Soybean Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Disease : सोयाबीनवरील बांधाकुज, मूळ अन् खोडसड रोगांचे नियंत्रण

Soybean Crop Disease : या रोगांमध्ये मुख्यतः जमिनीतून येणारे रोग, पानांवरील रोग, फांदीवरील रोग, शेंगावरील रोग इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

डॉ. दत्तात्रय गावडे

Soybean Disease Management : महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात कापूस पिकानंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतले जाते. सोयाबीन पिकामध्ये विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनात साधारणतः २७ टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. या रोगांमध्ये मुख्यतः जमिनीतून येणारे रोग, पानांवरील रोग, फांदीवरील रोग, शेंगावरील रोग इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

सध्या राज्याच्या विविध भागांतील पावसाची परिस्थिती ही वेगवेगळी आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्ह्यांत पाऊसमान जास्त आहे. त्यामुळे काही भागात जमिनीतून होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे. तसेच अनुकूल हवामानामुळे सोयाबीन जमिनीतून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.

सोयाबीनमध्ये बांधाकुज (कॉलर रॉट) व मूळ व खोडसड दिसून येण्याची शक्यता आहे. सध्या सोयबीन पिकाची काही भागांत उगवण झाली आहे, तर काही भागांत पेरण्या झाल्या आहेत. या काळात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.

मूळ व खोडसड रोग

हा रोग पिथियम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया, फ्युजारिअम मॅक्रोफोमिना फॅसीओलिना या बुरशींमुळे होतो.

रोप अवस्थेतील पीक जास्त बळी पडते.

रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या खोडावर होऊन नंतर ती मुळांपर्यंत जाते.

अन्नपुरवठ्यामध्ये बाधा येऊन झाड कालांतराने सुकून जाते. प्रादुर्भावामुळे सुकलेल्या खोड तसेच मुळावर काळ्या बुरशीचे बीज दिसून येतात.

झाडाच्या प्रादुर्भावग्रस्त मृत अवशेषांवर रोगाची बुरशी सुप्त अवस्थेत जिवंत राहते. तेथून रोगाचा प्रादुर्भाव होतो. तसेच बियाण्यांमार्फत देखील प्रसार होतो.

बांधाकुज (कॉलर रॉट)

या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोप अवस्थेपासून कधीही होऊ शकतो.

रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात काळी जमीन तसेच पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत दिसून येतो.

प्रादुर्भावीत रोप किंवा झाडाचे मूळ व खोड यांच्या बुंध्याजवळ पांढरट बुरशीची वाढ झालेली दिसून येते. मुळांवर मोहरीच्या आकाराचे बुरशचे बीजाणू दिसून येतात.

बाधित रोपाची किंवा झाडाची वाढ खुंटते. झाड पूर्णपणे कोमेजून सडून मरते.

रोगाचा प्रसार रोगग्रस्त पीक अवशेष आणि वाऱ्यामार्फत पसरणाऱ्या बुरशीच्या बीजाणूमार्फत होतो.

एकात्मिक व्यवस्थापन

रोगाचा प्रादुर्भाव हा जमिनीतून तसेच बियाण्यामार्फत होत असल्यामुळे पेरणीपूर्वी बियाणांस बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रतिकिलो बियाण्यांस, ट्रायकोडर्मा १० ग्रॅम, त्यानंतर कार्बोक्झिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के डीएस) (संयुक्त बुरशीनाशक) २ ते ३ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करावी. शेतातील काडीकचरा गोळा करून नष्ट करावा.

पेरणीपूर्वी जमिनीमध्ये निंबोळी ढेप किंवा सेंद्रिय खतांचा वापर करावा.

सोयाबीन पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमीन ओली असताना जमिनीत मिसळावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास रासायनिक बुरशीनाशक कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

सोयाबीन लागवड क्षेत्रातील पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी. (लेबलक्लेम आहेत.)

डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०

(विषयतज्ज्ञ-पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT