Pune News : पंजाब आणि हरियानामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपला विरोध करणार असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी तसेच शेतकरी नेत्यांनी याआधीच जाहीर केले होते. याप्रमाणे पंजाबमध्ये भाजपच्या उमेदवारांना सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावं लागत आहे. येथे गुरुदासपूरमधून भाजपचे उमेदवार दिनेश बब्बू यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. यादरम्यान शनिवार (ता. ४) फरीदकोटचे उमेदवार हंसराज हंस, पटियालाचे उमेदवार प्रनीत कौर आणि अमृतसरचे तरनजीत सिंग संधू यांना देखील रविवारी (ता ०५) शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे.
शनिवारी (ता. ०४) भाजपचे उमेदवार दिनेश बब्बू निवडणूक प्रचारासाठी गुरुदासपूरच्या साठियाली गावात पोहोचले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत अनेक प्रश्नांचा भडीमारा करत भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही टीका केली. आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीकडे कूच करू न दिल्याबद्दल आणि त्यांच्यावर बळाचा वापर केल्याबद्दल दिनेश बब्बू यांना शेतकऱ्यांनी घेरले. तसेच सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी न दिल्याबद्दल सरकारचा निषेध शेतकऱ्यांनी नोंदवला. तसेच पुढील काळातही भाजपच्या उमेदवारांविरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
बब्बू यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागल्याची घटना ताजी असतानाच भाजप उमेदवार हंसराज हंस यांना देखील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. फरीदकोट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असणारे हंस यांना मोगाच्या डेमरू गावात रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान वाढत्या विरोधामुळे हंस यांना आपला दौरा रद्द करावा लागला.
यावेळी शेतकरी नेते इक्बाल सिंग म्हणाले की, त्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली भाजप नेत्यांना विरोध केला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. भाजपच्या कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने गावोगावी जाऊन मते मागितली तर त्याला त्याच पद्धतीने विरोध केला जाईल. संयुक्त किसान मोर्चाने भाजपवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे भाजपच्या कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने मतांचा जोगवा मागू नये.
भाजपच्या या नेत्यांना विरोध कायम
पंजाब आणि हरियानामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपला विरोध शेतकरी करत आहेत. हा विरोध आता वाढत असून निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक होत आहे. तर भाजपच्या काही उमेदवारांना शेतकऱ्यांच्या सतत विरोधाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये फरीदकोटचे उमेदवार हंस राज हंस, अमृतसरचे उमेदवार तरनजीत सिंग संधू आणि पटियालाचे उमेदवार प्रनीत कौर हे आहेत.
शेतकरी सरकारवर नाराज
संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने आधीच स्पष्ट केले होते की, ते भाजप उमेदवारांना विरोध करतील. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला धडा शिकवण्यासंदर्भात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचतील आणि तसे आवाहन करतील. तसेच आपल्या आंदोलनाचे कारण ते लोकांना समजावून सांगितील. याप्रमाणे आता शेतकरी नेते गावोगावी जावून आपले काम करत असून हमीभाव कायद्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी लढत आहेत. यामुळे सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर नाराज येथील शेतकरी नाराज आहेत.
शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी
एसकेएम (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. ते १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत असून आता लोकसभा मतदानाच्या तोंडावर भाजपच्या उमेदवारांना विरोध केला जात आहे. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.
भाजपला विरोध कायम
संयुक्त किसान मोर्चा (SKM) समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे की ते सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगतील. लोकसभा निवडणुकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा विरोध सुरूच राहणार आहे. यावेळी शेतकरी नेते विकास सिसार म्हणाले की, प्रचारादरम्यान ते इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची आणि उमेदवारांचीही धरपकड केली जाईल. त्यांना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रश्नांना सामोरे जावं लागेल. पण देशभरातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्या भाजपला आमचा विरोध कायम असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.