Ashadhi Wari 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : विठ्ठल, विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी

Pandharpur Wari : आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी (ता. १७) श्री विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Team Agrowon

Solapur News : आषाढी वारीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात सुमारे १५ लाखांपर्यंत वारकरी दाखल झाले. मंदिर परिसरासह चंद्रभागा नदीतीरी लाखो वैष्णवांची मांदियाळी जमली आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जयघोष पंढरपुरात सुरू आहे. ‘विठ्ठल-विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी,’ अशा वातावरणाने अवघी पंढरी भक्तीने भारून गेली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी (ता. १७) श्री विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. यंदा पाऊसमान वेळेवर झाल्याने वारकऱ्यांत चांगला उत्साह आहे. अगदी आळंदी आणि देहूहून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातही वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पंढरपुरातील गर्दी मंगळवारनंतर बुधवारी पुन्हा क्षणोक्षणी वाढत गेली. चंद्रभागेतील दशमीचे आणि आजच्या एकादशीच्या स्नानाला महत्त्व असल्याने या स्नानासाठी वारकऱ्यांची चंद्रभागेतीरी झुंबड उडाल्याचे चित्र होते.

चंद्रभागा नदीतील स्नान आणि नगरप्रदक्षिणेसाठी वारकऱ्यांच्या प्रमुख मार्गावर दिवसभर लगबग राहिली. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा आणि वारकऱ्यांच्या राहुट्यांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजने सुरू आहेत. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड, भक्तिमार्ग, कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, रेल्वे स्थानक परिसरात वारकऱ्यांची सर्वाधिक गर्दी राहिली. संपूर्ण शहरात चोहोबाजूंनी ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने एक वेगळे चैतन्य आणि उत्साह वारीमध्ये दिसत आहे.

प्रतिमिनिटाला ३० वारकऱ्यांचे दर्शन

गेल्या दोन दिवसांपासून पदस्पर्श दर्शनासह मुखदर्शन या दोन्ही रांगा गर्दीने ओसंडून वाहत आहेत. या रांगांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख वारकरी उभे आहेत. पदस्पर्श दर्शनाला १८ ते २० तासांचा अवधी लागत असून, प्रतिमिनिटाला २५ ते ३० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत होते.

बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘‘हे....विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी, समाधानी ठेव, कष्टकऱ्यांच्या, सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, त्यांचे दुःख दूर कर, त्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येवोत,’’ असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १७) विठ्ठलाच्या चरणी घातले. तसेच लवकरच तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शनासाठी पंढरपुरातही टोकन पद्धतीने दर्शन सुरू करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असणारा १०३ कोटी रुपयांचा निधीही त्वरित देऊ, असे आस्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान

या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय ५५) व सौ. आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी शेतकरी असून, मागील १६ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Student Travel: शिक्षणासाठी पाच लाखांवर मुलांचे ‘अप-डाउन’

Bogus Voter List: मतदार यादीत घोळ, मात्र आयोग कारवाई करणार नाही : पवार

Turmeric Rate: हळदीच्या दरावरील दबाव कायम

Banana Rate: हंगामी फळांची आवक वाढली, केळी दरांना फटका

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

SCROLL FOR NEXT