Atul Deulgaonkar Agrowon
ॲग्रो विशेष

Atul Deulgaonkar: अतुल देऊळगावकर- पर्यावरण आणि आदिवासींचा सांगाती

अतुल देऊळगावकर हे नाव मनावर कोरल्या गेलं ते तीस वर्षांपूर्वी. तेंव्हा लातूर परिसरात झालेल्या भूकंपावर अनेक पुस्तक आली, पण डळमळले भूमंडळ हे त्यांचं पुस्तक आलं आणि लातूरचा भूकंप म्हणजे काय ते नेमकं कळलं.

Team Agrowon

इंद्रजित भालेराव

अतुल देऊळगावकर (Atul Deulgaonkar) हे नाव मनावर कोरल्या गेलं ते तीस वर्षांपूर्वी. तेंव्हा लातूर परिसरात झालेल्या भूकंपावर (Latur Earthquake) अनेक पुस्तक आली, पण डळमळले भूमंडळ हे त्यांचं पुस्तक आलं आणि लातूरचा भूकंप म्हणजे काय ते नेमकं कळलं.

हे मला तेव्हा प्रचंड आवडून गेलेले पुस्तक. मी त्यावेळी ते अनेकदा वाचलं, अनेकांना वाचायला सांगितलं. कारण भूकंपावर एवढं सखोल, इतकं परिपूर्ण, इतकं विवेकी दृष्टीकोनातुन लिहिलेलं आणि तरीही लालीत्यपूर्ण दुसरं पुस्तक मराठीत नाही. त्यामुळे अतुल देऊळगावकर हे नाव मनावर पक्क कोरल्या गेलं.

त्यानंतर भूकंपग्रस्त भागात पर्यावरणपूरक घरं बांधायला येऊन गेलेल्या लॉरीबेकर यांच्यावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आलं आणि तेही तितकच आवडून गेलं. त्यानंतर बखर पर्यावरणाची हे त्यांचे मौज प्रकाशनानं केलेलं पुस्तक आलं.

पाठोपाठ न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात, विश्वाचे आर्त, स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास, विवेकीयांची संगती, ग्रेटाची हाक, बोलिले जे, ऐकता दाट आणि आता आज त्यांचं निसर्गकल्लोळ हे पुस्तक लातूरमध्ये मराठीतील थोर लेखक महेश येलकुंचवार यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे.

जवळजवळ ही सगळीच पुस्तकं मी वाचलेली आहेत. माझ्याकडे आहेत. काही पुस्तकं मी आधीच घेतलेली असताना देऊळगावकरांनी मला भेटही दिलेली आहेत.

देऊळगावकरांचा आणि माझा परिचय होण्याच्या खूप आधी माझ्या कवितेचा त्यांना परिचय असावा. कारण त्यांच्या काही लेखांमधून माझ्या कविता ते उधृत करत होते. तसं तर त्यांचं मराठी कवितेचं वाचन किंवा एकूणच मराठी वाङ्मयाचं वाचन सखोल आहे.

त्यामुळे मर्ढेकर, कोलटकर, मनोहर ओक, वसंत दत्तात्रेय गुर्जर या अनवट कवींच्या कविता त्यांच्या लेखनातून येताना दिसतात. अर्थातच उगाचच कविता टाकायच्या म्हणून नव्हे तर त्यांच्या विषयाला पूरक, पर्यावरण तीव्रतेने मांडणारे असे या कवींच्या कवितांचे तुकडे ते आपल्या लेखनातून पेरताना दिसतात.

त्यांच्या निसर्गकल्लोळ या ताज्या पुस्तकात अरुण कोलटकर यांच्या सर्पसत्र या कवितेचा त्यांनी फारच सुंदर उपयोग करून घेतलेला आहे.

