Nanded News : पीक कर्ज थकबाकीच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक बँकांच्या शाखांनी शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना होल्ड लावले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, पी.एम. किसान निधी, सी.एम. किसान निधी, पीकविमा भरपाई यांसारखे महत्त्वाचे निधी मिळणे बंद झाले आहे. परिणामी, ऐन पेरणीच्या काळात या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासनाकडून अनेक योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केले जाते. मात्र, बँकांनी शेतकऱ्यांचे पीककर्ज थकविले म्हणून त्यांची बचत खाती होल्डमध्ये टाकल्यामुळे हा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही बँकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट खात्यांवर होल्ड लावला आहे.
त्यामुळे त्यांना योजनेचे पैसे न मिळाल्याने बियाणे, खते व अन्य शेतीसाहित्य खरेदी करणे कठीण झाले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने जरी पीककर्ज परतफेडीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणे आवश्यक आहे. बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यांवरील होल्ड तत्काळ काढावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे.
सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून वेळेवर पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पेरणी करण्यास असमर्थ आहेत. शासन व बँकांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे हा विषय लावून धरला होता. यामुळे बँकांनी कोणत्याही खात्याला होल्ड लावू नये असे निर्देश दिले होते. परंतु बँका मात्र शासन, प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व बँकांना शेतकऱ्यांच्या खात्याचे होल्ड काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे अनुदान मिळतील.श्री. सोनकांबळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नांदेड.
माझ्या बचत खात्याला नायगावच्या एसबीआय बँकेने होल्ड लावल्यामुळे अतिवृष्टीचे अनुदान, पीएम किसान, सीएम किसान योजनेसह शेतीमालाचे पैसे अडकले आहेत. ऐन पेरणीच्या काळात खासगी सावकाराचे पैसे घेऊन पेरणी करावी लागली.उत्तम मोरे, शेतकरी, देगाव, ता. नायगाव, जि. नांदेड.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.