Maize Armyworm Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Armyworm : मका पिकात लष्करी अळीचे संकट कायम

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : मका पिकात खानदेशात अमेरिकन लष्करी अळीची समस्या कायम आहे. दीड महिन्याच्या पिकात दोन वेळेस फवारण्या घेऊनही अळीचे संकट असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

कृषी विभागाने यासंबंधी कुठलेही उपाय योजलेले नाहीत. कुठलीही जनजागृती, निविष्ठांबाबत मार्गदर्शन उपक्रम घेतलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांचे त्रोटक मार्गदर्शन व त्यांच्याकडून खरेदी केलेल्या निविष्ठा, संप्रेरकांवर अवलंबून राहावे लागले असून, यात मोठा खर्च झाला आहे.

मक्याचे दर खरिपातील काढणीनंर टिकून होते. परंतु खानदेशात कमी पाऊसमान झाल्याने अनेकांनी लागवड टाळली. खानदेशात मक्याची लागवड यंदा सुमारे ३२ हजार हेक्टरवर झाली आहे. लागवड वर्षागणिक घटली असून, २०१८ पर्यंत ही लागवड ४० ते ४१ हजार हेक्टरपर्यंत करण्यात येत होती. परंतु अमेरिकन लष्करी अळी पिकात दरवर्षी येत असून, ती आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने फवारण्या घ्याव्या लागत आहेत.

यासंबंधी कृषी विभाग फक्त शेतकऱ्यांकडे भेट देऊन आपले काम पूर्ण करीत आहे. भेट दिल्यानंतर पुढे काय, असे कृषी यंत्रणांना विचारल्यास कुठलेही समाधानकारक उत्तर येत नाही. यामुळे शेतकरी या समस्येला रोखण्यासंबंधी अधिकचा खर्च करीत असून, त्यांच्यापर्यंत योग्य, प्रभावी उपाययोजना कृषी विभागाने पोहोचविलेल्या नसल्याची स्थिती खानदेशात आहे.

खानदेशात नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत प्रत्येकी एक व जळगाव जिल्ह्यात दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत. तसेच कृषी विभागाची मोठी यंत्रणा आहे. खासगी कंपन्यांची मदत घेऊन कृषी विभाग या बाबत जनजागृती व समस्या कमी करण्याची मोहीम राबवू शकतो, परंतु कृषी विभाग बघ्याची भूमिका घेत आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव, एरंडोल, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री, नंदुरबारातील शहादा, नवापूर, तळोदा आदी सर्वच भागांत मका पिकात अमेरिकन लष्करी अळीची समस्या आहे. मका पिकाची लागवड खानदेशात ऑक्टोबरपासून सुरू झाली. मागील महिन्याच्या अखेरीस देखील लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड नोव्हेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात झाली आहे.

शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ

मका बियाणे दरही मागील वर्षी काही कंपन्यांनी वाढविले. अधिक मागणीच्या वाणांचे दर १५५० ते १६५० (चार किलो बियाण्याची बॅग) एवढे होते. तर किमान दर ९५०, १००० ते १२५० रुपये बॅग, असे होते.

फवारणीवर एक एकरसाठी दीड ते दोन हजार रुपये खर्च एक वेळेस आला आहे. दीड महिन्याच्या पिकात दोन फवारण्या झाल्या आहेत. आणखी एक फवारणी घ्यावीच लागेल. त्यात अळीनाशके, कीडनाशके व संप्रेरके, अन्नघटक शेतकरी देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT