Nashik News : सन २०१९ साली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचा ९० टक्के क्षेत्रावर प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यानंतर तीन वर्षे हा प्रादुर्भाव कमी होता. मात्र चालूवर्षी पावसाचा खंड पडल्याने पिके ताणावर आली आहेत. अशातच मका उत्पादक पट्ट्यात जिल्ह्यात सर्वदूर अमेरिकन लष्करी अळीच्या समस्येने डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.
बियाणे दरवाढ तर पीक संरक्षण खर्च वाढल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाऊस नसल्याने पिके माना टाकत आहेत. मात्र अशाच परिस्थितीत हा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात देवळा, सटाणा, कळवण, मालेगाव, दिंडोरी, येवला, चांदवड, नांदगाव, निफाड या १० तालुक्यांमध्ये हा प्रादुर्भाव वाढला आहे.
‘‘मका पिकाचा वाढता पीक संरक्षण खर्च परवडणार नाही. पावसाअभावी मक्याची वाढ खुंटली आहे’’, असे मोरेनगर (ता. सटाणा) तेथील प्रयोगशील शेतकरी मधुकर मोरे यांनी सांगितले.
प्रादुर्भाव दिसू लागताच शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. कामगंध सापळे वापरून किडीचे सर्वेक्षण करावे. सध्या आर्द्रता जास्त असल्याने बिव्हेरिया बॅसियाना यासारख्या मित्रकीटकनाशकाचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
कीटकनाशकाचे द्रावण पोंग्यात जाईल असे ‘कव्हरेज’ असावे, असा सल्ला के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक तुषार उगले यांनी दिला. कीटकनाशक फवारणी केलेल्या मका चारा शेताकडे जनावरे जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
नुकसानीची लक्षणे अशी:
- कोवळ्या पानांचा भाग खाऊन पांढरे चट्टे पडणे
- पोंग्यात अळीची विष्टा दिसून येणे
- प्रादुर्भावामुळे रोपे बाधित होणे
तालुकानिहाय मका लागवड (हेक्टर):
तालुका...सरासरी क्षेत्र...प्रत्यक्ष पेरणी...टक्केवारी
मालेगांव...३८,८५०...४२,०११...१०८.१४
बागलाण...३४,७३३...४६,२८८...१३३.२७
कळवण...१७,४०४...१६,१८०...९२.९७
देवळा...१५,९४३...१९,३४०...१२१.३१
नांदगाव...२९,५८९...३१,०७१...१०५.०१
सुरगाणा...५.०६...०...०
नाशिक...१,३७०.५४...७९३...५७.८६
त्र्यंबकेश्वर...११...६.३...५७.२७
दिंडोरी...२८०...१९१...६८.२१
इगतपुरी...२८२.२...११...४.८२
पेठ...०...०...०
निफाड...१२,५८२.५६...७,२५३...५७.६४
सिन्नर...११,२६६.९६...६,५६५.५...५८.२७
येवला...३५,११९...४१,३६८...११७.७९
चांदवड...१९,७२५.७५...१६,४५१.६...८३.४
एकूण...२,१७,१०८.०७...२,२७,५२९.४...१०४.८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.