Sakal Swasthyam 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Sakal Swasthyam 2023 : आध्यात्मिक अनुभवातूनच सच्चिदानंदाची प्राप्ती : गुरू श्री एम

Guru Shri M : ९९ टक्के लोक तत्कालिक आनंदाकडे आकर्षित होतात. कधी कधी दुःख देणाऱ्या; पण कायमस्वरूपी टिकणाऱ्या सच्चिदानंदाकडे आपण दुर्लक्ष करतो.

Team Agrowon

Pune News : ‘‘ऋषींनी दोन प्रकारचे आनंद अनुभव सांगितले आहेत. एक तत्कालिक आनंद आणि दुसरा दीर्घकाळ टिकणारा ‘सच्चिदानंद’. ९९ टक्के लोक तत्कालिक आनंदाकडे आकर्षित होतात. कधी कधी दुःख देणाऱ्या; पण कायमस्वरूपी टिकणाऱ्या सच्चिदानंदाकडे आपण दुर्लक्ष करतो. सच्चिदानंदासाठी दुःखाशीही सामना करणारा आध्यात्मिक अनुभव हवा,’’ असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी केले. ‘स्वास्थ्यम्’मध्ये उपनिषदांवरील दुसऱ्या भागात त्यांनी कठोपनिषदावर भाष्य केले.

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’चा रविवारी (ता.३) रात्री समारोप झाला. तीन दिवस झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कठोपनिषदातील आठ वर्षांच्या नचिकेताची कथा आणि त्यामागची आध्यात्मिक भूमिका, तसेच वैदिक संप्रदायातील वेदांचे महत्त्व श्री एम यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘वैदिक संप्रदायातील सर्वांत मूल्यवान ठेवा म्हणजे उपनिषदे आहेत. उपनिषदांचा अभ्यास करणे आध्यात्मिक यात्रेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे वाचन करण्यापेक्षा गुरूच्या सान्निध्यात बसून शिकायला हवीत.’’ साधना करणाऱ्यांनी विभूतीपादात न अडकता कैवल्याचा ध्यास धरायला हवा, असेही ते म्हणाले.

सनातन धर्माबरोबरच बौद्ध, जैन, शीख धर्मांमध्ये उपासनेचा सर्वोत्तम मार्ग म्हणून प्रणव उपासना म्हणजेच ओंकार सांगितला आहे. आपण तो समजून घ्यायला हवा. वेदांती बाकी दुसऱ्या साधनेत विश्वास ठेवत नाही. मात्र प्रणव साधना करतात. ओंकार हा खूप मौल्यवान प्रणव आहे. ‘अ’ म्हणजे सृष्टीची पहिली हालचाल आहे. वाचा नसणाऱ्यालाही ‘आ’चा उच्चार करता येतो. ‘ऊ’ हा सृष्टीच्या शाश्वततेचा नाद आहे. ‘म’कार हा पूर्णत्वाचा, नव्या सुरुवातीचा नाद आहे.

प्रत्येक व्यक्तीत परमात्मा

अध्यात्माला दैनंदिन जीवनात आत्मसात करण्यासाठी आवश्यक आचरणाबद्दल ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी श्री एम यांच्याशी संवाद साधला...

अभिजित पवार : नचिकेताने जे वर मागितले होते, त्याच्या प्रत्यक्ष स्वरूप नक्की काय आहे? अध्यात्म म्हटले की मित्र आणि कुटुंबातील लोक घाबरतात, असे का?

श्री एम : प्रत्येक व्यक्तीत परमात्मा स्थित आहे. अवघ्या आठ वर्षांच्या नचिकेता एका आध्यात्मिक उंचीवर पोहोचला होता. कदाचित ती मागच्या जन्मातील पार्श्वभूमी असेल. रमण महर्षींबद्दल हा अनुभव आपल्याला सांगता येईल. वयाच्या १५व्या वर्षीच त्यांनी ‘मी शरीर नसेल तर कोण आहे?’ हा प्रश्न पडला आणि तेथून त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला.

ज्या ज्योतीवर वाऱ्याचाही परिणाम होत नाही. अशा ज्योतीची उपमा आध्यात्मिक मनाला दिली आहे. मनाला असे स्थिर करणारी साधना कोणतीही असू शकते. जगात कोणीही सर्वसामान्य व्यक्ती नाही, कारण प्रत्येक व्यक्तीत परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे तो नक्कीच आध्यात्मिक प्रवास करू शकतो.

गुरू कसा ओळखावा ?

 मी माझा अनुभव सांगतो. मी अशा परिस्थितीत जन्मलो, जेथे योग, उपनिषदांचा अभ्यास कानावर पडणे शक्य नव्हते. पण माझ्या मनामध्ये नेहमी ओढ होती. केरळच्या त्रिवेंद्रममध्ये जन्मलेला मी आकाशातील ढगांना हिमालय समजत असे. एक दिवस बाबाजी आले आणि आयुष्य बदलले. आध्यात्मिक यात्रा करण्यासाठी ज्याच्या मनात दृढ विश्वास असेल, त्याला गुरू नक्की भेटतात. त्यांना कोठे शोधायची गरज नाही. ते आपोआप तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाल.

साधक कसा असावा?

 साधकामध्ये तीन गुण असावेत. पहिले म्हणजे त्याचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण हवे, कोणत्याही परिस्थितीत मन शांत असायला हवे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या हिताचा विचार करणारा व्यक्ती साधक असू शकतो. तो मूर्तिपूजा करत असो किंवा नाही. त्याचे मन शांत हवे आणि क्रोधावर नियंत्रण असायला पाहिजे. खरेतर आज खऱ्या शिष्यांची कमतरता आहे.

ओंकाराची साधना कशी करावी?

 ओंकार वैश्विक गीत आहे. सर्वांनी ओंकार म्हणायला हवा, आपल्या हृदयाच्या आतील ध्वनी म्हणजे ओंकार होय. ओंकाराचे श्वासाबरोबर उच्चारण करणे गरजेचे आहे. ‘म’कारावर सर्वाधिक जोर देणे गरजेचे आहे. ओंकार चालू असताना विचार आपोआप स्थिर होतात.

दिमाखदार समारोप..

रविवारी समारोपाच्या दिवशी ‘आयुर्वेद एक क्रांती’ विषयावर ‘पतंजली आयुर्वेद’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांचे मार्गदर्शन झाले. तसेच, विश्व फाउंडेशनतर्फे आयोजित भव्य सामूहिक अग्निहोत्रास उत्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध गायक मुख्तियार अली यांची मैफील रंगली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकारांनी रसिकांचे मनोरंजन केले.

श्री एम यांचा संदेश

दिवसाची सुरुवात दहा मिनिटे साधनेने करावी. एक दिवा लावून थोडा वेळ जप, ध्यान किंवा तुमची जी पद्धत असेल, ती करावी. आपोआप त्यात रस निर्माण होतो. मनाला वळण आणि साधनेसाठी स्वतःचे आसन असावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : जुन्नरमध्ये द्राक्ष बागांचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान

Onion Rate : बाजारभावाअभावी स्वप्नांवर पाणी

Sugarcane Season : विनापरवाना गाळप बंद करा

Sugarcane Season : कर्नाटकचा ‘गनिमी कावा’

Soybean Procurement : हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच

SCROLL FOR NEXT