Weather Update : या आठवडाभरात पावसाचे आगमन होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी शेतजमिनी तयार करून ठेवल्या असून, पावसानंतरच पेरणी करण्यास गती येणार आहे.
दरम्यान, मागील दोन वर्षांत बहुतांश ठिकाणी पेरणीनंतर बियाण्यांची उगवण क्षमता होत नसल्याने यंदा कृषी विभागाने खते व बी-बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून, पिकांची उगवणक्षमता चांगली होण्यास मदत होणार आहे.
राज्यात २१ जूनपर्यंत खरिपाच्या पेरणीला सुरुवात होणे, हे क्रमप्राप्त मानले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीसाठी प्रतीक्षा केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वळिवाचा पाऊस झाला नसल्याने जमिनीचा पोत सुपीक नसल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी या दिवसांमध्ये खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात होत्या. तर, यंदा अद्यापही पावसाने दडी मारल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला पूर्णपणे सुरुवात झाली नसल्याचे दिसून येत आहे.
पावसाच्या अनिश्चित स्वरूपामुळे शेतकरीही पेरणी करण्याबाबत संभ्रमावस्थेत आहे. एका बाजूला अनिश्चित पावसाचे संकट, तर दुसरीकडे बियाण्यांची पेरणी केल्यास उगवणक्षमता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीवेळी बियाण्यांची पक्की पावती घ्या, नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करा तसेच बियाण्यांच्या पिशवीवरील टॅगवर वैधता पाहावी. त्याचबरोबर बियाण्यांच्या पिशवीत थायमरची पुडी बीजप्रक्रियेसाठी असते, त्याने बीजप्रक्रिया करा.
जमिनीत पुरेशी ओल (चार ते पाच इंच) आवश्यक असावी, घरचे बियाणे असल्यास उगवणक्षमतेची चाचणी करा, रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
‘बियाण्यांबाबत तक्रार करा...’
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे तक्रार समितीची स्थापना केली आहे. बियाणे निकृष्ट व उगवत नसल्याची तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पावतीसह भेट देण्याचे आवाहन, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी केले.
‘उपलब्ध खतांची मिळवा माहिती’
जिल्ह्यातील नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांची माहिती मोबाईलवर कृषक ॲपवर तत्काळ मिळत आहे. या ॲपचा वापर करून शेतकऱ्यांनी खतांची माहिती मिळवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.