Ashadhi Wari 2024 : विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीत फुलला भक्तीचा मळा!

Pandharpur Temple : आषाढी वारीचा मुख्य सोहळा बुधवारी (ता. १७) साजरा होत असून, पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.
Pandharpur
Pandharpur Agrowon
Published on
Updated on

Pandharpur Ashadhi wari 2024 :

पाहातां श्रीमुख सुखावलें सुख ।

डोळियांची भूक न वजे माझ्या ॥

जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस ।

अमृत जयास फिकें पुढें ॥

तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन ।

विठ्ठल निधान सांपडलें ॥

श्रीहरीचे मुख कितीही वेळा पाहिले, तरीही माझ्या डोळ्यांची भूक भागत नाही. माझ्या जिभेला विठ्ठल या तीन अक्षरांचा रस फार गोड वाटतो, त्या रसापुढे मला अमृतही फिके वाटते, माझ्या जिवाचे जीवन म्हणजे केवळ तो विठ्ठल आहे, अशी गोड भावना मनात ठेवत राज्याच्या कानाकोपऱ्यातून बुधवारी (ता. १७) होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल होत आहेत.

या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने मंगळवारी (ता. १६) भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघ्या पंढरीत भक्तीचा जणू मळा फुलल्याचे चित्र आहे.

Pandharpur
Ashadhi Wari 2024 : 'रामकृष्ण हरीचा जयघोषात' संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

दरम्यान, आषाढी वारीचा मुख्य सोहळा बुधवारी (ता. १७) साजरा होत असून, पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यासह शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा आणि वारकऱ्यांच्या राहुट्यांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजनाचे सूर आळवले जात आहेत.

विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड, भक्तिमार्ग, कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, रेल्वे स्थानक परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे. शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता आदी प्रमुख मार्गावर प्रासादिक, खेळणी साहित्य, तुळशीमाळा, मृदंग, तबला, वीणा आदी भजनी साहित्याची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, कपडे, घरगुती साहित्याच्या विक्रीसाठी व्यापारपेठाही सजल्या आहेत.

भक्तीचा प्रवाह होतोय एक

सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आळंदीहून निघालेल्या संतशिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज आणि देहूतून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांचे पालखी सोहळे मंगळवारी (ता. १६) पंढरीत दाखल झाले.

त्याशिवाय एसटी बस, रेल्वे आणि खासगी वाहनांद्वारे वारकरी दाखल होत आहेत. त्यामुळे पंढरपुरातील गर्दी सातत्याने वाढतेच आहे. ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने प्रदक्षिणा मार्गासह चंद्रभागा तीराकडे निघालेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांमुळे चोहोबाजूंनी भक्तीचा प्रवाह पंढरीत एक होत आहे.

Pandharpur
Ashadhi Wari 2024 : ‘आषाढी’साठी ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

पदस्पर्श दर्शन रांगेत सुमारे दीड लाख वारकरी

आषाढीच्या वारीमध्ये दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असते, त्यामुळे या स्नानासाठी मंगळवारी भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा तीरावर वारकऱ्यांनी एकच गर्दी केली. चंद्रभागेतील स्नान आणि प्रदक्षिणा मार्गावरील प्रदक्षिणा वारकरी आवर्जून पूर्ण करत होते. यंदा पहिल्यांदाच पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावरील १२ नंबरच्या पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर पुलापर्यंत गेली होती.

पदस्पर्श दर्शनाला १५ ते १८ तास लागत आहेत. प्रतिमिनिटाला ४० ते ५० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत. यंदा गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आजघडीला पंढरीत आठ लाखांहून अधिक वारकरी-भाविक दाखल झाले आहेत. तर पदस्पर्श दर्शन रांगेत सुमारे दीड ते दोन लाख वारकरी आहेत. उद्या या गर्दीत आणखी वाढ होणार आहे.

शेतकऱ्यांत चैतन्य

यंदा अगदी वेळेवर पाऊस पडल्याने शेतीची कामे आटोपून अनेक शेतकरी वारीत सहभागी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव असून, गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरसह परिसरातही कधी ढगाळ, कधी पावसाची हलकी सर असे वातावरण आहे.

त्यामुळे वारीच्या सोहळ्यात काहीसे चैतन्य दिसते आहे. दरवर्षीप्रमाणे पंढरपूर बाजार समितीच्या वतीने खास कृषी पंढरी हे कृषी प्रदर्शनही बाजार समिती आवारात भरविण्यात आले आहे. त्याचीही मेजवानी शेतकऱ्यांना वारीत मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com