राहुल वडघुले
Soybean Chakri Bhunga Disease : सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे पीक म्हणून घेतले जाते. सोयाबीन पिकाची खरीप तसेच उन्हाळी लागवड केली जाते. सध्या राज्यात सोयाबीन लागवड सुरू आहेत. त्यामुळे या पिकामध्ये येणाऱ्या विविध किडींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी, चक्री भुंगा, लष्करी अळी, पांढरी माशी, नागअळी इत्यादी मुख्य किडींचा प्रादुर्भाव होतो. यापैकी आज चक्री भुंगा या किडी विषयी माहिती घेऊयात.
नमुना मिळण्याचे ठिकाण
सदर किडीचा नमुना आम्हाला कडवंची (ता. जालना) येथून मिळाला होता. चक्री भुंगा ही कीड सोयाबीन पिकामध्ये सर्व विभागांत आढळून येते.
किडीची माहिती
किडीचे नाव : चक्री भुंगा (गर्डल बीटल)
किडीचे शास्त्रीय नाव : Oberiopsis brevis
किडीच्या अवस्था : प्रौढ, अंडी, अळी, कोष.
नुकसान करणारी अवस्था : प्रौढ आणि अळी
नुकसान : या किडीमुळे सोयाबीन पिकात साधारणतः ४२ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
यजमान पिके : मूग, तूर, वाल, मिरची, चवळी इत्यादी.
लक्षणे
या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे झाडाच्या उपफांद्या, पानाचा देठ या ठिकाणी दिसून येतात. लक्षणे दिसत असलेल्या ठिकाणी दोन काळ्या रंगाचा गोलाकार कातरल्याप्रमाणे भाग दिसून येतो.
किडीची प्रौढ मादी फांद्या किंवा पानाच्या देठावर एक इंच अंतराने दोन गोलाकार कातरते. कातरलेल्या भागाच्या थोडेवर एक लहान छिद्र करून त्यामध्ये मादी एक अंडे देते. यामुळे त्या जागेतून वनस्पतीच्या वरील भागात पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबतो. आणि तेथील शेंडा किंवा पान वाळलेले दिसते. शेंडा अथवा वाळलेल्या पानावर शेतामध्ये चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.
किडीचा जीवनक्रम
चक्री भुंगा या किडीच्या प्रौढ, अंडी, अळी आणि कोष अशा एकूण चार अवस्था असतात. याला संपूर्ण रूपबदल (Complete Metamorphosis) असे म्हणतात.
प्रौढ अवस्था : प्रौढ भुंग्याचा डोक्याकडील भाग तपकिरी, तर मागील भाग काळ्या रंगाचा असतो. त्याचे ॲन्टेना लांब व जवळपास त्याच्या शरीराच्या आकाराएवढ्या असतात.
अंडी अवस्था : अंडी पिवळसर रंगाची लंब गोलाकार असतात. अंडी अवस्था ३ ते १० दिवसांची असते.
अळी अवस्था : अळी फिक्कट पिवळ्या रंगाची असते. अळीच्या तोंडाकडील भाग तपकिरी असतो. अळीला पाय नसतात. अळी अवस्था ३० ते ७० दिवसांची असते.
कोष अवस्था : कोष अवस्था ही पिवळसर रंगाची हालचाल न करणारी अवस्था असते. ही अवस्था १० ते १५ दिवसांची असते.
नुकसानीचा प्रकार
प्रौढ मादी फांदी किंवा पानाच्या देठाला गोलाकार कातरते. त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबतो.
अंड्यातून बाहेर निघालेली अळी फांदीला आतमधून पोखरते. अळी आतमध्ये पोखरत पोखरत खोडापर्यंत पोहोचू शकते. यामुळे एक किंवा अनेक फांद्या प्रभावित होऊन सुकतात. परिणामी, त्या फांद्यांना शेंगा लागत नाही.
नुकसानीचा कालावधी
जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत नुकसान होते. सर्वांत जास्त नुकसान सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.