Jalgaon News : खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा कहर झाला आहे. पिकात दोन फवारण्या घेऊनही ही अळी नियंत्रणात आलेली नाही. काही शेतकऱ्यांचे पीक एक ते सव्वा महिन्याचे झाले आहे. एक महिन्याच्या पिकात समस्या अधिक आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सतत वाढला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आल्याची स्थिती आहे. दोन ते अडीच महिन्याच्या पिकातही तीन फवारण्या घेऊन या अळीचा नायनाट झालेला नाही. काही शेतकऱ्यांनी महागडी अळीनाशके व संप्रेरके वापरून या अळीचा एक ते दीड महिन्याच्या पिकात अटकाव केला. परंतु कमाल शेतकरी या अळीचा अटकाव करू शकलेले नाहीत.
यामुळे मका पिकाच्या वाढीवर परिणाम दिसत आहे. खानदेशात यंदा सुमारे ३५ हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतही लागवड केली आहे. अधिक कालावधी, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची स्थिती, सुपीकता लक्षात घेऊन केली आहे. परंतु सर्वच वाणांच्या मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा कहर झाला. यंदा हा कहर अधिक होता.
लागवडीनंतर १५ ते १८ दिवसांत पिकात लष्करी अळी आली. ती पुढे दीड ते दोन महिने पिकात दिसून आली. यामुळे पिकाचे २० ते २५ टक्के नुकसान आजघडीला झाले आहे. अनेक शेतकरी ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या सुरुवातीला लागवड केलेल्या मका पिकात कणसे तयार होत आहेत.
त्याची वाढ सध्या बरी आहे. कारण त्यातील अळीचा प्रकोप दोन ते अडीच महिन्यांनंतर फवारण्यांमुळे कमी झाला. परंतु डिसेंबरच्या सुरुवातीला लागवड केलेल्या मका पिकात अळीची समस्या आहे. शेतकऱ्यांना मका पिकाच्या पोंग्यात कीडनाशकांचा वापर करून ही अळी थोपविण्याची कार्यवाही सतत करावी लागत आहे.
ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये लागवड केलेले मका पीक फेब्रुवारीअखेरीस मळणीवर येईल. त्यात दाणे पक्व होत आहेत. शेतकऱ्यांनी या पिकात तीन फवारण्या व दोनदा रासायनिक खतांची मात्रा दिली आहे.
काळ्या कसदार जमिनीत चांगले व्यवस्थापन केलेल्या शेतकऱ्यांचे मका पीक जोमात आहे. काही शेतकऱ्यांनी ठिबकचा उपयोग करून लागवड केली आहे. त्यामुळे पिकाची वाढ बऱ्यापैकी दिसत आहे. तापी, गिरणा, अनेर व इतर नद्यांच्या क्षेत्रात लागवड अधिक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.