डॉ. उज्ज्वल राऊत
Papaya Varieties: पपई हे उष्ण कटिबंधातील पीक आहे. पिकाच्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामानाची आवश्यकता असते. समशीतोष्ण कटिबंधात देखील पपईची झाडे चांगली वाढतात. जोरदार वारे आणि हिवाळ्यातील कडाक्याची थंडी, दव आणि धुके या पिकाला हानिकारक ठरते. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास पपई फळे पक्व होण्याची क्रिया थांबते. तसेच काही प्रमाणात झाडाची वाढ व फळधारणा होण्यास अडचण निर्माण होते. तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास पिकावर प्रतिकूल परिणाम होतो. पपईची लागवड वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत करता येते.
जमीन
पपई लागवडीकरिता प्रामुख्याने जमिनीचा पोत हा महत्त्वाचा घटक आहे. पपई लागवडीसाठी मध्यम, उत्तम निचऱ्याची जमीन योग्य ठरते. पाणी साचून राहिल्यास मूळ, खोडसड रोगाचा प्रादुर्भाव होतो. पपई झाडांच्या मुळ्या उथळ आणि ठिसूळ असल्याने योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत त्या सडतात. त्यामुळे वाढ थांबते, काही वेळा झाडे मरतात.
सुधारित जातींची वैशिष्ट्ये
पपईंच्या जातीमध्ये प्रामुख्याने उभयलिंगी व द्विभक्ती लिंगी जाती आढळून येतात. द्विभक्त लिंगी जातीमध्ये नर मादी फूल वेगवेगळ्या झाडावर असतात, तर उभयलिंगी जातीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर आढळून येतात. प्रामुख्याने उभयलिंगी जातीची लागवड फायदेशीर ठरते.
अ) द्विभक्तलिंगी जाती ः पुसा डॉर्फ, कोइमतूर- ४, कोइमतूर - ९, वॉशिंग्टन, तैवान - ७८६
ब) उभगलिंगी जाती ः कुर्ग हनीड्यू (मधुबिंदू), पुसा डेलिशिअस, कोइमतूर - ३, कोइमतूर - ६
कुर्ग हनीडयु (मधुबिंदू)
ही जात उभयलिंगी प्रकारची असून झाडांची लागवड केल्यावर १०० टक्के फळे लागतात. चांगली उत्पादनक्षमता असून, एका झाडापासून ३० ते ४० फळे मिळतात.
फळे लांब आकाराची असून गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे फळे चवीला अतिशय गोड असतात.
कुर्ग हनीडयु (मधुबिंदू)
ही जात उभयलिंगी प्रकारची असून झाडांची लागवड केल्यावर १०० टक्के फळे लागतात. चांगली उत्पादनक्षमता असून, एका झाडापासून ३० ते ४० फळे मिळतात.
फळे लांब आकाराची असून गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे फळे चवीला अतिशय गोड असतात.
पुसा डेलिशिअस
पपईची उभयलिंगी प्रकाराची जात असून लागवड केल्यावर १०० टक्के फळे येतात.
चांगली उत्पादनक्षमता, झाडाचे खोड मजबूत असून फळे जमिनीपासून १६० सें. मी. उंचीपासून वर लागतात.
फळातील गराला अत्यंत चांगली चव, स्वाद आणि गोड गर असतो. साखरेचे प्रमाण १० टक्के असते.
एका झाडापासून ३० ते ४० फळे प्रतिवर्षी मिळतात. फळांचे वजन सरासरी १ ते १.२ किलो असते.
पुसा डॉर्फ
द्विभक्तलिंगी प्रकारची जात असून झाडे ठेंगणी आणि जास्त उत्पादने देणारी आहे.
लागवडीनंतर झाडांना २३५ दिवसांचे अगोदर जमिनीपासून ४० सें. मी. उंचीपासून फळे लागतात.
फळे मध्यम आकाराचे असतात. फळांचे वजन सरासरी १ ते १.५ किलो असते.
फळातील गर अतिशय गोड असतो. गर मधुर व नारिंगी घट्ट असतो.
या जातीमध्ये घन लागवड अतिशय चांगली आहे. तसेच सोसाट्याचा वारा जेथे वाहतो तेथे ही जात लागवडीकरिता फायदेशीर ठरते.
सी. ओ. ३
ही जात उभयलिंगी प्रकारची असून, झाडे जोमदार वाढीची उंच असतात.
फळे मध्यम आकाराची असतात. गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून गर गोड असतो. गराचा रंग लालसर असून ब्रीक्स १४.६ टक्के असते.
फळांचे वजन सरासरी ०.५ ते ०.८ किलो असते. एका झाडापासून दरवर्षी ९० ते १२० फळे मिळतात.
सी.ओ. २, सी. ओ. ४ , सी. ओ. ५, सी. ओ. ९, सी. ओ. ७ या जाती पेपेन उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या आहेत. त्यापैकी सी. ओ. ७ ही जात उभयलिंगी असून बाकीच्या द्विभक्तलिंगी जाती आहे.
वॉशिग्टन
ही जात द्विभक्तलिंगी प्रकारची असून नर फुलांचे प्रमाण कमी असते.
या झाडाच्या पानांचे देठ जांभळ्या खोडावर जांभळ्या रंगाचे ठिपके असून झाडे बुटकी असतात.
फळे, लांब, वर्तुळाकार, सरासरी वजन १.५ ते २ किलो असून गर केशरी, चवदार असतात.
उत्पादनास चांगली जात आहे.
तैवान- ७८५ आणि तैवान ७८६ (उभयलिंगी प्रकारच्या)
सध्या महाराष्ट्रात इतर जातींबरोबर तैवान-७८५ व तैवान-७८६ या जातींची लागवड वाढत आहेत.
लागवड व तोडणी साधारणपणे वर्षभर चालू असते.
या जातीच्या झाडांना १०० ते १२५ फळे लागतात. यापैकी ६० ते ७० फळे मोठ्या आकाराची व लांबच्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य असतात.
फळांचे सरासरी वजन १ ते १.५ किलापर्यंत मिळते. तर काही वेळेस २ किलोपर्यंत वजनाची मिळतात.
फळांचे उत्पादन १०० ते १२५ मे. टन प्रति हेक्टरपर्यंत मिळते.
लागवडीसाठी शुद्ध बियाणे वापरल्यास या जाती विषाणूजन्य रोगास बळी पडत नाही
झाडांची उंची कमी असून, हेक्टरी ४४४४ झाडांची लागवड करता येते.
रोपवाटिका निर्मिती
पपईची लागवड बियांपासून रोपे तयार करून किंवा बियांची थेट लागवड करून केली जाते. जातीवंत रोपे मिळविण्यासाठी बियाण्यांची खरेदी अधिकृत खात्रीलायक ठिकाणावरूनच करावी.
रोपे तयार करण्यासाठी १० सेंमी बाय २० सेंमी आकाराच्या पॉलिथिन पिशव्या वापराव्यात. पाण्याच्या निचऱ्यासाठी पिशव्यांच्या तळाकडील भागाला छिद्रे पाडून घ्यावीत. चांगले कुजलेले शेणखत व तेवढीच चांगली माती एकत्र मिसळून पिशव्या भरून घ्याव्यात. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खत-माती मिश्रणामध्ये नीम केक पावडर मिसळून घ्यावी.
बी पेरण्या अगोदर पिशव्यांतील माती मिश्रण पाण्याने ओले करून घ्यावे. वाफसा आल्यावर प्रत्येक पिशवीत जातीप्रमाणे १ ते २ बिया साधारणपणे १ ते १.५ सेंमी खोलीवर टोकून घ्यावे. जरुरीप्रमाणे नियमित पाणी द्यावे.
बियांची उगवण १० ते १५ दिवसांत होते. बियांची उगवण चांगली व लवकर होण्यासाठी बी जिब्रेलिक ॲसिड १०० मिलि प्रति १ लिटर पाण्यात मिसळून विरघळून तयार झालेल्या द्रावणात दोन तास बुडवून नंतर सावलीत वाळवून टोकावे.
एक हेक्टरवर रोप लागवडीसाठी २०० ते २५० ग्रॅम बी पुरेसे होते.
रोपे ५ ते १० सें. मी. उंचीची झाल्यानंतर कॉपर ऑक्झिक्लोराइड २ ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे द्रावण तयार करून ते प्रत्येक पिशवीत २५ मिलि या प्रमाणात टाकावे.
बियांची उगवण होण्यासाठी साधारणपणे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तापमान २३ अंश सेल्सिअसच्या खाली किंवा ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास त्याचा उगवणीवर परिणाम होतो.
पिशवीतील रोपे ४५ ते ६० दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवडीस तयार होतात. पुनर्लागवड करतेवेळी पॉलिथिन पिशवी अलगद काढून मातीची हुंडी न फुटता रोपांची लागवड करावी.
- डॉ. उज्ज्वल राऊत, ९८५०३ १४३५२, (फळशास्त्र विभाग, उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.