डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे Agri Storage Solution: पारंपरिक शीतगृहांमध्ये केवळ तापमान कमी केले जाते. मात्र कक्षातील संपूर्ण वातावरण उदा. तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साईड या सारख्या वायूंचे प्रमाण नियंत्रित करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान नियंत्रित वातावरणीय साठवणुकीमध्ये (कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरीक स्टोअरेज) वापरले जाते. परिणामी त्यात साठवलेल्या उत्पादनांचे आयुष्य अनेक महिन्यांनी वाढू शकते. नियंत्रित वातावरणीय साठवणीचा वापर प्रामुख्याने सफरचंद, नाशपाती, द्राक्षे आणि काही विशिष्ट भाज्यांसाठी केला होतो..मुख्य तत्त्वसाठवलेल्या उत्पादनांभोवतीच्या वातावरणातील तापमान, आर्द्रता या घटकांसोबतच त्यातील वायूंचे प्रमाणही नियंत्रित करणे. उदा. ऑक्सिजन (O२), कार्बन डायऑक्साइड (CO२) आणि इथिलीन (C२H४) या महत्त्वाच्या वायूंचे प्रमाण नियंत्रित केल्यास उत्पादनाचा श्वसन दर लक्षणीयरीत्या कमी होतो. या तत्त्वावर यंत्रणा कार्य करण्यासाठी आधुनिक नियंत्रित वातावरणीय साठवणूक प्रणालीमध्ये प्रगत सेन्सर्स आणि नियंत्रण प्रणालींचा वापर केला जातो. त्यामुळे वातावरणीय परिस्थितीचे अचूक निरीक्षण आणि समायोजन करणे शक्य होते..कार्यप्रणालीनियंत्रित वातावरणीय साठवणुकीची कार्यप्रणाली उत्पादनाची श्वसनक्रिया मंदावण्यावर आधारित आहे.कमी ऑक्सिजन : चेंबरमधील ऑक्सिजनचे प्रमाण २१% वरून १-२% पर्यंत कमी केले जाते. यामुळे साठविलेल्या उत्पादनांची श्वसनक्रिया मंदावते आणि त्यांचे नैसर्गिकरीत्या पिकणे थांबते.कार्बन डायऑक्साइडचे नियंत्रण : कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण १-१० टक्क्यांपर्यंत वाढविले जाते. यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि फळांची गुणवत्ता टिकून राहते..Cold Storage: शेतीमाल साठवणीसाठी आधुनिक शीतगृह.तापमान आणि आर्द्रता : प्रत्येक फळ किंवा भाजीसाठी योग्य ते तापमान आणि आर्द्रता राखली जाते.ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून (उदा. ५ टक्के किंवा त्याहून कमी) आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढवून (उदा. १०% पर्यंत), फळे आणि भाज्यांच्या पिकण्याची आणि वृद्धत्वाची प्रक्रिया (senescence) मंदावते. यामुळे त्यांची गुणवत्ता, ताजेपणा आणि पोषणमूल्ये दीर्घकाळ टिकून राहतात..फायदेआयुष्यमान वाढते. उदा. सफरचंद २% ऑक्सिजन आणि ३% कार्बन डायऑक्साइड आणि शून्य अंश सेल्सिअस तापमानात साठविल्यास त्यांचे आयुष्यमान ६ महिन्यांपर्यंत वाढते.उत्पादनाचा श्वसन दर आणि इथिलीन उत्सर्जन कमी झाल्यामुळे गुणवत्ता सुधारून ताजेपणा दीर्घकाळ टिकतो. चव आणि पोषणमूल्ये टिकून राहतात.नियंत्रित वातावरणीय परिस्थितीमध्ये रोगकारक आणि नुकसान करणाऱ्या सूक्ष्मजिवांची वाढ रोखली जाते.शेतीमाल बाजारात कमी आवक असलेल्या बिगरहंगामी काळात विकून अधिक नफा मिळवणे शक्य होते.अलीकडे वातावरणीय नियंत्रणासाठी ऊर्जा-कार्यक्षम आरेखन केले जाते. तसेच जेथे शक्य तिथे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर केला जातो..तोटेनियंत्रित वातावरणीय साठवणूक कक्षांची उभारणी, देखभाल व चालवणे खूप महाग पडते.