Sangli Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. जतमध्ये काँग्रेस, तर शिराळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गडाला धक्का दिला आहे. जतमध्ये गोपीचंद पडळकर, तर शिराळ्यात सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवला आहे. इस्लामपुरातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि पलूस-कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी आपले गड ताब्यात ठेवले आहेत. परंतु या दिग्गज नेत्यांनाही विजयासाठी झगडावे लागले आहे.
मिरजेत भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे, खानापुरात शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर, तर सांगली मतदार संघातून भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी धडाकेबाज कामगिरी करत पुन्हा विजय निश्चित केला आहे. 'तासगाव-कवठेमहांकाळ 'मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील यांनी 'वादळात दिवा' लावला आहे.
सांगली विधानसभा मतदार संघात बंडखोरीचा थेट फायदा विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना झाला. दहाव्या फेरीअखेर गाडगीळ यांना तब्बल २५ हजार मताधिक्य मिळाले होते. काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील आगि अपक्ष श्रीमती जयश्री पाटील यांच्या मतांची बेरीज ही गाडगीळांच्या मतां एवढी दिसत होती. त्यामुळे बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडल्याचे चित्र समोर आले.
मिरज मतदार संघात भाजपच्या सुरेश खाडे बांचा विजयाचा 'चौकार' निश्चित झाला. मिरज विधानसभा मतदार संघात ' उद्धव ठाकरे यांची मशाल जोरात असल्याच्या जोरदार चर्चा होत्या परंतु पालकमंत्री सुरेश खाडे यांचे काम आणि नेटवर्क शिवसेनेवर भारी ठरली.
पलूस कडेगावचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर राहावे लागले होते. परंतु विश्वजीत कदम यांच्या बालेकिल्ल्यात आल्यानंतर त्यांनी मुसंडी घेत आघाडी मिळवून विजय खेचला. नवव्या फेरीअखेर कदम यांना १६ हजारांवर मताधिक्य मिळाले. इस्लामपूर मतदार संघात पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या निशिकांत पाटील यांनी कडवी लढत दिली.
शिराळा विधानसभा मतदार संघात प्रचारातच आघाडी घेतलेल्या सत्यजीत देशमुख यांनी मतमोजणीतही जोरदार आघाडी घेतली होती. मानसिंगराव नाईक यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने जयंत पाटील यांची ताकद कमी करण्यात सम्राट महाडिक आणि सत्यजीत देशमुख यांना यश आले आहे.
जतमध्ये भाजप उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी दमदार कामगिरी केली. विक्रम सावंत यांचे जत विधानसभा मतदार संघावर वर्चस्व असुनही गोपीचंद पडळकर यांनी विजय खेचून आणला.
खानापूर मतदार संघातून सुहास बाबर यांनी मोठा विजय नोंदवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी -शरदचंद्र पवार पक्षाच्या वैभव पाटील यांच्यावर मात केली आहे. जिल्ह्यात जाहीर झालेला हा पहिला निकाल ठरला आहे.
राज्याचे लक्ष राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शादचंद्र पवार पक्षाच्या रोहित पाटील यांनी 'वादळात दिवा' लावत दमदार कामगिरी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.