Goat Disease
Goat DiseaseAgrowon

Goat Disease : करडातील ‘फ्लॉपी कीड सिंड्रोम’ आजारावर उपचार

Goat Rearing : ‘फ्लॉपी कीड सिंड्रोम’ आजारामुळे करडू सुस्त, निस्तेज आणि अशक्त होते. पायाचे स्नायू कमकुवत होतात, स्नायू थरथर कापतात.
Published on

डॉ. मीरा साखरे, डॉ. समीक्षा लोखंडे
Goat Floppy Kid Syndrome : ‘फ्लॉपी कीड सिंड्रोम’ आजारामुळे करडू सुस्त, निस्तेज आणि अशक्त होते. पायाचे स्नायू कमकुवत होतात, स्नायू थरथर कापतात. नाडीचे ठोके वाढतात, श्‍वास खोल आणि जलद गतीने होतो. आजाराची लक्षणे तातडीने ओळखून उपाययोजना कराव्यात.

करडांचे सुयोग्य व्यवस्थापन हा शेळीपालनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. जन्मल्यापासून वयाच्या पहिल्या तीन महिन्यांपर्यंत करडांची मरतुक जास्त प्रमाणात होते. त्यामध्ये प्रामुख्याने पांढरी हगवण, सालमोनेलोसिस, फ्लॉपी कीड सिंड्रोम, रोटा व्हायरस इन्फेक्शन, शरीराचे तापमान कमी होणे (हायपोथर्मिया), चपट्या कृमींची बाधा इत्यादी आजारामुळे करडात मरतुक झालेली दिसून येते.
‘फ्लॉपी कीड सिंड्रोम’ हा करडातील वयाच्या ३ ते १४ दिवसांत होणारा चयापचयाचा आजार आहे. जन्मतः करडू पहिले तीन दिवस सुदृढ असते. या काळात शरीराच्या सर्व हालचाली व्यवस्थित असतात.

आजाराची कारणे ः
१) करडाने जास्त दूध पिल्यामुळे पोटामध्ये ई-कोलाय, क्लॉस्टिडियम जिवाणूंची वाढ झपाट्याने होण्यास सुरुवात होते किंवा जिवाणूचे विषारी द्रव्य आतड्यात शोषले जाते.
२) शेळी मरण पावल्यास तिच्या करडास गाय किंवा दुसऱ्या शेळीचे दूध किंवा मिल्क रिप्लेसर जास्त प्रमाणात देण्यात आल्यास विकार होऊ शकतो.
३) बाधित करडाच्या पोटात लॅक्टिक ॲसिड नावाचे द्रव तयार होते. हे द्रव रक्तावाटे शरीरात शोषले जाते. यामुळे रक्ताचा सामू कमी होतो. परिणामी, आतड्याची हालचाल कमी किंवा बंद होते. करडाचे पोट साफ होत नाही.
४) चयापचय प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे करडू बेशुद्ध होऊन २४ ते ३६ तासांत दगावते.

Goat Disease
Lumpy Skin Disease : ‘लम्पी’ आजारावर वेळेवर उपचार आवश्यक

लक्षणे ः
१) सुरुवातीला करडू खूप कमी चालते, दुसऱ्या पिलांसोबत खेळत नाही. त्याला पळता येत नाही.
२) मागील पायांत अशक्तपणा आल्यामुळे अडखळत चालते.
३) करडू सुस्त, निस्तेज आणि अशक्त होते. पायाचे स्नायू कमकुवत होतात, स्नायू थरथर कापतात.
४) करडू शेळीला दूध पिण्यासाठी प्रयत्न करते, परंतु अशक्तपणामुळे दूध पिऊ शकत नाही.
५) पोटाचा आकार वाढल्यासारखा दिसतो. आजारात हगवण अजिबात लागत नाही. संडास घट्ट होते.
६) कान, पाय थंड पडतात. शरीराचे तापमान साधारण असते किंवा थोडे कमी होते.
७) नाडीचे ठोके वाढतात, श्‍वास खोल आणि जलद गतीने होतो.
८) करडात तोंडातून लाळ किंवा पाणी गळताना दिसते. उपचाराअभावी करडे २४ ते ३६ तासांत दगावतात.
निदान ः
१) करडाचे वय ३ ते १४ दिवस असताना लक्षणांवरून निदान सहज करता येते.
२) बाधित करडू दगावल्यास, शवविच्छेदनात त्याच्या पोटात न पचलेले, दह्यासारखे घट्ट दूध दिसून येते, त्यास आंबूस वास येतो.

Goat Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ आजारावर आयुर्वेदिक उपचार...

उपचार पद्धती ः
१) पोटातील सामू व्यवस्थित करण्यासाठी, अर्धा चमचा खाण्याचा सोडा एक ग्लास थंड पाण्यात टाकून ते पाणी हळुवारपणे दहा ते वीस मिलि याप्रमाणे दिवसातून तीन ते चार वेळा पाजावे. हे पाणी पाजताना श्‍वसन नलिकेत जाणार नाही याची काळजी घ्यावी.
२) पशुवैद्यकाकडून योग्य निदान करून उपचार करावे. आतड्यातील जिवाणूंची वाढ थांबविण्यासाठी डॉक्टरांकडून प्रतिजैविके आणि सलाइन द्यावीत.
३) उपचार केल्यावर चार ते सहा तासात करडू बरे होते. पण लक्षणे
तीव्र स्वरूपाची झाल्यास तीन दिवस उपचार करावा लागतो.

प्रतिबंधात्मक उपाय योजना :
१) करडाच्या वयाच्या दोन आठवड्यांपर्यंत त्यास जास्तीचे दूध एकाच वेळेस पाजू नये.
२) शेळी, गाईचे दूध किंवा मिल्क रिप्लेसर द्यायचे असल्यास थोडे थंड करूनच द्यावे, जेणेकरून करडू जास्तीचे दूध पिणार नाही.
३) करडाच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी. करडू दूध पिण्यासाठी सोडल्यावर त्यावर लक्ष ठेवावे.
जास्त दूध पिलेल्या करडाचे लक्षपूर्वक निरीक्षण करावे.
---------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. मीरा साखरे, ९४२३७५९४९०
(सहायक प्राध्यापिका, पशू औषध वैद्यकशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com