महेश एलकुंचवार यांच्या दीर्घ मुलाखतीचं 'बोलिले जे' हे पुस्तक सोडलं तर इतर सगळीच पुस्तकं पर्यावरण या विषयासंदर्भातलीच आहेत. देऊळगावकरांनी पर्यावरण हाच आपल्या चिंतनाचा विषय केलेला आहे. त्याचाच त्यांनी ध्यास घेतलेला आहे.

त्या संदर्भात ते नेहमीच चालू घडामोडींवर आणि जागतिक पर्यावरणावर अत्यंत सखोल असे लेख विविध नियतकालिकातून लिहीत असतात. ही बरीचशी पुस्तकं त्या लेखांची संकलनं आहेत.

देऊळगावकर यांना पर्यावरण आणि आदिवासी संस्कृती यामध्ये सारखाच रस आहे. शिवाय संगीत, चित्रपट हेही त्यांच्या आवडीचे विषय आहेत. लॉरी बेकर, सत्यजित रे आणि कुमार गंधर्व हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

सत्यजित रे यांचे चित्रपट, कुमार गंधर्वांचं गाणं आणि लॉरीबेकरचं गांधीवादी, पर्यावरणवादी वास्तुशास्त्र हे त्यांच्या लेखनाचे नेहमीच विषय होत आलेले आहेत.

अतुल देऊळगावकर यांच्या आणि माझ्या भेटीगाठी फारशा झालेल्या नाहीत. पण जिव्हाळा युगानुयुगाच्या सहवासाइतका आहे. एखाद्या लेखकाला आपण भेटत नसलो तरी त्याचं लेखन वाचत असतो तेव्हा आपण त्याच्या सहवासातच असतो.

दहा-बारा वर्षांपूर्वी एकदा बंगलोरला श्री श्री रविशंकर यांनी महाराष्ट्रातील सरपंचांची परिषद घेतली होती, तेव्हा एकदा आम्ही सोबत होतो.

जमलेल्या तीन हजार सरपंचांसमोर देऊळगावकरांनी पर्यावरण आणि शेती या विषयावर व्याख्यान दिलं आणि मी कविता वाचन केलं. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयातल्या एका कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना बोलावलं होतं.

आणि अगदी तीन महिन्यापूर्वी आमच्या परभणीतले माणिक पुरी यांच्या 'पक्षी येती अंगणी' या निसर्ग विषयक कादंबरीच्या प्रकाशासाठी देऊळगावकर आलेले होते.

परवा लातूरला गेलो तेव्हा त्यांनी आवर्जून घरी बोलावलं. मलाही कधीतरी त्यांच्या घरी जायचं होतंच. फार पूर्वी कधीतरी मी घरी गेलो होतो.

तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी बांधलेलं सरस्वती कॉलनीतलं ते एक मजली घर मी पाहिलेलं होतं. तेव्हा त्यांचे आई-वडीलही होते. मला वाटतं बहुदा बंगलोरला जातानाच त्यांना गाडीत सोबत घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो.

आज गेलो तर लॉरी बेकर यांचं पर्यावरणपूरक वास्तुशास्त्र डोळ्यासमोर ठेवून बांधलेला घराचा दुसरा मजला दिसला. मला वाटलं कदाचित लॉरी बेकर यांनी इथं येऊन हा नकाशा तयार करून दिलेला असावा. पण तसं काही नव्हतं.

लॉरी बेकर यांच्या वास्तुशास्त्राचा आता देऊळगावकर यांचाच इतका अभ्यास झालेला आहे की त्या पद्धतीच्या घरांचे नकाशे आता तेही लोकांना करून देऊ शकतात. सबब हे घर त्यांनी लॉरी बेकरच्या वास्तुरचनाशास्त्राच्या आधारे स्वतःच्याच देखरेखीखाली तयार करून घेतलेलं आहे.

हे घर पाहताना लॉरी बेकर यांचं वास्तुशास्त्र ही काय चीज असावी हे नक्की लक्षात येतं. घराच्या आत, बाहेर, अंगण, छत, ओसरी या सगळ्या गोष्टींचा विचार लॉरी बेकर यांच्या दृष्टिकोनातून केलेला दिसला. हे वास्तूरचनाशास्त्र निवासासाठी अत्यंत आल्हाददायक आणि तसं कमी खर्चाचंही आहे

जागोजाग ठेवलेल्या आदिवासी कलाकुसरीच्या वस्तूंनी तळ, भिंती आणि छत भरून गेलेलं आहे. त्यांचं ग्रंथालय पाहताना देऊळगावकरांच्या अभिरुचीचं प्रतिबिंब आपल्याला दिसत राहतं. कुमार गंधर्व, सत्यजित रे आणि लॉरी बेकर ही अतुल देऊळगावकर यांची दैवतं आहेत.

लॉरी बेकर सोडले तर कुमार गंधर्व आणि सत्यजित रे या दोघांमध्ये मलाही रस आहे. कुमारांचं गाणं कळो न कळो मीही पुष्कळ ऐकलेलं आहे.

मध्यप्रदेशात कुमार गंधर्व जिथं राहायचे त्या देवासला त्यांच्या घरी मी जाऊन आलेलो आहे. कुमार गंधर्व यांच्यावर एक कविताही लिहिलेली आहे, जी म. द. हातकणंगलेकर यांनी साहित्य अकादमीसाठी इंग्रजीत अनुवादित केलेली होती.

सत्यजित रे यांचे बहुतेक चित्रपटही मी पाहिलेले आहेत. सत्यजित रे आणि कुमार गंधर्व यांच्यावर मराठी आणि हिंदीत लिहून आलेलं बहुतेक सगळं लेखन मी वाचलेलं आहे. देऊळगावकर तर या विषयात कितीतरी खोलात गेलेले आहेत.

त्यांनी या सगळ्यांवर लेखनही केलेले आहे. त्यामुळे या दोघांच्या संदर्भात आम्ही कितीतरी वेळ बोलत होतो. अशा विषयांवर बोलण्यासाठी शेषेराव मोहिते सोडला तर लातूरमध्ये अन्य कुणी नाही असंही देऊळगावकर सांगत होते.

आदिवासी कलाकुसरीच्या वस्तू दाखवत, त्यातल्या खुब्या माझ्या लक्षात आणून देत देऊळगावकर त्याविषयी भरभरून बोलत होते. आदिवासींनी साध्या वस्तूंपासून तयार केलेली विलक्षण वेगळी वाद्य त्यांनी दाखवली.

त्यावरून गो. नि. दांडेकरांच्या कुणा एकाची भ्रमणगाथा या पुस्तकात आलेला वेळुवनातील भुंग्यांनी पाडलेल्या छिद्रातून वारा सुटल्यावर हजारो बासऱ्या एकदाच वाजत असल्यासारखा आवाज, याचीही आम्ही आठवण काढली.

आपण आपल्या पारंपरिक ज्ञानाचा नीट उपयोग करून घेतला नाही, आधुनिकतेच्या नादी लागलो आणि स्वतःला विसर्जित करत गेलो अशी तक्रार ते सतत करत होते.

त्यांचं घर त्यांनी त्या पद्धतीनं बांधलेलं होतं. ते स्वतः तसेच जगत होते. ते नुसतेच बोलके पर्यावरणवादी नाहीत तर कर्ते पर्यावरणवादी आहेत.

त्यांच्या शब्दाशब्दातून या विषयाची चिंता आणि या विषयावर त्यांनी केलेलं चिंतन प्रकट होत होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेला हा वेळ विलक्षण आनंदात गेला.

कितीतरी सुंदर चर्चा झाली. ही भेट संपूच नये, अशीच सुरू राहावी असं आम्हाला वाटत होतं. वेळ कसा गेला तेही लक्षात येत नव्हतं.

आज,२६ मार्च रोजी महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रकाशित होत असलेल्या निसर्गकल्लोळ या पुस्तकाच्या निमित्तानं मी अतुल देऊळगावकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

SCROLL FOR NEXT