Mumbai News : आहारातील एक तृतीयांश भाग हा परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे ५ ते ४० टक्के पीक उत्पादनात वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बोरगाव (सातारा) येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या स्वाती गुरवे यांनी केले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातील ‘शेती आणि मधमाशा पालन’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. या परिसंवादात कोसबाड (ठाणे) कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. उत्तम सहाने यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. सी. एस. पाटील होते.
गुरवे म्हणाल्या, ‘‘आपल्या आहारातील एक तृतीयांश भाग परागीभवनाद्वारे मिळतो. परागीभवनाची प्रक्रिया होण्यासाठी महाराष्ट्रात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती आहे. मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे ५ ते ४० टक्क्यांपर्यंत पीक उत्पादनात वाढ झालीआहे. उत्पादनांची गुणवत्ता राखून उत्पन्न अधिक पौष्टिक असते असेही संशोधनात पुढे आले आहे. विविध फळे, भाज्या, धान्य, तेलबिया आणि इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते.
निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. पिकांना कीटकांपासून वाचविण्यात मदत होत असते. तेलवर्गीय मोहरीत ४३ टक्के, सूर्यफुलात ३२ ते ४८ टक्के, करडईत २८ टक्के, तीळ २२ ते३७, सोयाबीन १९ टक्के, एरंडी ३०, जवस १७ ते ४०, नायगर २२ टक्के उत्पादन वाढ परागीभवनामुळे झाली आहे. मधमाशांमुळे मिळणारा मध हे सर्वांत पौष्टिक अन्न मानले जाते. डोळ्यासाठी हितकारक, स्वरामध्ये सुधारणा, बुद्धिधारणक्षमता वाढविणारा म्हणून मधाची ओळख आहे.
खोकला, पित्त, कफ, क्षय, कर्करोग, मधुमेह, ह्रदयरोग, मळमळ यावर मध गुणकारी आहे. तसेच भूक वाढविण्यासाठीही तो उपयुक्त आहे. मधमाश्यांच्या संवर्धनासाठी आपण फुले देणाऱ्या झाडांची लागवड करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. मधमाश्यांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करून शेतात किमान एक तरी मधमाशी वसाहत असावी अशी व्यवस्था केली पाहिजे. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. शेतात असलेल्या मधमाशींच्या पोळ्याचे संगोपन केले पाहिजे तसेच प्रतिकूल हवामान असल्यास मधमाशी पेट्यांची काळजी घेण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
डॉ. सहाणे म्हणाले, ‘‘मधमाशी अर्धा ते एक किलोमीटर भागात फिरून एक पोळी तयार करते. फुलोरी मधमाशी हे परागीभवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मधाचा भाग वेगळा काढून आपण मधमाशीचे पोळी वाचू शकतो पुन्हा ते पोळे पूर्ववत लावल्यास त्यावर बाहेर गेलेल्या माश्या परत येतात.
एका मधमाशीचे पोळे नष्ट करणे म्हणजे त्याचे शिवारातील उभे पीक नष्ट करण्यासारखे आहेत. आग्यापोळ्यात पन्नास हजार ते एक लाख मधमाश्या असतात. जाळ करून किंवा धूर करून माश्या उडवल्या आणि मध काढला तर जवळपास २५ एकरामधील जंगल नष्ट झाल्यासारखे आहे.
डॉ. सी. एस. पाटील म्हणाले, ‘‘३५१ मिलि मिलियन टन फळांमधून मकरंद गोळा करून मधमाशी एक लिटर मध बनवते. अशा माशांत कीटकनाशकांचा मोठा धोका आहे. तो टाळला पाहिजे. कीडनाशक मंडळाने ३२९ कीटकनाशके प्रमाणित केली आहेत. तीच शेतकऱ्यांनी वापरावीत’’
मधमाश्यांच्या मुख्य जाती
आग्या माशी आणि फुलोरी माशी या दोन माश्यांच्या जाती जंगली मधमाश्या आहेत. तर सातेरी, मेलीफेरा आणि ट्रायगोना कोती या पेटीत पाळता येणाऱ्या मधमाश्या आहेत. फुलोरी मधमाशी पेटीत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ही स्थानिक मधमाशी आहे. ती स्थानिक हवामानाशी जुळलेली असते. स्थानिक पिकांच्या फुलांवर खूप मोठ्या प्रमाणात तिचा आढळ आहे तसेच तिचा परागीभवनाच्या प्रक्रियेत मोठा वाटा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.