BBF Agrowon
ॲग्रो विशेष

BBF Technology : बेड तारी त्याला कोण मारी

Team Agrowon

विजय कोळेकर

Crop Management : खरिपामध्ये अनियमित पावसाने पिकांची आणि शेतकऱ्यांची मोठी परीक्षा घेतली. त्यातून बाहेर पडतो न पडतो तोच रब्बीच्या वाढत्या पिकांवर अवकाळी आणि गारपिटीने घाला घातला. या दोन्ही संकटांतून असे शेतकरी सुरक्षित राहिले, ज्यांनी त्यांची पिके बेडवर लावली होती.

“दीड महिनाभर पावसाचा एक टिपूस न्हाय, वाटलं आता गेलं सगळं हातचं... पण बेडवर टोकलेल्या कपाशीला कायबी धोका झाला नाही.. खरंच माझ्या कपाशीला बेडनंच तारलं... अन वाचलो एकदाचा...”. “काय सांगायचं हरभरा फुलावर आला अन् ह्यो जोराचा पाऊस पडला सलग दोन- तीन दिवस, माझं बेडवरचं पीक तेवढं वाचलं अन् बाकीच्यांच पीक उमाळून पडलं वो” या दोघा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बेडवर पिकांची लागवड केलेल्या हजारो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. बदलत्या हवामानाचे भयंकर स्वरूप दुष्काळाच्या रूपाने वाटचाल करत असताना तसेच अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिलेली असताना हुशारीने शेतीमध्येदेखील बदल करणाऱ्या अशा शेतकऱ्यांचे अनुभवच राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिशा दाखवतील.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बदलत्या हवामानास तोंड देत शेती करण्याचे तंत्र सातत्याने शिकविण्यात येत आहे. अशा अनेक हवामान अनुकूल तंत्रांपैकी रुंद वाफा सरी (बीबीएफ) आणि शून्य मशागत पद्धत या दोन तंत्रांची ताकद ओळखून त्यांचा व्यापक प्रसार करण्यात प्रकल्पाला चांगले यश येत आहे.

परिणामी हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पद्धतीमध्ये मोठे बदल केले आहेत. या सर्वांनी पिकांची पेरणी किंवा टोकन सपाट जमिनीवरून गादीवाफ्यावर आणली आहे. सध्याचा अत्यंत लहरी हवामानात शेतीमधील जोखीम वाढत चालली आहे. चालू वर्षी मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि झालेही तसेच.

खरिपामध्ये दोन प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. पहिली म्हणजे पावसाला उशिरा सुरुवात आणि दुसरी म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पावसात पडलेला खंड. या दोन्ही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये बदल करावेत असे आवाहन यापूर्वी अॅग्रोवन मधून (७ जून २०२३ ला हवामान बदलतंय आपणही बदलूया) केले होते. सातत्याने या मूलभूत बदलाबाबत आग्रही भूमिका मांडून शेतकऱ्यांचे मन परिवर्तन केल्याशिवाय राज्यातील शेती शाश्वत होणार नाही, या मतापर्यंत आम्ही आलो आहोत.

असे बदल करण्याचा निर्णय वैयक्तिक तसेच सामूहिकरीत्या घेतल्याची उदाहरणे आणि त्यांचे दृश्य परिणाम आता समोर येत आहेत. राज्याच्या सर्व हवामान विभागांतून प्रयोगशील आणि होतकरू शेतकरी बदल घडविण्यासाठी तयार होत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकरी शेतीच्या या क्रांतिकारी बदलाचे नेतृत्व करताना दिसत आहेत. त्यांचे अनुभव इतके बोलके आणि आश्वासक आहेत की सध्या सर्वांना भेडसावणारे शेतीमधील कुपोषित मातीचे, वाढत्या खर्चाचे, घटत्या उत्पादकतेचे, वाढत्या जोखीमेचे आणि नैराश्याचे प्रश्न सुटण्यासाठी सकारात्मक दिशा लवकरच गवसेल, अशी अशा निर्माण झाली आहे.


उदाहरणादाखल काही प्रातिनिधिक शेतकऱ्यांचा येथे उल्लेख करीत आहे. कोकणातील परशुराम आगिवले (कर्जत, रायगड), घाटमाथ्यावरील किरण यादव (भोर, पुणे), उत्तर महाराष्ट्रातील राजेंद्र पवार (कमखेडा, धुळे), मराठवाड्यातील प्रभाकर सुसलादे (रुइखेडा, छत्रपती
संभाजीनगर) व दीपक देशमुख ( देवळा, बीड), विदर्भातील दिलीप फुके (चांभई, वाशीम), महेश जाधव (कोलवड, बुलढाणा) व राजेंद्र डाखरे (हातलोणी, चंद्रपूर) या आणि अशा ५००० हून अधिक शेतकऱ्यांनी राज्यभरामध्ये त्यांच्या त्यांच्या भागातील भातापासून कापसापर्यंत सर्व प्रकारची पिके बेडवर लागवड करून नवीन पायंडा घालून दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव, रुइखेडा, बोधवड, मालेगाव ठोकळ अशा काही गावांमध्ये सामूहिक स्वरूपात बेडवर लागवडीची आणि केलेले बेड न मोडण्याची परंपरा सुरू होत असून ही गावे लहरी पावसाला निश्चित समर्थपणे तोंड देण्यास तयार होत आहेत.
बेडवर पिकांची लागवड करून या शेतकऱ्यांनी नेहमीच्या मशागतीबाबत शिफारशींनादेखील फाटा देऊन सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीवर कमी खर्चात काबू मिळविला याची नोंद घ्यायला हवी.

ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या बेडवर चालू खरिपात लागवड केली त्यांनी उन्हाळी नांगरणी केली नाही, खोल नांगरणी केली नाही, कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या मारल्या नाही, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोळपणी केली नाही, डवरा मारला नाही, दोरी बांधून पिकांच्या मुळाजवळ माती लावली नाही, मृत सरी (डेड फरो) काढली नाही तर फक्त बेडवर बियाणाची पेरणी किंवा टोकन केली, तणनाशकांच्या एक-दोन फवारण्या केल्या आणि निवांत राहिले.

परिणामी ह्या शेतकऱ्यांची पिके तुलनात्मकदृष्ट्या मशागत करून सपाट जमिनीवर घेतलेल्या पिकांपेक्षा चांगल्या प्रकारे तग धरून राहिली. अशा प्रकारे शेतीच्या संकल्पनेत मूलभूत बदल करून हवामानास तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रयोगांची दखल घेऊन कोरडवाहू शेती संशोधन अधिक शेतकऱ्याभिमुक करण्याची वेळ आली आहे.

बीबीएफ तंत्राने लागवड करण्याच्या शिफारशींचा प्रभाव अधिक वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, तालुका बीज गुणन प्रक्षेत्रावरील पिके टप्प्याटप्प्याने बीबीएफ तंत्रानेच पेरली पाहिजेत असे दिसत आहे. सर्व अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांची लागवड एकदा का बीबीएफ वर आणता आली तर राज्यातील कोरडवाहू शेतीची मोठी समस्या दूर होऊ शकेल, अशी आशा आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये बीबीएफ यंत्रांची भाडेतत्त्वावर सेवा सुरू करण्याची आवश्यकता असून त्यामुळे देखील युवक आणि महिला शेतकऱ्यांना व्यवसाय निर्माण होऊ शकतो.

वर्धा जिल्ह्यातील भिडी (देवळी) येथील महिला गटांकडून मागील तीन वर्षांपासून प्रत्येक हंगामात किमान ३०० एकरावर बीबीएफने पेरणी करून दिली जाते हे एकच उदाहरण राज्याला दिशादर्शक आहे. बीबीएफ बरोबरच बेडवर पिके घेण्याचे फायदे सांगताना सर्व शेतकऱ्यांकडून जमिनीत ओलावा टिकत असल्याने पिके लवकर सुकत नाहीत आणि अति पाऊस पडल्यावर निचरा होऊन पाणी शेताबाहेर निघून जात असल्यामुळे पिकांच्या मुळाभोवती लवकर हवा खेळती राहण्यास मदत होत असल्याचे आवर्जून नमूद केले जात आहे. म्हणजे जमिनीतील हवा-पाण्याचे गणित समजून घेऊन शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे हवामान बदलावर मात करण्याचे उपाय सापडतील, अशी आशा करण्यास हरकत नसावी.

परंतु मनात एक प्रश्न निर्माण होतो की बेडवर शेती करणे अधिक खर्चाचे होत नाही का? यावर कापूस उत्पादकांचे म्हणणे आहे की पहिल्या हंगामात चार- साडेचार फूट रुंदीचा बेड करण्यासाठी जो खर्च येतो तोच काय तो खर्च आणि नंतर आंतरमशागतीचा खर्च नाही आणि पुन्हा बेड मोडायचा नसल्याने नांगरणी, रोटा मारणे, कुळवणी इ. कामे करावी लागत नाहीत तर खर्च वाढायचा प्रश्नच येत नाही.

उलटपक्षी बेडवर शेती करण्यामुळे खर्चात मोठी बचत होत असल्याचे सर्वच जिल्ह्यांमध्ये अनुभवायला येत आहे. दर हंगामात शेतीची ही मशागतीची कामे करण्यासाठी येणारा एकरी ५ ते ८ हजारांपर्यंतचा खर्च वाचत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वार्षिक दहा ते पंधरा हजारांची बचत करण्यासाठी आम्हाला फक्त सपाट जमिनीवरून बेडवर टोकन करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. भविष्यात लहरी पावसाला देखील न घाबरता तोंड देणे आवाक्यात येईल, यात शंकाच नाही.

विजय कोळेकर : ८३६९४७२१९८
(लेखक नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचे मृदा विज्ञान विशेषज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT