Sustainable Agriculture
Sustainable Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture : शाश्वत शेतीसाठी हवा ‘एकात्मिक’ दृष्टिकोन

टीम ॲग्रोवन

आजकाल देशभरात आरोग्याच्या समस्या (Health Issue) मोठ्या प्रमाणात भेडसावू लागल्याने सेंद्रिय शेतीतून (Organic Farming) पिकवलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला (Vegetable) यांचे महत्त्व वाढले आहे. परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला प्रमाणित सेंद्रिय अन्न (Organic Food) मुबलक कसे उपलब्ध होईल, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. शिवाय शेतकऱ्यांनी यशस्वीपणे सेंद्रिय उत्पादन (Organic Production) कसे घ्यावे व त्याचे आर्थिक गणित कसे बसवावे, यासंदर्भात शेतकऱ्यांमध्येही संभ्रम आहे. पूर्णपणे सेंद्रिय शेती (Organic Framing) करून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी रासायनिक निविष्ठांपासून दूर जायला तयार नाहीत हे वास्तव आहे.

शासकीय कामाच्या उदासीनतेमुळे सेंद्रिय कृषी धोरण शेवटपर्यंत पोहोचत नाही व अंतिम उद्देश साध्य होत नाही. अशा प्रकारे रासायनिक शेती सुरूच राहिली तर त्याचे मानवी आरोग्यावर, शेत जमिनीवर आणि पर्यावरणावर होणारे तीव्र दुष्परिणाम भोगण्यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल. त्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने परिणामकारक शेती करण्यासाठी आधी मातीचे आरोग्य व मातीची नैसर्गिक उत्पादन क्षमता वाढवणे महत्त्वाचे आहे.

पर्यावरणपूरक शेती व विषरहित अन्न ही गरज लक्षात घेऊन मातीचे आरोग्य व मानवाचे आरोग्य यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करून ते सुधारण्याच्या दृष्टीने तत्काळ शेतीची संकल्पना बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये पूर्ण जागृती गरजेची देखील आहे. १९६० च्या दशकात वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी केल्या गेलेल्या हरितक्रांतीच्या प्रयोगातून अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित बियाण्यांची निर्मिती केली गेली. या संकरित बियाण्यांना आपल्या योग्य वाढीसाठी अधिक पोषण अन्नद्रव्यांची गरज होती.

या गरजेतूनच रासायनिक खतांचे आगमन झाले. बियाणे संकरित असल्यामुळे त्यांच्यापासून तयार होणाऱ्या रोपांची रोगप्रतिकारक्षमता त्या प्रमाणात कमी होती. त्यामुळे त्यावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळे पिकाला कीड व रोगाचा प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी शेतीमध्ये पिकांवर रासायनिक बुरशीनाशके व कीटकनाशकांचा वापर करण्यास सुरुवात झाली. देशातील हरितक्रांतीच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर कृषी उत्पादनांचा आलेख अनेक वर्षे चढत्या क्रमाने जात राहिला व संकरित बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर सुरू झाला.

परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये महागडी रासायनिक खते, कीटकनाशके वापरूनदेखील हेक्टरी उत्पादनामध्ये अपेक्षित वाढ होताना दिसत नाही, किंवा घटच होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके इत्यादींच्या अतिवापरामुळे जमीन, पाणी, वायू या पर्यावरणीय प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे पिकांच्या उत्पादनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जमिनीतील महत्त्वाचे दोन घटक सेंद्रिय कर्ब व सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी झाल्याने रासायनिक खतांची परिणामकारकता कमी होऊ लागली.

जमिनीतील आवश्यक पोषक घटकांचे पिकांना उपलब्धतेचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य व उत्पादकता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या नियमित वापरामुळे कीटक व बुरशी इत्यादींची प्रतिकारक्षमता वाढत गेली आहे. आता शेतकऱ्याला उत्पादनवाढीसाठी अधिक प्रमाणात रासायनिक खते व अधिक घातक कीडनाशके वापरावी लागत आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून, मानवालाही विविध गंभीर रोगांना सामोरे जावे लागत आहे.

