Land Dispute Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : पडके घर

Team Agrowon

Shekhar Gaikwad Article : दुष्काळी भागातील वडगाव नावाच्या गावातील अनेक लोक पोटापाण्यासाठी अन्य गावी स्थलांतरित झाले होते. ३००-४०० उंबरा असलेल्या गावात आता वस्ती हळूहळू विरळ होत चालली होती. या गावात हंबीरराव व गणपतराव नावाचे दोन भाऊ गावठाणात असलेल्या छोट्या पडक्या वाड्यात अनेक वर्ष राहत होते.

एका पावसाळ्यात वाड्याच्या दोन्ही भिंती पडल्यामुळे दोन्ही भावांनी नवीन घर बांधायचा विचार केला. गावठाण्याच्या बाहेर असलेल्या मुख्य रस्त्याच्या कडेला त्याने नव्याने घर बांधले. दोघे भाऊ एकत्रितरीत्या राहत होते. त्यांच्यामध्ये कसलाही वाद नव्हता. काही वर्षांनी थोरल्या हंबीररावचा मुलगा कुणाल हा सरकारी नोकरीतून रिटायर झाल्यामुळे गावी घर बांधण्यासाठी विचार करू लागला. त्याने वडिलांना आपल्या जुन्या पडक्या वाड्याच्या जागेवर मी घर बांधू का? अशी विचारणा केली. त्यावर वडील हंबीरराव त्याला असे म्हणाले की आपली वडिलोपार्जित जागा आहे. तिच्यामधे तुझ्या चुलत्याचा पण हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय परस्पर तू एकट्याने घर बांधायचा विचार करू नको.

त्यानंतर कुणालने एकदा धाकटे चुलते गणपतराव यांच्याशी पडक्या वाड्याच्या ठिकाणी घर बांधण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी गणपतराव यांनी कुणालला असे सांगितले की, ‘‘तू सरकारी नोकरीत असताना आम्हाला कसलीही मदत केली नाहीस. बऱ्यावाईट प्रसंगी तू अनेक वेळा आम्हाला भेटायला सुद्धा आला नाहीस. आता गावठाणातल्या जागेला सुद्धा फार बाजारभाव आला आहे. त्यामुळे त्या जमिनीची किंमत आम्हाला देऊन तू खुशाल या जागेवर घर बांधू शकतोस.’’ कुणालला मात्र वाटले की जागा पडलेली असताना सुद्धा चुलते मला घर बांधू देत नाहीत. ग्रामीण भागात सुद्धा आता लोक व्यापारी वृत्तीचे झाले आहेत. कुणालचे वडील हंबीरराव व चुलते गणपतराव यांचे मात्र या मुद्यावर एकमत होते की मुले जर व्यापारी वृत्तीने विचार करीत असतील तर आपण सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

एवढेच नाही तर हंबीरराव व गणपतराव या दोन भावांचे या मुद्यावर एकमत झाले की ही जागा जर बाजारभावाप्रमाणे कुणाल घेणार नसेल तर आपण ती दुसऱ्यांना विकायचा पण विचार करू. प्रॉपर्टीबद्दल दृष्टिकोन कसे बदलत आहेत हे यावरुन स्पष्ट होते. गावातील जुनी जाणती माणसे मात्र कुणालच्या वडिलांचे बरोबर आहे असे म्हणत होते तर तरुण मात्र जुनी पिढी सुधारणार नाही असे म्हणत होते.

मयत सावकार

बागायत भागातील एका गावामध्ये राजेंद्र नावाचा प्रगतिशील शेतकरी शेती करीत होता. पदवीधर असल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची, याबाबत वारंवार कृषी विद्यापीठातील चर्चासत्रांना, कृषी प्रदर्शनांना तो हजेरी लावायचा आणि नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचा प्रयत्न देखील करायचा.

शेतीची बांधबंदिस्ती वेळेवर करण्याबरोबरच शेतीमध्ये आधुनिक प्रयोग राजेंद्र करीत असे. त्याने आपल्या शेतावर भाजीपाला पिकविण्यासाठी पॉलिहाऊस करण्याचा निर्णय घेतला. पॉलिहाऊससाठी त्याला बँकेच्या कर्जाची गरज होती. बँकेसाठी प्रस्ताव करण्यासाठी त्याने कागदपत्रे गोळा करण्यास सुरवात केली. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी त्याने लेखा सल्लागाराची मदत घेतली व एक महिन्याभरात कर्जासाठीची संपूर्ण फाइल तयार झाली. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याने रीतसर कर्ज प्रकरण त्याने बँकेमध्ये सादर केले.

बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेने हा प्रस्ताव बँकेच्या शेती अधिकाऱ्याकडे तांत्रिकदृष्ट्या योग्य असण्याची खात्री करण्यासाठी पाठविला तसेच बँकेच्या वकीलांकडे कायदेशीररीत्या कागदपत्रांमध्ये त्रुटी नाहीत ना याची खात्री करण्यासाठी पाठविला. सुमारे २५ दिवसांनंतर राजेंद्र बँकेमध्ये प्रकरण मंजूर झाले आहे का, हे विचारण्यास गेला असता अद्याप प्रकरणाची छाननी सुरु असल्याचे त्यास सांगण्यात आले.

आणखी ४-५ दिवस वाट पाहिल्यानंतर बँकेच्या वकीलांनी त्याच्या प्रकरणामध्ये एक त्रुटी काढल्याचे लक्षात आले. १९६० मध्ये राजेंद्रच्या आजोबांच्या नावाने जमीन होती. त्यांनी तीन रुपये सावकाराकडून कर्ज घेतल्याची नोंद सातबारावर इतर हक्कांत होती. राजेंद्रच्या आजोबा पण जिवंत नव्हते आणि तो सावकार सुद्धा जिवंत नव्हता. पण बँकेचे साहेब काही ऐकायला तयार नव्हते.

राजेंद्र सर्व प्रकारे बँक मॅनेजरशी बोलून विनवणी करत होता. ‘‘सर, तीन रुपये कर्जातून वळते करून घ्या. वाटले तर १०० रुपये कर्जाची रक्कम राखून ठेवा किंवा इच्छा झाली तर १०० रुपये कर्जच कमी द्या. परंतु मेलेल्या सावकाराची तीन रुपये आता परत मी करतो म्हटले तरी त्याचे कोणीही वारस जिवंत नसल्यामुळे रक्कमही परत करता येत नाही. शिवाय त्या गोष्टीला सुमारे ७० वर्षे झाली आहेत.’’ तेवढे सांगूनही बँकेच्या मॅनेजरने इतर हक्कातील सावकाराचे नाव कमी केल्याशिवाय आम्ही तुमचे कर्ज प्रकरण मंजूर करू शकत नाही, असे स्पष्टपणे बजावले.

यांत्रिकी पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे एका होतकरू व तरुण संशोधक शेतकरी हतबल झालेला पाहायला मिळाला!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT