Planning of Ambia Blossom :
शेतकरी नियोजन
पीक : डाळिंब
शेतकरी : सुशीलकुमार बाबुराव शिंदे
गाव : वडाळा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र : १६ एकर
डाळिंब क्षेत्र : २ एकर
वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे सुशीलकुमार बाबूराव शिंदे यांची १६ एकर शेती आहे. त्यात दोन एकरांवर भगवा वाणाची डाळिंब लागवड आहे. तर उर्वरित क्षेत्रावर द्राक्ष, सीताफळ या फळपिकांसह कांदा, सोयाबीन, ज्वारी लागवड आहे.
गेल्या चार वर्षांपासून सुशीलकुमार डाळिंब शेती करत आहेत. डाळिंबामध्ये दरवर्षी आंबिया बहरात उत्पादन घेतले जाते. या वर्षी ही आंबिया बहरामध्ये उत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार बागेच्या व्यवस्थापनावर भर दिला जात आहे. दरवर्षी डाळिंबाचे एकरी सरासरी १० टन उत्पादन मिळते.
आंबिया बहराचे नियोजन
मागील आंबिया बहरातील फळांची तोडणी ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण झाली. त्यानंतर पुढील कामकाजास सुरुवात करण्यात आली.
बागेमधील सर्व गवत काढून घेऊन बाग स्वच्छ करून घेतली.
दोन ओळींमधील जमिनीची नांगरून कुळवणी आणि रोटर मारून मशागत करून घेतली.
त्यानंतर प्रति झाड २५ किलो प्रमाणे शेणखत आणि रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात झिंक सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट प्रत्येकी २० किलो, दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट ३०० किलो आणि कॅल्शिअम नायट्रेटची प्रति एकर प्रमाणे मात्रा दिली.
खोडावरील वॉटर शूट काढून घेऊन खोडाला कावा पेस्ट लावून घेतली. नंतर हलकी छाटणी करून घेतली.
बागेतील रोगग्रस्त फांद्या, फळे काढून त्यांची बागेबाहेर नेऊन योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून घेतली. त्यानंतर पुन्हा बागेची स्वच्छता केली.
व्यवस्थापनातील ठळक बाबी :
बागेच्या बहरासाठी आवश्यक प्राथमिक कामकाज पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाहीस सुरुवात केली. झाडांना अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी ह्युमिक ॲसिड, मॅग्नेशिअम सल्फेट, पोटॅशिअम नायट्रेट व फॉस्फेरीक ॲसिड यांची एकत्रित मात्रा दिली.
त्यानंतर बागेमध्ये दर आठ दिवसांनी ताक, गूळ आणि तांदळाचे पेज यांचा डोस ठिबकद्वारे सोडण्यात आला.
०ः५२:३४ आणि पोटॅशिअम सल्फेट या विद्राव्य खतांची ५ किलो प्रति आठवडा प्रति एकर प्रमाणे मात्रा ठिबकद्वारे देण्यात आली. पोटॅशिअम शोनाइट ७ किलो एकरी प्रमाणे एक वेळा दिले आहे.
काडीमध्ये गर्भधारणा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ६ बीए आणि ०ः५२:३४ यांच्या दोन फवारण्या घेतल्या आहेत. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची आणि सिलिकॉनची एक फवारणी घेतली आहे.
बागेमध्ये जैविक खते आणि जैविक कीटकनाशकांचा वापरावर भर देत आहे.
सध्या बागेमध्ये काडी व्यवस्थित तयार होत आहे. त्यामध्ये अन्नद्रव्यांचा साठाही चांगल्याप्रमाणे होत आहे. अन्नद्रव्यांचा साठा चांगला झाला तर कळी निघण्यामध्ये अडचण येत नाही. तसेच जैविक खते आणि कीटकनाशक यांचा वापर केल्याने रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होत असल्याचा अनुभव सुशीलकुमार सांगतात.
- सुशीलकुमार शिंदे, ९८८१९८४८५८
(शब्दांकन : सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.