Bidri Sugar Factory Kolhapur : मागील हंगामात बिद्री साखर कारखान्याकडे गळितास आलेल्या उसाला ३४०७ रुपयांचा दर जाहीर केला होता. यापैकी पहिला हप्ता ३२०० रुपये विनाकपात सभासदांच्या खात्यावर जमा केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १०० रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच अदा केला, तर येत्या दिवाळी सणापूर्वी उर्वरित १०७ रुपयांचा तिसरा हप्ता देणार असल्याची घोषणा अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.
बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेपुढील आयत्या विषयासह सातही विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. सभा खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली. कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘कारखान्याचा कारभार स्पष्ट व पारदर्शी, तसेच राज्यात अग्रेसर असतानाही विरोधकांनी अकांडतांडव करीत कारखान्यावर अनेक आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कारखान्याचा उपपदार्थ निर्मिती डिस्टिलरी प्रकल्पाची नाहक तपासणी लावून कारखान्याचा कारभार विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. सत्तेचा गैरवापर करून कारखान्याला वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले होते. परिणामी प्रकल्प उभारणीचे काम लांबणीवर पडले. यामागील सूत्रधार कोण हे जगजाहीर आहे. मात्र, न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘विस्तारीकरणानंतर कारखान्याची गाळप क्षमता ७५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे. परंतु गेल्या हंगामात दैनंदिन आठ हजार मेट्रिक टन क्षमतेने यशस्वी गाळप झाले. पुढील हंगामात १० हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या गळीत हंगामात उच्चांकी गाळपासह सर्वच उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सभासदांनी आपला सर्व ऊस बिद्री कारखान्याला पाठवून सहकार्य करावे.’
यावेळी सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, माजी संचालक, कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत व विषय पत्रिकेचे वाचन केले. ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.