Marathi Journalist Day
Marathi Journalist Day Agrowon
ॲग्रो विशेष

Marathi Journalist Day : पहारेकरी पत्रकार

अरूण चव्हाळ

लोकशाहीचा चौथा स्तंभ Forth Pillar Of Democracy) म्हणून वर्तमानपत्र आणि पत्रकार (Journalist) महत्त्वाचे आहेत. सामाजिक व्यक्तिमत्त्वाचे संगोपन व संवर्धन करण्याचे काम पत्रकारिता (Journalism) करत असते. भारतासारख्या बहुधर्मीय आणि बहुभाषिक देशात सर्वन्यायी संतुलित भूमिका घेऊन सामाजिकता वर्धिष्णू करणे आणि बंधू भावाने समाज बांधणी करणे मोलाचे आहे, हे मौलिक कार्य पत्रकारबंधूच करू शकतात.

कारण विचारांची बांधिलकी हे पत्रकारितेचे अंतिम ध्येय आहे. एरवी मानवी जीवन हा फार मोठा मायावी बाजार आहे. काळाप्रमाणे मागणी व पुरवठा आपण सतत अनुभवतो. मानवी व्यवहार सुरळीत राहण्यासाठी ते योग्य असू शकेल, पण सर्व व्यवहार सत्य व सरळ असतातच असे मात्र कदापि नसते.

अनेकदा समाज स्वार्थाने अनैतिकतेकडे वाहत जाण्याचा धोका असतो. अशावेळी समाज चांगल्या विचारांनी बांधण्याचे सामर्थ्य वर्तमानपत्र सिद्ध करत असते. ‘अखंड सावधानता’ जपण्यासाठी समाजाचा पहारेकरी पत्रकार असतो.

नफा डोळ्यासमोर न ठेवता जग बदलण्याची धग पत्रकारिताच जपू शकते. चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून दाखवण्याची कुवत आणि चांगल्या गोष्टीला चांगली गोष्ट म्हणून उदात्तीकरण करण्याची उदारता एकाच वेळी वर्तमानपत्र दाखवू शकते. त्यामुळे सज्जन सक्रिय राहू शकतात, दुर्जन वठणीवर आणता येतात.

भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, भूकमुक्त, सत्तामुक्त देश शाबूत ठेवता येतो. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर चांगले छायाचित्र आणि चांगली बातमी छापून येण्यासाठी सामाजिक घडामोडी सकारात्मकच असाव्यात. अन्यथा, वाईट कृत्यांच्या; देशभेदी राजकारणाच्या बातम्या चमकोगिरीसाठी प्रसिद्ध व्हायला लागल्या, की लोक निरोगी राहू शकतील का?

आधीच लोकांच्या डोक्यात नकारात्मक गोष्टींचा किडा वळवळतो आणि परत त्यात अंदाधुंद गोष्टींची प्रसिद्धी समाजाची बूज कशी राखणार? अंतर्वस्त्राच्या, मद्याच्या जाहिरातीमुळे वर्तमानपत्राला ‘अर्थ’ मिळू शकतो, पण पाहणाऱ्या आणि वाचणाऱ्यांना ते अर्थपूर्ण वाटत नाही.

‘बघण्यात’ काय मजा? समाजाच्या चांगल्या गरजा पत्रकारितेने ‘पत्रकारितेचा धर्म’ म्हणून निर्माण कराव्यात, जपाव्यात; हा सामूहिक स्वर असतो. समाजात निरोगी बातम्यांची पेरणी केली, तरच सजग वाचकांची भर वर्तमानपत्र भरून काढू शकतात. इतर जाहिरातीनेही ‘अर्थ’प्राप्ती होतेच.

माणसातल्या महानतेची जाहिरात करून सामान्यांची वाचा मोठी केली, की पत्रकारिता आपोआप मोठी होते. ज्ञानापेक्षा, वस्तुनिष्ठतेपेक्षा सनसनाटी माहिती प्रसिद्ध व्हायला लागली, की लोक उघड बोलत नाहीत पण पत्रकारितेला आतून गंज लागत जातो.

शोध पत्रकारिता खमक्या पत्रकार करतो. ‘पेड न्यूज’मध्ये पत्रकारितेचा निर्वंश होण्याचा अंश अधिक असतो. माध्यमांच्या मागे मध्यमवर्गीय राहतात. उच्चवर्गीय आणि सत्तावर्गीय कोणत्या गटाचे हे मतलबी असते. कनिष्ठ स्तरातील माणसांना वर्तमानपत्राचा कणखरपणा समजत नाही.

वर्तमानपत्रांनी अशावेळी सजगतेने सुजाणांचा कैवार घ्यावा. पत्रकाराने स्वतः कोणत्याही घटनेची पडताळणी करून लेखणीस न्याय द्यावा, त्या वेळी ते मुक्त पत्रकारितेचा श्‍वास घेतील.

आजकाल काळाप्रमाणे पुरवठा केला जातो. उदा. आंदोलनाच्या बातम्या, सिनेतारकांच्या गुजगोष्टी, राजकीय कुरघोड्या आदी. ते ठीक आहे, पण त्यामुळे वर्तमानपत्राची पूर्णता व वाचकांच्या जिज्ञासेची भूक पूर्ण होते असे नाही.

‘आवड मला ज्याची मी तेच छापले’ हे नको. वाचकांची आवड, गरज आणि अभिरुची संपन्न करण्यासाठी धडपड करणारे पत्रकार आजही आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपला जीव गमवावा लागणारे पत्रकार या देशात आहेत.

लोक जीवनाच्या कल्याणासाठी (हे दर्पणकार) विचारांचा उजेड करतात, तो वैविध्यपूर्ण अनेक बातम्यांतून... पत्रकार मूल्यवान बातम्यांसाठी ‘जागल्या’ असतो.

संत कवी तुकाराम यांच्या अभंगातील ‘दुर्बळाचे कोण। ऐके घालुनिया मन॥’ या ओळीप्रमाणे दुर्बलांचे प्रश्‍न ऐकून सोडवणारे पत्रकार आहेत. उत्तम पत्रकार चांगला भाष्यकार, निवेदक, कार्यकर्ता असतो. सामाजिक दातृत्व म्हणून समाजहितैषी अनेक उपक्रम वर्तमानपत्र राबवतात.

उदा. शेतकरी चळवळ, पाणीबचत, शैक्षणिक कार्य, स्त्री-पुरुष समानता, आर्थिक सहकार्य, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा, व्यापार, उद्योग, अर्थव्यवस्थेचे विश्लेषण. ‘आम्हां देखोनि काळ धाके’ म्हणजेच न्यायपालिका आणि पोलिस यंत्रणेप्रमाणे पत्रकारांना घाबरणारे अनेक जण आहेत. इमानदारपणा गुणातीत आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भल्या पत्रकारांनी (संपादकांनी) समाजाचे भले केले आणि स्वतः भले झाले. टिळकांनी त्या वेळी इंग्रज सरकारला विचारलेला प्रश्‍न, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा आजपर्यंतचा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

डॉ. बाबासाहेबांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ याकरिता पत्रकारिता प्रखर केली. साधी कल्पना करा, की पत्रकार नसते तर... देशात अराजकता माजली असती. विरोधी पक्ष राहिला नसता.

समाज जीवन अस्थिर झाले असते. हुकूमशाही बोकाळली असती. लोकशाही बोंगाळली असती पण त्यांच्यामुळे देश बळकट आहे. जगात सर्वांत मोठी लोकशाही भारतात नांदते, ती फक्त वर्तमानपत्रांच्या लेखणीवर. पत्रकार सामाजिक तटबंदी आहे.

निर्भीड पत्रकार धडाडी असतो. साहित्यिक प्र. के. अत्रे यांनी वृत्तपत्रातून त्या काळी अनेकांची धुलाई केली. ते राज्य-राष्ट्र स्वच्छ करण्यात धन्यता मानत.

राष्ट्रसंत गाडगेबाबांना जगापुढे कर्ता समाजसुधारक म्हणून पुढे आणण्यात ते अग्रेसर होते. आर. आर. पाटील यांचे ‘स्वच्छता अभियान’ व ‘तंटामुक्ती गाव अभियान’ थेट भारतातून ‘युनो’त धडक मारण्यात वर्तमानपत्रांची साथ मोलाची ठरलेली आहे.

रामेश्‍वरममध्ये येणाऱ्या त्या काळाच्या ‘दिनमणी’ वर्तमानपत्रामुळे मी ‘मोठा घडण्यास’ बराच लाभ झाल्याचे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कबूल केलेले आहे. लोकशाहीमध्ये चांगल्या माणसांचा आदर आणि कदर वर्तमानपत्रच करू शकतात.

सध्या अनेक राजकीय नेतृत्व वर्तमानपत्रातून व्यक्त होतात. मी दररोज सहा पेपरांचे वाचन करूनच घराबाहेर पडतो. वाद, वांधे, वाझे वृत्तपत्रामुळे नीट होतात. त्यामुळे स्पष्ट व सुसंस्कृत माणसांना मिळालेला आसरा मोठा दिलासादायक असतो.

विधानांचा विपर्यास, पत्रकारांना केले निरुत्तर, ते संतापले, पत्रकारांना त्यांनी खडसावले, अशाही बातम्या कधी-मधी कानावर येतात. डोळ्यांनी वाचता येतात. हा संमिश्रपणा कमी-अधिक असतो. दावे, प्रतिदावे, खुलासेही होतात. चुका, दिलगिरीपर्यंत प्रकरणं जातात. वाचकांच्या स्पर्धेत ‘प्रथम कोण’ स्पर्धा रंगते.

नवे, जुने, त्वरित, प्रतीक्षेत हा लपंडाव चालू असतो. काही जण मानधनाने, तर काही जण सन्मानाने लिहितात. वाहिन्यांवर, वृत्तपत्रातून दिसल्यावर अनेक घटना, साहित्य, कला, क्रीडा, शेती, संशोधन, संख्या, निकाल, प्रचार व प्रसार विश्‍वासार्ह मानल्या जातो.

साहित्याची उत्तम जाणीव वर्तमानपत्रांनी नेहमीच करून दिलेली आहे. प्रश्‍न सोडवायचे का फक्त मांडायचे? याची जाणीव पत्रकारांना नेहमी असावी. आणि हो, प्रश्‍न कोण निर्माण करतेय हेही नजरेतून सुटता कामा नये.

जीवनात कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. दोन्ही बाजू मांडणे समतोलाचे वैशिष्ट्य आहे. आपण चांगलीच बाजू घेणार ना? कुणाची बाजू घेण्यापेक्षा सत्याची बाजू घेणे हेच वृत्तपत्राचे खरे स्वातंत्र्य आहे. परखड पत्रकारितेला आजच्या पत्रकार दिनानिमित्त सलाम!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Loksabha Election : कोल्हापूर, हातकणंगलेत ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

SCROLL FOR NEXT