Nashik News : नोव्हेंबर २०२३ मध्ये नांदगाव तालुक्यातील मांडवड परिसरात झालेल्या गारपीट अनुदान अपहारप्रकरणी संशयिताने अपहाराची रक्कम चौकशी दरम्यान पोलिसांच्या स्वाधीन केली असून, याप्रकरणी चौकशी अंतिम टप्प्यात आहे. यात सहभागी अन्य संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिली. दरम्यान अपहारप्रकरणी बाराहून अधिक दिवस उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांनी उपोषण मागे घेत या नंतरचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिकला करण्याचा इशारा दिला.
मांडवड येथील ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण व अन्य अकरा जणांविरोधात शेतकरी खातेदार यांना नुकसान भरपाईपोटी दिली जाणारी रक्कम स्वतःच्याच बँक खात्यात वर्ग करून ३ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा शासकीय अपहार केल्याप्रकरणी बाणगावच्या मंडळ अधिकारी गोडे यांच्या फिर्यादीनंतर एक जूनला पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आर्थिक गुन्हाप्रकरणी पोलिसांनी संशयित ग्रामसेवक चव्हाण याला नोटीस बजावल्याने पोलिसात हजर होत त्याने अपहाराची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली.
सध्या या प्रकरणी तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी पाच जणांची चौकशी समिती नेमली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र चौकशी अहवालात नेमके काय दडले आहे, याचा खुलासा होत नसल्याने उपोषण बारा दिवसांहून अधिक काळ चालले होते. दरम्यान पोलीस, महसूल व जिल्हा परिषद या तीन पातळ्यांवर प्रकरण पोहोचल्यानंतर गेल्या आठवड्यात ग्रामसेवक चव्हाण यांचे निलंबन होऊन कळवण येथील तालुका पंचायत समितीत दैनंदिन हजेरी लावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
मांडवडच्या गारपीट अनुदान अपहारप्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनी संशयिताकडून अपहार केलेल्या रकमेपैकी बरीचशी रक्कम हस्तगत केल्याची माहिती आहे. पोलीस हस्तगत केलेली रक्कम आमच्याकडे हस्तांतर करतील, पुढील प्रक्रिया न्यायालयीन आहे.सुनील सैंदाणे, तहसीलदार, नांदगाव
या प्रकरणात जेवढा गैरव्यवहार झाला आहे, तेवढी रक्कम जमा करत आहे. यात अजून काही लोक असण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. तहसील कार्यालयाकडून एकूण रिपोर्ट आल्यावर काही बाबी स्पष्ट होऊन पूर्ण प्रक्रिया होईल, अशा प्रकरणात सरकारचे पैसे परत मिळवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.प्रीतम चौधरी, पोलीस निरीक्षक-नांदगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.