
मालेगाव, जि. नाशिक : बंदिस्त पाणीपुरवठा (Closed water supply) योजनेमुळे पाण्याच्या गळतीत बचत होईल. तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन लाभ क्षेत्रातील गावांच्या शेतीस शाश्वत सिंचन सुविधा (Sustainable Irrigation Facilities) उपलब्ध होईल. तसेच एकही शेतकऱ्याला पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेततळ्यांना देखील या बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याची सुविधा मिळणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले.
मालेगाव तालुक्यातील दहिकुटे व बोरी आंबेदरी मुख्य कालव्याचे बंदिस्त नलिकेद्वारे वितरण प्रणाली कामाचे भूमिपूजन रविवार (ता.२३) रोजी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, मालेगाव उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार, उपविभागीय महेंद्र नेटावटे, कनिष्ठ अभियंता सुनील गांगुर्डे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, की कर्नाटक राज्यामध्ये रामथळ नावाचा प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर एकाच यंत्रणेच्या देखरेखीखाली पूर्ण क्षेत्रात ठिबक सिंचन करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्राच्या इस्लामपूर तालुक्यामध्ये बोधखिंडी या ठिबक सिंचन प्रकल्पांतर्गत ६०० एकर क्षेत्र ठिबक सिंचन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने या भागातील दहा शेतकऱ्यांची निवड करून हे प्रकल्पाची पाहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कर्नाटक राज्याचा रामथळ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर १ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचन करण्यास सुरवात केली आहे. याच अनुषंगाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग प्रत्येक शेतकऱ्याच्या हितासाठी होण्याकरिता या प्रकल्पांच्या माध्यमातून काम करण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले.
तालुक्यातील टिंगरी गावाजवळ १९९२ साली बोरी नदीवर बोरी-आंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्प, तर दहिकुटे गावाजवळ १९७५ मध्ये कान्हेरी नदीवर दहिकुटे लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम करण्यात आले. बोरी-आंबेदरी धरणाचे लाभ क्षेत्रात ९१० हेक्टर तर दहिकुटे धरणाच्या लाभक्षेत्रात ६४८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र खुल्या कालव्याद्वारे पाणी वाहत असताना ५० टक्के पाण्याची गळती होते. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत बोरी आंबेदरी व दहिकुटे प्रकल्पाचे सरासरी ५० टक्के क्षेत्रास सिंचनाचा लाभ होऊ शकला. परंतु या बंदिस्त पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून १०० टक्के क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी या पाणीपुरवठा योजनेस प्रतिसाद देवून सहकार्य करावे,असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले.
या गावांना होणार लाभ...
दहीकुटे प्रकल्पांतर्गत देवारपाडे, जळकू, झोडगे, चिखलओहोळ, दसाणे, दहिकुटे, माणके, सायने खु. गावांना, तर बोरी आंबेदरी प्रकल्पाअंतर्गत झोडगे, अस्ताणे, जळकू, वनपट, लखाणे, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी गावांना योजनेचा लाभ होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.