

अशा विनाशपर्वातही अरण्यांत ठाण मांडून तेथील वृक्षवेलींचा व प्राणीपक्ष्यांचा सखोल अभ्यास करणारे विद्वानही आहेत. अरण्यांत राहणाऱ्या आदिवासींच्या (Tribal) ज्ञानाविषयी आदर असणारे संशोधकदेखील जगभर आहेत.
पॅरिस विद्यापीठातील (University of Paris) मानववंशशास्त्रज्ञ ब्रुस अल्बर्ट्स हे त्यापैकी एक! ते १९७५ साली, वयाच्या २३ व्या वर्षी, ब्राझीलमधील यानोमामी ह्या आदिवासी जमातीचा (Tribal Community) अभ्यास करण्यास तिथे गेले. त्यांची ‘शोधनिबंधापुरते आदिवासी’ अशी ‘अकादमी’ वृत्ती नव्हती.
स्वतःच्या करिअर पलीकडे जाणारी माणुसकी असल्यामुळे त्यांना आदिवासी व त्यांना दडपून टाकणाऱ्या कारवाया स्पष्टपणे दिसत होत्या. तेव्हापासून ते सातत्याने यानोमामी जमातीवर होणाऱ्या अन्यायाची बखर जगासमोर सादर करत आहेत.
आदिवासी लोक सहजासहजी कोणालाही आपलं मानत नाहीत. ब्रुस यांच्या अथक पराकाष्ठेमुळे त्यांनी यानोमामींचा विश्वास संपादन केला. ते त्यांची भाषा शिकले आणि अनेक मानववंशशास्त्रज्ञांना त्यांनी ॲमेझॉनमधील लुटारूंनी आदिवासींवर चालवलेल्या अत्याचारांविषयी लिहिण्यास प्रवृत्त केलं.
त्यांच्या ह्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांची यानोमामी जमातीचे प्रमुख पुजारी, मांत्रिक व वैदू ‘दावी कोपेनावा’ यांच्याशी गाठ पडली.
जंगलविनाश व त्यामुळे आदिवासींचं जीवन उदध्वस्त होतानाचे साक्षीदार ब्रुस अल्बर्ट्स यांनी ‘यानोमामी सहाय्यक ’ सेवाभावी संस्था स्थापली. आरोग्यसेवा व द्वैभाषिक शाळा चालू केल्या. तसंच यानोमामींच्या जमिनीच्या हक्कांसाठी ते लढू लागले.
त्यांच्याच पुढाकारातून ‘अमेरिकन आंथ्रपोलॉजिकल असोसिएशन’ने यानोमामींच्या रक्षणासाठी विशेष आयोग नेमून त्यांच्या अवस्थेविषयीचा अहवाल मागवला. त्या काळात दावी सुमारे १०० तास बोलत होते आणि त्यातून ‘द फॉलिंग स्काय’ हा ६२२ पृष्ठांचां ऐतिहासिक ग्रंथ साकारला गेला.
१९५६ साली ब्राझील- व्हेनेझुएला सीमेवरील रियो टुटुटोबी भागात दावी यांचा जन्म झाला. १९६३ मध्ये त्या भागात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रवेश केला. आपल्या अरण्यात हे परदेशी का आले? याचं सर्वांना कुतूहल होतं. आरंभी त्यांनी मुलांना वाचन-लेखन शिकवणं चालू केलं.
त्यामुळे दावीला लिहिता येऊ लागलं. पुढे दावींना मिशनऱ्यांच्या धर्मवेडेपणाचा त्रास झाला. पुढे सोन्याच्या शोधात ४०,००० गोऱ्या लोकांची फौज ३२,००० लोकसंख्येच्या यानोमामी भागात घुसली. त्यांना कमीत कमी काळात सोनं बळकवायचं होतं.
त्यांच्या ठायी कुठलाही विधिनिषेध वा दयामाया अजिबात नव्हती. त्यांना जंगल आणि आदिवासी दोघांनाही नष्ट करायचं होतं. त्यांनी एकामागून एक शेकडो वृक्षांची कत्तल करून तो भाग साफ केला. मग नद्यांमध्ये विष कालवलं. माणसं पटापटा मरू लागली.
हिवताप व गोवराची साथ पसरली. त्या घुसखोरांना विरोध करणाऱ्या दावींच्या काकांची निर्घृण हत्या केली गेली. यानोमामी जमातच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली.
ब्राझील सरकारनं स्थानिक जनतेच्या कल्याणासाठी स्थापलेल्या ‘ब्राझीली नॅशनल इंडियन फाउंडेशन’ ह्या संस्थेसाठी दावी यांनी काम केलं होतं. ‘ब्राझीली नॅशनल इंडियन फाउंडेशन’ ही संस्था म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होती.
आदिवासींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, असा छुपा उद्देश घेऊनच ती चालू झाली. संस्थेला निधी व साधनसामग्री मिळू द्यायची नाही. म्हणजे कुठलंही काम होऊ नये याची पुरेपूर तरतूद करून ठेवायची.
आरोग्यसेवा व शिक्षण ह्या मूलभूत सेवा पुरवण्यासाठी संपर्क करणं आवश्यक असतं. ॲमेझॉनच्या जंगलात खेड्यांमधील अंतर खूपच जास्त आहे. दावी यांना डोंगर-दऱ्या ओलांडून खेड्यापाड्यांना पायी जाण्यासाठी २० दिवस लागत. म्हणून त्यांनी संस्थेकडे हेलिकॉप्टर वा विमानाची सुविधा मागितली.
संस्थेला वाटत होतं, ‘अशाने दावी यांचं महत्त्व वाढेल.’ दावी यांचा संपर्क वाढूच नये, यासाठी ते तत्पर होते. आदिवासींच्या भल्यासाठी स्थापलेल्या ह्या संस्थेने जंगल साफ करणाऱ्यांना मोकळं रान दिलं होतं.
साहजिकच ब्राझीलच्या राजकारण्यांनी आणि या संस्थेने दावी व आदिवासींची पूर्णपणे उपेक्षा केली. दुसरीकडे दावी यांना मारून टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले. तरीही ते आदिवासींच्या जंगल व जमिनीच्या अधिकारासाठी २० वर्षे लढत राहिले. त्यांनी दूरदूरवरच्या खेड्यांना भेटी दिल्या.
दावी म्हणतात, ‘‘ हे भयंकर लोक अगदी अचानक जंगलात दाखल झाले. त्यांनी चोहोबाजूंनी आमच्या घरांभोवती वेढा घातला. आमच्या मानाने त्यांची संख्या प्रचंड होती. ते सातत्यानं शोध घेत आपसात बोलत होते. काहीतरी दुष्ट बाब असावी, असं त्यांच्या बोलण्या-वागण्यावरून वाटत होतं.
आमच्या कानांवर हा शब्द कधीच पडला नव्हता. ते ‘सोनं-सोनं’ असं सारखं पुटपुटत होते. मग त्यांनी साऱ्या दिशांनी खोदकाम चालू केलं. यंत्रं आणून गुदमरवणारा विषारी धूर सोडला. ते नद्यांमध्ये घाण कालवत गेले. मी संतापाने आणि चिंतेने ग्रासून जात होतो.
उगमापासून नद्यांना नासवून टाकणारे त्यांचे सर्व गलिच्छ व नीच उद्योग मी जवळून पाहत होतो. ह्या साऱ्या अधम कारवाया कशासाठी ? तर गोऱ्या लोकांना मढवण्यासाठी. दातांपासून ते नखशिखांत सर्व काही सोन्यानं सजवण्यासाठी.
घरांतील तिजोऱ्यांत सुवर्णसाठा वाढवण्यासाठी. जंगलावरील ह्या अमानुष हल्ल्याचा मी साक्षीदार होतो आणि त्यामुळेच जंगल वाचवण्याची निकड माझ्या लक्षात आली. त्यांच्या सोन्यासाठीच्या लालसेमुळे आमची वनसंपदा, वृक्षं, पक्षीप्राणी, नद्या व मासे सर्व काही नष्ट होणार आहे;
ते निव्वळ विनाशक आहेत, हेही हळूहळू माझ्या ध्यानात येत गेलं. त्यामुळे मी जंगलातील मित्रांशी, जमातीच्या बैठकींत, पुढे गोऱ्या लोकांशीही तोडक्यामोडक्या पोर्तुगीजमधून जंगल वाचवण्याविषयी बोलू लागलो.’’
‘‘गोरे लोक हा मोठा धोका आहे. ते जमीन खोलवर खणत जातात. झाडं कापत सुटतात. आमचा श्वासच ते नष्ट करत चालले आहेत. अशाने आमचं जगणं, आम्हाला श्वास घेणं कठीण होऊ लागतं. आम्हा सर्वांचा श्वास गेला की जंगल ओकंबोकं व मूक होऊन जाईल.
आकाशात राहणाऱ्या आत्म्यांसमवेत आमचा आत्माही जाईल. गोरे सोडत असलेल्या घाणेरड्या व जीवघेण्या वायूंमुळे आकाशसुध्दा रोगट होऊन आक्रंदू लागेल. एक दिवशी आकाश कोसळून पडेल. त्याखाली सर्व सृष्टी चेंगरून जाईल.’’
मधल्या काळात मृत्यूचा धोका ओळखून दावींनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पोर्तुगीज भाषा येत होती व बाहेरच्या भागाशी संपर्क असलेले ते एकमेव आदिवासी होते. त्यांनी काही सहकाऱ्यांसह होडीने शेकडो किलोमीटर प्रवास केला.
जागतिक प्रसारमाध्यमांनी यानोमामी आदिवासींवरील अत्याचाराची दखल घेतली. निसर्गविनाश व त्यामागील कारणं समजाव़ून सांगणाऱ्या दावीला वैज्ञानिक व प्रसारमाध्यमं यांनी उचलून धरलं. दावी यांना युरोप व अमेरिकेने आमंत्रित केलं.
नंतर त्यांना जगभरातून व्याख्यानासाठी आमंत्रणं येऊ लागली. आदिवासींच्या गावांपर्यंत जाऊन शिक्षणप्रसार व निसर्गरक्षण यांची महती सांगण्यासाठी, दावी यांना ह्या सर्व रकमांचा उपयोग होतो.
१९८८ साली जगातील दबावामुळे ब्राझील सरकारने ॲमेझॉनच्या जंगलात हजारो वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासींच्या जमिनींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी घटनात्मक तरतूद केली होती. त्यानुसार आदिवासींच्या जमिनींची वेगळी नोंद करण्याचं काम चालू केलं.
तर १९९२ साली ब्राझील सरकारने सोनं खोदणाऱ्यांना हकलून लावलं आणि ती भूमी यानोमामींची असल्याचं घोषित केलं. मागील ३० वर्षांपासून जगातील समस्त बलाढ्य उद्योगांची वक्रदृष्टी ॲमेझॉनकडे वळली आहे.
अमेरिकेने पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भरमसाठ अनुदान देऊन मक्यापासून इथेनॉलला चालना दिली तेव्हा त्यांना सोयाबीनचा तुटवडा भासू लागला. सोयाबीनपासून तेल निघतेच.
शिवाय, तेल काढल्यावर तेलरहित पेंड हे जनावरांसाठी पौष्टिक खाद्य आहे. सोयाबीन लावण्यासाठी त्यांची नजर गेली ती ॲमेझॉनच्या जंगलावर! आजमितीला ॲमेझॉन जंगलामधील अंदाजे २.५ कोटी हेक्टर जमिनीवर अमेरिकी कॉर्पोरेट कंपन्यांनी सोयाबीनचे पीक उभे केले आहे.
आता ब्राझील हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश झाला आहे. याच रीतीने अर्जेंटिनाचीही अवस्था झाली आहे.
निसर्गसंपन्न देश हे प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांची वसाहत झाले आहेत. (हाच तो नववसाहतवाद!) २०१० पासून जगभरात १५ कोटी हेक्टर जमिनींचे असे सौदे झाले आहेत.
अमेरिका, इंग्लंड, चीन, दक्षिण कोरिया, कुवेत, सौदी अरब, कतार, बहारिन ह्या देशांनी सुदान, इथिओपिया, कांगो व मॅदागॅस्करमध्ये अन्नधान्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली आहे. कुणाला गहू, तांदूळ हवा आहे, तर कुणी मोगली एरंडाचे पीक घेणार आहे. काही देशांमधील खाजगी कंपन्या तर काही देशांची सरकारंच अशा व्यवहारांमध्ये पुढाकार घेत आहेत.
कुवेतचे पंतप्रधान भेटीला गेल्यावर शेतजमीन भाड्याने देण्याचा निर्णय कंबोडियाच्या पंतप्रधानांनी जाहीर केला. सुदान आणि कतार देशांनी शेतीसुधारण्यासाठी सहकार्य करार केला.
तर शेतजमीन घेण्यासाठी सौदी अरबचे अधिकारी ब्राझील, इजिप्त, कझाकस्तान, सुदान व तुर्कस्तानसारख्या देशांना भेटी देत आहेत. भारतातील कारुतुरी ॲग्रो, शिवा ग्रूप, रुची सोया, ओलम इंटरनॅशनल, आदित्य बिर्ला ग्रूप, ह्या कंपन्यांनी आफ्रिकी देशांत लाखो हेक्टरचे सौदे केले आहेत.
ॲमेझॉनच्या विनाशाला ब्राझीलच्या राजकारणातून पाठबळ मिळत होतं. ब्राझीलचे ३७ वे अध्यक्ष मिशेल तेमेर हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे २०१८ साली गर्तेत आले होते. त्यांचा पक्ष ‘ब्राझीलियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ अल्पमतात आला.
ब्राझीलमध्ये नोंदणी झालेले सुमारे ३० राजकीय पक्ष आहेत. तेमेर यांना ‘बॅनकॅडा रुरलिस्टा’ ह्या शेतीक्षेत्रातील कंपन्या, खनिज काढणाऱ्या कंपन्या व प्रचंड शेती असलेल्या जमीनदारांना धार्जिण्या असणाऱ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळवायचा होता. त्यासाठी त्यांनी २०१८ च्या फेब्रुवारीमध्ये ॲमेझॉनमधील ‘रेन्का अभयारण्या’चे संरक्षण काढून घेण्याचे फर्मान काढले.
ॲम्पा व पॅरा राज्यांतील ४६,००० चौरस किलोमीटरचे जंगल नष्ट करून सपाट केलेली ती जागा खनिज कंपन्या, रस्ते तयार करणाऱ्या कंपन्यांना सोपविण्यात आली होती.
त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते रुडॉल्फ रॉड्रिग्ज यांनी ‘ॲमेझॉनवरील ५० वर्षांतील जबरदस्त दरोडा’ अशी घणाघाती टीका केली होती. २०१४ पासून ब्राझीलमधील चार माजी अध्यक्षांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगावा लागला आहे. तेमेर हे त्यांपैकी एक!
जंगल हे संपत्तीची निर्मिती करण्यासाठी सोपं साधन झालं. जमिनीचे भाव आणि जंगलातील आगी वाढण्याचे प्रमाण सम आहे. जेवढे अरण्य मोठे तेवढ्या आगी अधिक! इंडोनेशिया, म्यानमार, झांबिया, केनिया असे अनेक देश याच वाटेने जात आहेत.
आगीने जंगलातील जागा मोकळी झाली की सौदे करायचे, की आधी सौदे करून आग लावायची हा तपशील तसा गौण आहे. जागतिक बँकेने ह्याला ‘ भूग्रहणाची लाट’ म्हटले आहे, तर ‘द इकॉनॉमिस्ट’ हे नियकालिक या प्रकाराला ‘कामे देशाबाहेर सोपवण्याची (आउटसोर्सिंग) तिसरी लाट’ म्हणते.
(१९८०च्या दशकात उद्योगजगाने वस्तूंचे उत्पादन देशाबाहेर नेले. तर १९९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाने कामे बाहेर नेली. २००० नंतर अन्नधान्याचे उत्पादन देशाबाहेर नेले.)
कंपन्यांना जमीन पाहिजे म्हणजे पाहिजे! तिथे नकार चालतच नाही. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात अस्सल बिल्डर बोम्मन इराणी जागेचे डील करताना टेबलवर पाकिट व पिस्तूल ठेवून कमालीच्या शांतपणे निवड करण्याचे ‘स्वातंत्र्य’ देतो, ‘‘ये वॉलेट है और ये बुलेट है.
जो चुनना है, वो चुन.’’ असे प्रसंग अगदी तसेच वास्तवात उतरत असतात. शेतकऱ्यांनी काही निवडले नाही तर, कॉर्पोरेट कंपनी गोळीची निवड करते. ( विख्यात साहित्यिक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीत ‘सुंदर मुलगी ही बापाच्या गळ्यातील धोंड’ असं म्हणून ठेवलंय ते याच अर्थाने!) २००२ पासून पर्यावरण रक्षण करू इच्छिणाऱ्या व वनहक्कांसाठी लढणाऱ्या ६५० कार्यकर्त्यांना ॲमेझॉनमध्येच जीव गमवावा लागला आहे.
मागील ३० वर्षांपासून पर्यावरण व्यवस्थापन विभागाची ‘ब्राझीलियन इन्स्टिट्यूट ऑफ द एन्व्हायर्नमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस’ (आय.बी.एम.ए) ही संस्था डोळ्यांत तेल घालून ॲमेझॉन वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यांनी असंख्य वेळा गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना पकडून लाकूडतोड व खाणकाम रोखले आहे.
कोट्यवधींचे लाकूड जप्त केले आहे. आय.बी.एम.ए. च्या निरीक्षकांनी अरण्यलुटीचे अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत.
२०१९ च्या जानेवारीपासून ॲमेझॉनच्या रक्षणाची गरजच उरली नाही. कल्पनाही करू शकत नाही ते ते देऊ शकणाऱ्या ह्या अरण्यामधून ‘जो जे वांछिल’ तो ते मोकाटपणे कधीही, कसेही आणि कितीही घेऊ शकतो.
‘सोशल लिबरल पार्टी’ चे जैर बोल्सॅनेरो हे ब्राझीलचे अध्यक्ष होताच त्यांनी ॲमेझॉनच्या जंगलात ‘विकासच विकास’ करायचं ठरवून टाकलं. मग काय विचारता? बेकायदेशीर जंगलतोड रोखण्यासाठी टेहळणी करणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यास निघालेल्या टँकरच्या चालकाला हुसकावून लावण्यात आलं आणि टँकरला पेटवून दिलं.
सर्व प्रकारच्या निरीक्षण मोहिमा तातडीने बंद करण्यात आल्या. (आपल्याकडे ठिकठिकाणी वाळू घेऊन विकास काम करणाऱ्यांनासुध्दा त्यांच्या कामात आणलेला व्यत्यय अजिबात आवडत नाही. ट्रकसमोर कोणी आले तर त्यांचा नाइलाजच होतो! तसंच.)
बोल्सॅनेरो यांना ‘विकास कार्यात’ विघ्न आणणाऱ्या आय.बी.ए.एम.ए. चं काम अजिबात पसंत नव्हतं आणि नाही. मात्र ही संस्था उपग्रहाकडून आलेल्या छायाचित्रांच्या साहाय्याने जंगलातील आगीचे क्षेत्र व विनाश झालेल्या भागाची माहिती जाहीर करत असे.
आय.बी.एम.ए. ने ‘‘२०१९ ह्या एका वर्षात ॲमेझॉनमध्ये ऐंशी हजार वणवे पेटले.’’ ही माहिती दिली. हे काही बोल्सॅनेरो यांना आवडलं नाही. त्यांनी तत्काळ ‘‘ही माहिती साफ चुकीची आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था यांनीच ह्या आगी लावल्या आहेत आणि त्यांनीच हे बदनामीचं कारस्थान रचलं आहे.
ह्या ब्राझीलविरोधी कटाचे नेतृत्व अवकाश संशोधक केंद्राचे संचालक रिकार्डो मॅग्नस ओसोरियो गॅल्वहो हे करीत होते. मी काही लाकूडचोरांना मदत करणारा नाही. उलट मी कॅप्टन चेनसॉ (लाकडावर कोरीव काम व नक्षी करणारा) आहे. ’’ असे सांगत बोल्सॅनेरो यांनी अवकाश संशोधक केंद्राचे संचालक रिकार्डो मॅग्नस यांना पदावरून काढून निलंबित केलं.
‘ग्रीनपीस’, ‘डब्ल्यु.डब्ल्यु.एफ’ यांसारख्या अनेक संस्थांनी याचा निषेध करीत पुरावे मागितले. बोल्सॅनेरो यांनी त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा दिला नाही.
तरीही, काही निरीक्षक गुन्हा नोंदवून शिक्षा करण्याचे धाडस दाखवत होते. मग अशा २१ अधीीक्षकांना (एकंदरीत २७ पैकी )बोल्सॅनेरो यांनी निलंबितच करून टाकलं. तिकडे जंगल रक्षण करणारे पर्यावरणप्रेमी व वनहक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते जीव मुठीत धरून भूमिगत झाले आहेत.
रायन्ना क्रिस्टिन मॅक्सिमो फ्रँको ही आदिवासी महिलांच्या वनहक्कांसाठी लढत आहे. रायन्नाला ॲमेझॉन व आदिवासींच्या रक्षणाची मोहीम स्थगित करावी लागली आहे. ब्राझीलची ‘पर्यावरणीय घातक कृत्यासाठी भयानक राष्ट्र’ अशी ओळख झाली आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.