Pune News : डेहराडून (उत्तराखंड) येथील पशुधन विकास मंडळाच्या कालसी येथील लाल सिंधी गोवंश संवर्धन व प्रजनन केंद्रातून पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने उच्च वंशावळ असलेला ‘बद्री‘ वळू (१८९२३३) खरेदी केला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी देशात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी देशी गोवंशाचे संवर्धन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील वातावरणामध्ये या गोवंशाचा तुलनात्मक अभ्यास करणे हा मुख्य उद्देश आहे. या संशोधन केंद्रामध्ये प्रत्येक जातीचा उच्च दर्जाचा वळू प्रजननासाठी उपलब्ध आहे. या माध्यमातून जातिवंत दुधाळ पिढी तयार होत आहे.
केंद्राच्या माध्यमातून भ्रूण प्रत्यारोपण, लिंग निर्धारित रेतमात्रांचा वापर करून जातिवंत वंशावळ तयार करण्यात येत आहे. हा प्रकल्प संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे.
‘बद्री‘ वळूचे वैशिष्ट्ये ः
१) भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पैदास.
२) वळूच्या आईचा पैदास नोंदणी क्रमांक २२९/३०७, दूध उत्पादन क्षमता ३,२०५ लिटर प्रति वेत.
३) वळूच्या वडिलांचा पैदास नोंदणी क्रमांक आर एस १०००९. दुग्धोत्पादन क्षमतेनुसार फाइव्ह स्टार रेटिंग.
४) वळूच्या वडिलांच्या आईची दूध उत्पादन क्षमता ५,३५४ लिटर प्रति वेत.
६४ वर्षांनंतर लाल सिंधी वळू दाखल...
पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये १८८७ मध्ये लाल सिंधी गाईंचे संवर्धन व संगोपन केले जात होते. त्यातून उत्पादित होणारे दूध पुणे विभागातील सरकारी अधिकाऱ्यांना पुरविण्यात येत असे.
१९६० नंतर देशामध्ये गायींच्या विदेशी जातींचा संकरीकरण कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर येथील लाल सिंधी गायींचा कळप धुळ्यातील कृषी महाविद्यालयात पाठविण्यात आला. सध्या धुळे येथे ५० लाल सिंधी गाई आहेत, अशी माहिती संशोधन केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी दिली.
देशांमध्ये जातिवंत दुधाळ लाल सिंधी आणि थारपारकर गोवंश नगण्य प्रमाणात आहे. नुकताच खरेदी केलेला ‘बद्री’ हा वळू आमच्या केंद्रातील लाल सिंधी गाईंच्या पैदास कार्यक्रमामध्ये वापरण्यात येणार आहे. यामुळे उच्च वंशावळ, चांगल्या दुग्धोत्पादन क्षमतेच्या कालवडी, गाई आणि वळू राज्यातील संशोधन संस्था, शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे.- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.