यातील तंत्रज्ञान गुंतागुंतीचे असून, त्यासाठी विशेष तांत्रिक ज्ञान आणि कुशल कामगारांची आवश्यकता भासते.सध्या तरी हे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या फळे आणि भाजीपाल्यासाठी वापरण्यायोग्य आवश्यक संशोधन व प्रोटोकॉल तयार झालेले नाहीत. त्यामुळे सर्व पिकांसाठी वापरता येत नाही..Solar Cold Storage: सौर ऊर्जा आधारित शीतगृह .मर्यादासध्या तरी भारतात सफरचंदाव्यतिरिक्त अन्य फळे नियंत्रित वातावरणीय शीतगृहांमध्ये फारशी साठवली जात नाहीत.पॅकेजिंगमधील उत्पादनांचा शीतकरण दर मंदावणे, तापमानाच्या चढउतारामुळे पॅकेजिंगमध्ये पाणी साठण्याचा धोका या काही मर्यादा दिसून येतात.काही फळांमध्ये असामान्य पिकणे किंवा शारीरिक विकार होऊ शकतात. हवारहित स्थितीमध्ये सेंद्रिय अस्थिर वायूंच्या उत्सर्जनामुळे दुर्गंधी (विशेषतः पुंगट वास) येऊ शकते..काय करावे ?उत्तम गुणवत्ता असलेलाच शेतीमाल साठवणुकीसाठी निवडावा.योग्य तापमान आणि वायूंचे प्रमाण राखण्यासाठीच्या सर्व प्रणालींची नियमितपणे तपासणी करावी.प्रत्येक उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या नियंत्रित वातावरणीय साठवणूक स्थितीची माहिती घ्यावी..काय करू नये?खराब झालेला किंवा रोगग्रस्त शेतीमाल साठवू नका.कक्षाचे दरवाजे वारंवार उघडू नका, यामुळे आतील वातावरण बिघडते.तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय नियंत्रित वातावरणीय साठवणुकीचे व्यवस्थापन करू नका..उपयोगनियंत्रित वातावरणीय साठवणुकीचा उपयोग प्रामुख्याने सफरचंद, नाशपाती, किवी, द्राक्षे आणि काही विशिष्ट भाज्या (उदा. ब्रोकोली) यांच्या दीर्घकाळ साठवणुकीसाठी केला जातो. या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आणि व्यापारी त्यांचे उत्पादन योग्य वेळेत आणि चांगल्या भावाने विकू शकतात.नियंत्रित वातावरणीय साठवणूक हे पारंपरिक शीतगृहांपेक्षा अधिक प्रगत असून, त्यात वायूंचे प्रमाण नियंत्रित करून आयुष्यमान लक्षणीयरीत्या वाढवले जाते. सध्या तरी भारतात सफरचंदाव्यतिरिक्त अन्य फळे यात साठवली जात नाहीत. अन्य फळांसाठीचे निकष व नियम (प्रोटोकॉल) संशोधनातून तयार करावे लागणार आहेत. त्यामध्ये संशोधनाच्या मोठ्या संधी आहेत. सामान्यांमध्ये नियंत्रित वातावरणीय तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील..रचना आणि बांधकामनियंत्रित वातावरणीय साठवणूक कक्ष हे अत्यंत विशेष पद्धतीने बांधले जाते.सीलबंद खोली : खोली पूर्णपणे सीलबंद आणि हवाबंद (gas-tight) असते. त्यामुळे बाहेरील हवा किंवा वायू आत येत नाहीत की आतील वायू बाहेर जात नाहीत.रोधक भिंती (इन्सुलेशन) : कक्षाच्या भिंती, छत आणि तळामध्ये उष्णता रोधक घटकांचा वापर केलेला असतो. त्यामुळे आतील तापमान कायम राखता येते..गॅस जनरेटर आणि स्क्रबर : ऑक्सिजनचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या जागी उदासीन वायू नायट्रोजन भरला जातो. तो भरण्यासाठी नायट्रोजन जनरेटर वापरला जातो. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कार्बन स्क्रबर बसवलेले असतात.सेन्सर्स आणि मॉनिटरिंग सिस्टिम : तापमान, आर्द्रता आणि वायूंच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक सेन्सर्स आणि कंट्रोल सिस्टिम वापरली जाते.- डॉ. विक्रम कड ०७५८८०२४६९७(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.