मानवाचे व मातीचे आरोग्यहनन ही सध्या एक जागतिक समस्या बनली असून, विविध प्रगत देशांमध्ये त्यावर पर्याय शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. यावर रासायनिक कृषी निविष्ठांचा वापर बंद करून पर्यावरण पूरक सेंद्रिय, जैविक खते व कीडनाशकांचा वापर करण्याची शिफारस केली जात आहे. परंतु सध्याच्या काळात सर्व रासायनिक कृषी निविष्ठा अचानकपणे बंद केल्यास कृषी उत्पादनात घट येऊ शकते, तर त्या वापरतच राहिल्यास जमिनीचा कस कमी होऊन उत्पादनात कालांतराने घटच होणार आहे.

सध्या तशी लक्षणे देखील दिसू लागलेली आहेत. पर्यावरण व मानवाच्या आरोग्यावर त्याचा घातक परिणामही होत आहे. म्हणजे रासायनिक कृषी निविष्ठा वापरूनही तोटा आणि न वापरल्यामुळे ही तोटाच होणार आहे. अशा दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. पूर्णपणे सेंद्रिय, जैविक शेतीचा अवलंब करून त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, तितकेच राहील की घटेल याचे उत्तर हे भौगोलिकदृष्ट्या शेतीचे पडलेले विभाग, मातीचा प्रकार, मातीची उत्पादकता, पीकपद्धती, पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांची कार्यपद्धती यानुसार वेगवेगळे असू शकेल.

तसेच रासायनिक शेती, सेंद्रिय शेती की झिरो बजेट फार्मिंग या बाबत कृषिविषयक तज्ज्ञांची अनेक मत-मतांतरे आहेत. परंतु ज्या वेगाने रासायनिक कृषी निविष्ठा या शेतात घातल्या जात आहेत ते पाहून जमिनीचे आरोग्य अधिकच बिघडत जाऊन शेत जमिनीची उत्पादकता खालावली जाणार यात शंका नाही. तसेच रासायनिक शेतीतून पिकवलेले अन्न सातत्याने सेवन करीत राहिल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मानसिक नैराश्य, मेंदूशी संबंधित आजार यासारख्या दुर्धर व्याधींनी मनुष्य ग्रासलेला पाहायला मिळतो.

यावर तातडीचा उपाय म्हणून रासायनिक खते व विषारी कीटकनाशकांचा वापर शक्य तितक्या लवकर नियंत्रित करावा लागेल. परंतु त्यातून मग शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होण्याचा धोका निर्माण होत असेल, तर त्यासाठी मग सेंद्रिय, जैविक, हिरवळीची खते यांचा इतर खतांसोबत समतोल एकात्मिक पद्धतीने वापर करून मातीचे आरोग्य प्रथमतः सुधारले पाहिजे. तसेच रोग-कीड प्रतिबंधासाठी जैविक, भौतिक व रासायनिक पद्धतीने एकात्मिक उपाय योजून एकात्मिक कीड-रोग, तणनियंत्रण व खत व्यवस्थापनाचा मार्ग अवलंबिला पाहिजे. त्यातून आपल्याला घसरत चाललेल्या जमिनीच्या उत्पादकतेवर लगाम घालता येईल.

मुळातच जमिनीची सुपीकता व पोषण शक्ती सेंद्रिय, जैविक व नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून वाढविल्यानंतर पिकाला होणारा अन्नपुरवठा जेव्हा समतोल प्रमाणात होईल तेव्हा पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. विषारी रासायनिक कीटक व बुरशीनाशकांच्या वापराचे प्रमाण कमी होऊन जैविक कीडनाशकांचा वापर करून कीड व रोग यांवर व्यवस्थित नियंत्रण मिळवता येईल.

येत्या काळात संपूर्ण सेंद्रिय-नैसर्गिक शेतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता येईल. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या व प्रमाणित कृषिमालाला देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत अधिक मागणी असून, त्याला बाजार भाव देखील त्या पटीत अधिक मिळत आहे. थोडक्यात यापुढे मानवी आरोग्य जपण्यासाठी मातीचे आरोग्य सक्तीने काळजीपूर्वक जपले गेले पाहिजे हा निष्कर्ष यातून काढता येईल. यापुढे शेती करताना अभ्यासपूर्वक एकात्मिक अन्नद्रव्ये व कीड-रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब वाढवावा लागेल. त्यातून जमिनीची उत्पादन क्षमता लक्षणीयरीत्या वाढविता येईल. मानवाचे आरोग्यसुद्धा सुदृढ ठेवण्यास मदत होईल. यातूनच शेतीची शाश्‍वत प्रगती शक्य आहे.

(लेखक सेंद्रिय शेतीचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT