Animal Foot And Mouth Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Disease Management : लाळ्या-खुरकूत आजारावर उपचार

Animal Foot And Mouth Disease : लाळ्या खुरकूत हा आजार खूर असलेल्या जनावरांत दिसतो. हा आजार अतिसंसर्गजन्य असून, साथ आल्यास एकाच वेळेस अनेक जनावरांना प्रादुर्भाव होतो.

Team Agrowon

डॉ. मीरा साखरे, डॉ.ऊर्मिला वाकडे

Animal Care : लाळ्या खुरकूत हा आजार खूर असलेल्या जनावरांत दिसतो. हा आजार अतिसंसर्गजन्य असून, साथ आल्यास एकाच वेळेस अनेक जनावरांना प्रादुर्भाव होतो. आजाराचे विषाणू बाधित जनावराच्या लाळेत,नाकातील स्त्राव, खुरातील व्रण, दुधात आणि विर्यात आढळतात.

यातून गोठ्यातील चारा, पशुखाद्य ,पाणी दूषित होते.हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळा सुरू होण्याअगोदर आजाराचा संसर्ग जास्त दिसून येतो.

- सुरवातीला तोंडात फोड येतात, चारा खातेवेळी फोड फुटतात आणि त्यांचे व्रणात रूपांतर होते.
- मोठ्या जनावरांत मरतुकीचे प्रमाण फारच कमी असते, पण सहा महिन्याखालील लहान वासरात हे विषाणू हृदयाच्या पेशीवर प्रादुर्भाव करतात. वासरामध्ये लक्षणे न दाखवता अचानक मृत्यू होतो.
- शेळ्या-मेंढीत आजाराची तीव्रता कमी असते.

लक्षणे:
- भरपूर ताप येतो. तोंडातून लाळ गळते, लाळ ही चिकट लांब असून दोऱ्यासारखी दिसते.
- नाकातून पाण्यासारखा स्त्राव येतो. तोंडात जिभेवर, हिरड्यावर आणि दोन्ही खुराच्या मध्ये फोड येतात. जनावरे तोंडाची वारंवार उघडझाप करतात.
- कासेवर कधी-कधी फोड येऊ शकतात.
- जनावरे चारा काळजीपूर्वक खाण्याचा प्रयत्न करतात. चारा खाणे कमी किंवा पूर्ण बंद होते.रवंथ कमी करतात.


- पशुधन चालताना लंगडते, तीव्र स्वरूपाच्या आजारात खूर गळून पडू शकते. दुय्यम संक्रमणामुळे खुरात जिवाणूंची वाढ होते आणि पायातील जखम लवकर बरी होत नाही.
- गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात गाई, म्हशीमध्ये गर्भपात होऊ शकतो. पूर्णपणे वाढ न झालेले वासरू जन्माला येते.
- लहान वासरात बहुतेक वेळा तोंडातील आणि खुरातील फोड दिसून येत नाहीत, पण अचानक मृत्यू होतो.

आजाराचे परिणाम ः
बाधित जनावर आठ ते दहा दिवसात उपचार केल्यास आजारातून बरे होते. पण हा विषाणू शरीरातील काही ग्रंथी आणि महत्त्वाच्या अवयवांना इजा पोहोचवतो. आजाराचे दुष्परिणाम पुढील प्रमाणे झालेले दिसतात.
- हृदयाचे आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. बाधित जनावराने उन्हात जास्त वेळ काम केल्यावर धापा टाकते किंवा काम केल्यानंतर लवकर थकून जातात.


- दुधामध्ये लक्षणीय घट होते.
- गाई, म्हशीत तात्पुरते वंध्यत्व येऊ शकते.
- बाधित जनावरांना ॲनिमिया होतो.
- दुधाळ गाईत कासदाह होण्याचे प्रमाण जास्त असते.
- इतर आजारांना जनावरे लवकर बळी पडतात.

उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय ः
- तोंड आणि पायातील जखमा बऱ्या होण्याकरिता खाण्याच्या सोडा (चार टक्के) किंवा तुरटीच्या एक-दोन टक्के पाणी किंवा पोटॅशिअम परमॅग्नेटच्या एक टक्का द्रावणाने दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवाव्यात.
- जखमांना जंतुनाशक मलम लावावे किंवा हळद, तेलाचे मिश्रण तोंडातील जखमेस लावावे.
- खुराच्या जखमा पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने दोनदा धुवाव्यात.


- दुय्यम संक्रमण टाळण्यासाठी प्रतिजैविके आणि वेदनाशामक औषधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.
- तोंडातील जखमा बऱ्या होईपर्यंत जनावरास पातळ पेज पाजावी.
- दूषित खाद्याची योग्य विल्हेवाट लावावी.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाळ्या खुरकूत लस ही तीन ते चार महिने वय आणि त्यावरील वासरांना द्यावी. वर्षातून दोनदा लसीकरण करावे.

- काही जनावरांमध्ये लसीकरणानंतर ताप येणे किंवा लस टोचलेल्या ठिकाणी गाठ येऊ शकते, पण काही दिवसांनंतर गाठ नाहीशी होते.
- बहुतांश पशुपालक जनावरास गाठ येते म्हणून लसीकरण करणे टाळतात. पण जनावरास लाळ्या खुरकूत आजार झाल्यास त्याचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.

संपर्क ः डॉ.मीरा साखरे,९४२३७५९४९०
(सहाय्यक प्राध्यापिका,पशुऔषधवैद्यक शास्त्र विभाग,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT