Sakal Swasthyam
Sakal Swasthyam Agrowon

Sakal Swasthyam 2023 : त्याग हीच सर्वांत मोठी तपस्या : आध्यात्मिक गुरू श्री एम

Swasthyam In Pune : सर्वांत मोठी तपस्या म्हणजे त्याग होय,’’ असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी केले.

Pune News : ‘‘तपस्येचा अर्थ आध्यात्मिक उष्मा असा होतो. खरेतर कर्मयोग हीच तपस्या आहे. आजच्या कलियुगात एका पायावर उभे राहून कठोर तपस्या करणे शक्य नाही, तर दुसऱ्याला आपल्याकडील काहीतरी देणे हीच खरी तपस्या ठरेल. सर्वांत मोठी तपस्या म्हणजे त्याग होय,’’ असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी केले. ‘स्वास्थ्यम्’च्या पहिल्याच दिवशी त्यांनी उपनिषदांवर भाष्य केले. उपनिषदे केवळ संन्यासी साठी नसून प्रापंचिकांसाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी उपनिषदांची निर्मिती आणि पार्श्वभूमीसंबंधी श्री एम यांनी मांडणी केली. ते म्हणाले, ‘‘उपनिषदांमधील एकही ऋषी संन्यासी नाही. त्यामुळे उपनिषदे फक्त संन्याश्यांसाठी असल्याचा गैरसमज तोडायला हवा. अनेक वर्ष उपनिषदांना लपवून ठेवले होते. आता याला सर्वांपर्यंत पोहोचविण्याची वेळ आली आहे. वेदांचा अर्क असलेली उपनिषदे लोकांना समजायला हवीत.’’ वेदांचा अंतिम भाग म्हणजे उपनिषदे असून, पहिली ११ उपनिषदे प्रमुख आहेत. त्यांची चर्चा ‘स्वास्थ्यम्’मधील दोन सत्रांतून होणार आहे.

श्री एम म्हणाले...

वेद म्हणजे फक्त संहिता नव्हे :

वेद आणि उपनिषदांत परमात्म्याबाबत लिहिले आहे. ते सर्व विस्कळित होते. ऋषी पाठांतर करून ते शिकत होते. त्यानंतर आलेल्या वेदव्यासांनी त्याचे एकत्रीकरण केले. वेद म्हणजे फक्त संहिता नाही. संहितेनंतरचा दुसरा भाग हा ब्राह्मण असून, त्यानंतर आरण्यक येते. ज्यात विद्यार्थी वनामध्ये जाऊन शिकत असे. म्हणून त्याला वनामध्ये शिकण्याचे ज्ञान असे म्हटले जाते. अरण्याकडून उपनिषदाकडे आपण येतो. वेदांचा अंतिम भाग म्हणजे उपनिषद होय.

Sakal Swasthyam
Sakal Swasthyam 2023 : पुण्यात एक ते तीन डिसेंबरला आरोग्यमेळा

सिद्धीपेक्षा साधना महत्त्वाची :

पतंजली योगसूत्रात विभूतीपाद नावाचे उपनिषद आहे. यात सिद्धीच्या बाबतीत लिहिले आहे, पण त्याचे आकर्षण नको. त्याचा काहीही फायदा नाही. साधना महत्त्वाची, त्यासाठी हवा मार्गदर्शक नकाशा. मोक्ष प्राप्ती कशी होऊ शकते, यासाठी उपनिषद शिकले जाते.

उपनिषदांचा गाभा :

वेदांमध्ये मंत्रानंतर उपनिषदे सुरू होतात. सर्वांत महत्त्वाचा वेद म्हणजे सामवेद, कारण श्रीकृष्णाने स्वतःचे वर्णनच सामवेदाने केले आहे. सामवेदात सर्वांत महत्त्वाचे उपनिषद म्हणजे केनोपनिषद. आपण कोण आहोत, कोठून आलात, या प्रश्नाचे उत्तर त्यात आहे.

पूर्ण ते शून्य :

उपनिषद आपण पूर्णत्वातूनच आल्याचे सांगते. मनातील पहिला विचार कोणी आणला? पहिला प्राण कोठून आला? आपली भाषा कशी आली? अशा प्रश्नांतून हा शोध सुरू होतो. एकेकाळी आपण भौतिकशास्त्रात न्यूटोनियन मॅकनिक शिकत होतो. पण जेव्हा आपण अतिसूक्ष्माकडे जातो, तेव्हा पुंज्य भौतिकशास्त्रात विचार करतो.

जिथे सापेक्षतेच्याच प्रश्नावर चर्चा होते. वस्तूपेक्षा निरीक्षक नक्की कोण आहे, हे महत्त्वाचे. हेच केनोपनिषदाचे महत्त्व. मनुष्यालाही जर ते जाणून घ्यायचे असेल, तर स्वतःच्या अहंकारालाही तोडावे लागेल. काही नसल्यातून माणूस सर्वकाही होतो. काही वेळा ज्ञानापासून वाचले पाहिजे. त्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही.

पुण्यातील डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये सकारात्मक ऊर्जेचा होम प्रज्वलित होत होता. मंत्रोच्चार करत दिलेल्या पवित्र आहुत्यांमधून ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ची शुक्रवारी (ता.१) मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.

‘स्वास्थ्यम्’ आरोग्य महोत्सव आहे. सलग दुसऱ्या वर्षी होणाऱ्या महोत्सवाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आध्यात्मिक व योग गुरू श्री एम, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालक मृणाल पवार, विश्व फाउंडेशनचे प्रमुख पुरुषोत्तम राजिमवाले महाराज आणि प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम व्यासपीठावर उपस्थित होते.

निर्वातातच पूर्णत्व

सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी श्री एम यांच्याशी साधलेला संवाद

अभिजित पवार : विचारांची उत्पत्ती कशी होते? भाषा येत नसेल तर.. किंवा भाषेनुसार विचार बदलतात का?

 श्री एम : प्रत्येक व्यक्ती कोणत्यातरी भाषेत चिंतन करत असते. ती भाषा त्याला जन्माने मिळते किंवा शिकलेली तरी असते. प्रत्येक चिंतन भाषेशी जोडले गेले आहे. भाषा नसेल तर चिंतन होणार नाही. फक्त राग आणि भावनांना भाषा नसते. कारण त्यात भाषा आली की ते कृतीत परावर्तित होते. भाषा नसलेली गोष्ट म्हणजे शब्द आणि संगीत होय. भाषेच्या पलीकडे संगीत असते.

पूर्ण ते शून्य हा आध्यात्मिक प्रवास नक्की काय?

 अहंकारी मनाला निर्वात करायला हवे. कारण आपण त्याला ज्ञानाने समृद्ध करू शकतो. जे परिभाषित करता येत नाही ते शून्य किंवा पूर्ण आहे. नवीन काही शिकायचे असेल, तर जुने विचार टाकावे लागतील. योगाची व्याख्या चित्त रिकामे हवे. निर्वातातच पूर्णत्व येते.

Sakal Swasthyam
Agriculture Technology : प्रयोगशील, संरक्षित शेतीचे गवसले तंत्र

उपनिषदांचा अभ्यास कसा करावा? कोठून करावा? त्याची पात्रता काय असावी?

 उपनिषदे वाचण्यासाठी त्यासंबंधीचे पूर्वग्रह आधी दूर करायला हवेत. ते वाचत असताना आपले कुतूहल विकसित होईल. उपनिषदांत ज्ञान मार्गाव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत. सत्याच्या शोधासाठी ऋषी दोन विद्या सांगतात.

एक परा आणि दुसरी अपरा विद्या. वेदांनाही अपरा विद्या म्हटले असून, जी विद्या सत्याकडे नेते तिला विद्या म्हणजे परा विद्या म्हटले आहे. त्यामुळे अनेक लोकांना साधना न करताही योगी होता आले. उपनिषदांचा सार हा ज्ञान, भक्ती, कर्म आणि योग मार्गात आहे. आपल्या क्षमतेनुसार उपनिषदांचा अभ्यास करावा.

संस्कृत हा धर्माचा विषय नाही :

 संस्कृतची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे. आपण त्याचा अर्थ समजून घेत नसल्याची खंत श्री एम यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात संस्कृत शिकवायला पाहिजे. संस्कृत हा धर्माचा विषय नाही, तर सर्वांत जुनी भाषा म्हणून ती शिकवायला हवी.’’ तसेच शिक्षणात अध्यात्माचा अभ्यासक्रम असा ऐच्छिक विषय असायला हवा, असेही ते म्हणाले.

श्री एम यांचा संदेश :

सत्संगासाठी आठवड्यातून एकदा एकत्र यावे. उपनिषदांवर चर्चा करावी, अभ्यास करावे किंवा ध्यान करावे. आध्यात्मिक यात्रेत आठवड्यातून एकदा एकत्र यायला हवे. सेवा आणि कर्म ही तपस्या आहे. आताच्या युगात कठोर तपस्या करू नये.

‘एकमेकांना प्रोत्साहन देणे गरजेचे’

‘‘वैवाहिक जीवनात नवरा आणि बायको या दोघांचेही जीवनातील ध्येय एकच असते. ते ध्येय साध्य करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. परंतु ते दोन्ही मार्ग आयुष्याच्या एका टप्प्यावर एकत्र येतात. त्यामुळे जबाबदाऱ्या लक्षात घेऊन कायम एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,’’ असे सांगत अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांनी नात्यातील हळवी गुंफण उलगडली. तर, ‘‘नाते वृद्धिंगत करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा’’, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी दिला.

लंडनवरून मी निघाले, तेव्हा तेथे हिमवृष्टी होत होती. भारतात येताच येथे स्वच्छ सूर्यप्रकाश होता. आकाश निरभ्र होते आणि येथील माणसांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि समाधान होते.
- गैय्या संस्कृत, गायिका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com