लेखक कृषी आयुक्तालयामध्ये कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.