Kolhapur News
Kolhapur News Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur News : सुख कळले, मन जुळले

Raj Chougule

Kolhapur News : वृद्धाश्रम (Old Age Home) म्हटले की एक वेगळे चित्र समोर येते. आयुष्याच्या संध्याकाळी स्वतःच्या आप्तेष्टाविना येथे ज्येष्ठ मंडळी (Senior Citizen) दिवस कंठत असतात. पण याच वृद्धाश्रमात आयुष्याला एक नवा धागा मिळाला तर..

घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमात बाबूराव पाटील (वय ७८) व अनुसया शिंदे (वय ६८) यांना परस्परांचा हा आधार भेटला. वृद्धाश्रमातील मैत्रीतून प्रेम फुलत गेले आणि अखेर ते जीवनसाथी बनले.

या अनोख्या प्रेम कहाणीतून ‘या जन्मावर, या जगण्यावर क्षतदा प्रेम करावे’, या ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत.

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे. जागतिक प्रेम दिवस. या दिवसाचे औचित्य साधून बाबूराव यांनी अनुसया यांना प्रपोज केले. आणि अवघ्या १५ दिवसांत ते विवाह बंधनात बांधले गेले देखील. चेष्टेतून सुरू झालेल्या या प्रेम कहाणीला वृद्धाश्रमाचे प्रमुख बाबासाहेब पुजारी यांनी मूर्त रूप दिले.

श्री पुजारी हे गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धाश्रम चालवतात. याच वृद्धाश्रमात शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथून बाबूराव हे दीड वर्षांपूर्वी आले. तर वाघोली (जि. पुणे) येथून अनुसया या सहा ते सात वर्षांपूर्वी आल्या.

बाबूराव यांच्या पत्नीचे निधन होऊन सुमारे २२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. अनुसया या आपल्या पती समवेत सहा ते सात वर्षांपूर्वी येथे आल्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे आश्रमातच वृद्धापकाळाने काळाने निधन झाले. जोडीदार गेल्याने त्या खचल्या. उदास राहू लागल्या.

याच वृद्धाश्रमात राहणारे बाबूराव यांच्या निदर्शनास ही बाब आली. सुख-दुःखाची देवाणघेवाण करणाऱ्या या वयात बाबूराव आणि अनुसया यांच्या विचारांची गट्टी जमली. कुठून तरी अनुसया या आनंदी राहतात हेच महत्त्वाचे होते.

त्या कधी दुःखी दिसल्या की आश्रमाचे व्यवस्थापन करणारी मंडळी ‘अहो कशाला दुःखी होता. तुमचा दोस्त आहे. त्यांच्याबरोबर बोलत बसा की,’’ असे थट्टेने म्हटली की त्या लाजायच्या.

दरम्यान, १४ फेब्रुवारीला आश्रमातील मंडळी ‘रोटी डे’ साजरा करायला अन्य ठिकाणी गेलेली असताना बाबूराव यांनी या दिवसाचे औचित्य साधून चक्क अनुसया यांना ‘प्रपोज’ केले. हे समजताच संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी दोघांशीही बोलून तुम्ही लग्नाला तयार आहात का? असे विचारले.

दोघांकडून संमती मिळताच याबाबत लिहूनही घेतले. कष्टाचे वय नसल्याने आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ही महत्त्वाचा असल्याने लग्न झाले तरी शेवटपर्यंत वृद्धाश्रमातच राहून जीवन जगायचे, हेही त्यांच्याकडून लिहून घेतले.

दोघांनी ही आनंदाने ही बाब मान्य केली आणि लग्नाची तयारी सुरू झाली. मणी मंगळसूत्र आणले. मंडप सजविला. शिरा-भाताचे जेवण करून रीतसर लग्न लावून देण्यात आले. एकमेकाला सांभाळण्यासाठी ते ‘मनाने’ जवळ आले.

वृद्धाश्रमात ‘आधारा’च्या आशेवर फुललेले हे प्रेम नक्कीच एक वेगळी अनुभूती देऊन गेले. उतार वयात आधार कोणाचा अशी समस्या जटिल होत असताना बाबूराव व अनुसया यांचे फुललेले प्रेम हे त्याचे उत्तर बनून गेले.

दोघांनाही एकमेकांच्या साथीत झालेला आनंद हा अवर्णनीय आहे. हा आनंद कायम राहावा, या साठी आम्ही हा विवाह लावून दिला.

- माणिक नागावे, अध्यक्षा, जानकी वृद्धाश्रम.

वृद्धाश्रमात एकत्र राहत असताना एकमेकांची विचारपूस करत असताना आमची मने जुळली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हक्काचा जोडीदार असावा, ही भावना आमची प्रबळ होती. त्यातूनच आम्ही लग्नाचा प्रस्ताव दिला. तो वृद्धाश्रम व्यवस्थापनाने मान्य केला, याचा खूप मोठा आनंद झाला आहे.

- बाबूराव पाटील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT