सजल कुलकर्णी, अजिंक्य शहाणे
Indigenous Breeds: महाराष्ट्र हे जैवविविधतेने नटलेले राज्य आहे. विशेषतः पाळीव जनावरांच्या जाती संबंधात तर प्रत्येक भूप्रदेशाची खासियत असलेल्या जाती आपल्याला दिसतील. कोकणापासून तर पूर्व विदर्भापर्यंत अनेक पशुंच्या जाती आपल्याला दिसतात. नोंदणी झालेल्या जातींव्यतिरिक्त अनेक जनावरांच्या जाती त्या त्या ठिकाणी शतकानुशतके तग धरुन आहेत आणि थोड्याफार प्रमाणात का होईना अर्थव्यव्स्थेला हातभार लावत आहेत. स्थानिक जाती ह्या विशेषकरुन कमी देखभाल म्हणजे ज्याला आपण मेंटेनंन्स म्हणतो यात उत्पादन देतात.
आतापर्यंत महाराष्ट्रात मुख्यतः पाच गोवंश, चार म्हैस, चार शेळी, दोन मेंढी आणि दोन कोंबड्यांच्या जाती नोंदणीकृत झालेल्या आहेत. याशिवाय अनेक जाती उपजाती महाराष्ट्रात पशुपालकांकडे दिसतील ज्यांची अजून नोंद नाही ज्यांचा अजूनही अभ्यास झालेला नाही. खालील तक्त्यामधे भौगोलिक विभागानुसार तेथील स्थानिक जनावरांच्या नोंदणी न झालेल्या जनावरांच्या जाती दिलेल्या आहेत याचे संदर्भ जिल्ह्या जिल्ह्याच्या गॅझेटियर आणि ब्रिटिशांनी केलेल्या अभ्यासात सापडतील.
स्थानिक जनावरांच्या बाबतीत या आधीही लिहिताना वारंवार मी स्थानिक लोकांचा, परिस्थिचा उल्लेख केला आहे. तिथल्या स्थानिक हवामानाचा त्याच्याशी असलेला संबंध हे देखील ही विविधता दिसण्यात महत्त्वाचे कारण आहे. आणि कितीही वंशसुधारण्याचे प्रयत्न केले गेले, कितीही संकरीकरणाचे प्रयोग केले गेले तरिही अश्या स्थानिक पशुप्रजातींची संख्या ही ¾ इतकी पशुगणनेमधे दिसून येते. सरसकट गावठी किंवा शास्त्रीय भाषेत एन. डी. (नॉन डिस्क्रिप्ट) असे त्याला संबोधून एकंदर संकरीकरण आणि वंशसुधार वगैरे कसे महत्त्वाचे आहे हेच मुख्यतः सरकारी धोरणातून दिसून येते.
स्थानिक जनावरांचे प्रमाण त्यांचे गुण त्यांच्या उपयोगीततेच्या दृष्टीने बारकाईने तपासणे गरजेचे आहे. दूध, मांस इत्यादी बाजारासाठी असलेल्या पशुउत्पादनाच्या सबलीकरणामधे इतर राज्यातून, देशातून पशुंची आयात केलेली आपल्याला दिसते. विशेषतः सध्या तर गीर गाय, सिरोही शेळी आणि कडकनाथ कोंबडी हे तर देशभक्ती दाखवायचे एक साधन झालेले दिसते, परंतु याचा दूरगामी परिणाम स्थानिक पशुपालन व्यवस्थेवर होऊ शकतो. वयोवृद्ध आणि परंपरागत ज्ञान असलेल्या शेतकर्यांशी देखील चर्चा करताना या स्थानिक जातींचा उल्लेख त्यांची नावे हे आपल्याला कळतील, कालांतराने याबाबत विचार नं झाल्याने त्या जातींचा ग़ावठी, देशी, मुलखी असाच संदर्भ उरलेला आहे.
नोंदणी झालेल्या जनावरांची कहाणी फार काही वेगळी नाही. नोंदणी झालेल्या जातींमधे देखील उपप्रकार दिसतील. एकट्या खिल्लार जातीमधे आठ उपप्रकार आहे. डांगी जातीमधे पाच, तसेच लाल कंधारीत चार. नागपुरी म्हशीत तीन प्रकार म्हटले जातात. परंतु खरच हे तीन प्रकार आहेत की या वेगवेगळ्या जाती, हा संभ्रम आहे. फक्त नोंदणी करणे म्हणजेच पशुसंवर्धन नाही तर त्याचा व्यवस्थेशी आणि उपजिविकेशी संबंध लावणे हे देखील महत्त्वाचे आहे. नाही तर जनावरे देखील गावठी आणि पाळणारे देखील गावठी राहतील. परदेशांमधे जातीनुसार पशुंच्या उत्पादन केलेल्या पदार्थांची बाजारपेठ तयार झालेली दिसते हे आपल्याकडे होणे गरजेचे आहे. गौळाऊ गाईचे चीज बाजारात आले तर? सातपुडी कोंबडीचे चिकन क्युब्स मिळाले तर? असे प्रश्न पडायला हवेत नाही तर कोस्ट टू कोस्ट सेम टेस्ट अश्या स्थानिक व्यवस्थेला, चविला आणि अर्थव्यवस्थेला मारक संकल्पनांना चेव येईल.
२०१४ साली राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाने महाराष्ट्र जीन बॅंक नावाने एक प्रकल्प महाराष्ट्रातील संस्थाना सोबत घेऊन पुढे आणला आहे, स्थानिक जैवविविधता ही स्थानिक लोकांच्या माध्यमातून संवर्धित करणे हे या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे ह्यात देखील पाळीव जनावरांच्या जातींचा विचार केला गेला आहे. परंतु अश्या प्रकारचा सर्वसमावेशक कार्यक्रम क्वचितच आखला जातो आणि अश्या प्रकारे विचार न करणे ही खरी पाळीव जैवविधता कमी होण्यामागे बोंब आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.