Rice Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Farming Useful For Azolla : भातशेतीसाठी ॲझोला उपयुक्त

Rice Farming : ॲझोला हवेतील मुक्त नत्र स्थिर करून भात पिकाला पुरविते. त्यामुळे भाताची चांगली वाढ होते. ॲझोलाच्या वाढीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी लागणार पोषक वातावरण भातशेतीत उपलब्ध होते. खूप कमी वेळात ॲझोलाची वाढ झपाट्याने होते.

Team Agrowon

डॉ. कालिंदी शिंदे, अमोल गाताडे

Useful For Azolla : भात रोप लावणीनंतर जेव्हा युरिया वापरला जातो त्याच वेळी पाण्यामध्ये ११ ते ५४ टक्के त्याचा निचरा होतो. भात पिकाला पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. भातशेतीत नत्राचा प्रभावी उपयोग होण्यासाठी ॲझोला हा चांगला पर्याय आहे. ॲझोलामध्ये नत्राचे प्रमाण २ ते ५ टक्के आणि पालाश प्रमाण ०.३ ते ६ टक्के (शुष्क वजन) एवढे असते.

ॲझोलाद्वारे स्थिर केलेले ५ टक्के नत्र वाढणाऱ्या भाताच्या रोपांना लगेच उपलब्ध होते आणि उर्वरित ९५ टक्के ॲझोलामध्येच शेवटपर्यंत राहते. जेव्हा ॲझोला शेतामध्ये कुजायला लागतो, त्या वेळी त्यातील नत्राचे विघटन होऊन अमोनिया सोडला जातो आणि तेच भातासाठी जैविक नत्र खत म्हणून उपलब्ध होते.

ॲझोला २० ते २५ दिवसांत २० ते ४० किलो नत्र प्रति हेक्टरी भातशेतीत स्थिर करतो. ॲझोला पिनाटा ही भारतात सहज उपलब्ध होणारी ॲझोलाची जात दिवसाला ०.३ ते ०.६ किलो नत्र हेक्टरी स्थिर करते.

वाढविण्याची पद्धत

ॲझोलाची वाढ शाकीय प्रजननाने होते. त्यामुळे ॲझोला छोट्या टाक्यांमध्ये वाढवून वर्षभर संवर्धन करता येते. ॲझोलाच्या वाढीसाठी सरासरी २५ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. उच्च तापमान ॲझोला सहन करू शकत नाही.

सर्वसाधारणपणे २.५ × १.५ × ०.२ मीटर आकाराचे वाफे तयार करून त्यामध्ये प्लॅस्टिक पेपर अंथरावा. त्यानंतर साधारणतः १० किलो सुपीक चाळलेली माती पसरावी. वाफ्यामध्ये १० सेंमी पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण पाच किलो शेणात मिसळून आतील माती ढवळावी.

माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात एक किलो ॲझोला पसरावा. साधारणपणे ८ ते १० दिवसात ॲझोलाची भरपूर वाढ होते. त्याचा पाण्यावर चांगला थर जमतो.

ॲझोलाची वाढ

सरासरी २ ते ३ आठवड्यांत पूर्ण शेतात सुमारे २० टन ॲझोलाची वाढ होते. पूर्ण वाढीनंतर नांगरणी करून ॲझोला जमिनीत गाडून त्यानंतर तिथे भात रोपांची लावणी केली जाते. गाडल्यानंतर काही ॲझोला शेतात राहतो, त्याची वाढ होतच राहते. पूर्ण वाढल्यानंतर  परत आपण शेतात ॲझोला गाडू शकतो.

अशा पद्धतीने हेक्टरी ४० टन ॲझोला (ताजे) उपलब्ध होतो. हा ॲझोला हेक्टरी ८०किलो नत्रखताएवढे असतो. यासाठी फक्त हेक्टरी ५०० किलो ॲझोला, २ ते ३ टन  शेणखत, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश खताची गरज असते.  

भातशेतीमध्ये फायदे

- हेक्टरी ५० किलो नत्र स्थिर करून भात उत्पादन वाढते. भात पिकासाठी २० ते ३० किलो नत्रयुक्त खताची गरज कमी होते.

- जमिनीतील एकूण नायट्रोजन, सेंद्रिय कार्बन, तसेच फॉस्फरस, पोटॅशिअम, इतर पोषक आणि सेंद्रिय पदार्थ वाढवून जमिनीची सुपीकता सुधारते.

- भात शेतातील ॲझोलाच्या जाड थरामुळे तणाची वाढ नियंत्रणात राहाते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

- जेव्हा भात परिपक्वतेच्या जवळ येतो, तेव्हा कॅनॉपीखाली कमी प्रकाशाची तीव्रता आणि पोषक तत्त्वांचा ऱ्हास झाल्यामुळे ॲझोला कुजण्यास सुरुवात होते. त्यातील नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर पोषक घटक वेगाने शेतीतील पाण्यात मिसळतात. परिपक्व होताना पिकास उपयोगी पडतात.

- रासायनिक नायट्रोजनयुक्त खतांचा वापर केल्यास, ॲझोलाच्या आच्छादनामुळे अमोनियाचे अस्थिरीकरण कमी होते.

- पाणी साचून राहिल्यामुळे ज्या ठिकाणी बाकीचे नत्र स्थिर करणारे जिवाणू कार्य करत नाही त्या ठिकाणी ॲझोला नत्र स्थिरीकरणाचे उत्तम काम करते. रासायनिक नत्र खताप्रमाणे यातील नत्राचा ऱ्हास होत नाही.

- ॲझोलाच्या विघटनानंतर भाताला पालाश मिळतो.

भातशेतीत ॲझोलाचा वापर

रोप लावणीआधी हरित खत आणि रोप लावणीनंतर शेतामध्ये ॲझोलाची वाढ शक्य आहे. दोन्ही पद्धतींत हेक्टरी ५०० किलो ताजे ॲझोला कल्चर भातशेतीत सोडावे लागते.

भात रोप लावणीपूर्वी हरित खत : रोप लावणीपूर्वी एक महिना ॲझोलाची वाढ शेतात करावी. प्रत्येक ५ दिवसांनी त्यामध्ये हेक्टरी २.२ किलो स्फुरद खत, प्रत्येक १० दिवसांनी हेक्टरी ४ किलो पालाश खत किंवा ५०० ते १००० किलो शेणखत दर १० दिवसांनी मिसळावे.

रोप लावणीनंतर वापर : रोप लावणीनंतर ॲझोला शेतातील पाण्यात सोडून द्यावे. या पद्धतीत ॲझोला वाढीसाठी खत द्यायची गरज नसते. जर उपलब्ध असेल, तर हेक्टरी ४.५ किलो स्फुरद खत द्यावे.

संपर्क - डॉ. कालिंदी शिंदे, ९००४६२३६४९, (डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT