Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज (ता.२९) कथीत ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी, घोटाळ्यासंदर्भात खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली. त्यांनी केसाने माझा गळा कापला, असा आरोप अजित पवार यांनी तासगाव-कवठे महांकाळ येथे केला. यावरून आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी उत्तर दिले आहे.
फक्त बदनाम करण्यासाठी सिंचन घोटाळ्याचा आरोप
तासगाव-कवठे महांकाळ येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी देखील जाहीर सभा घेतली होती. याचसभेतून अजित पवार यांनी, ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून पहिल्यांदाच भाष्य केलं. मला फक्त बदनाम करण्यासाठी सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. राज्याच्या निर्मितीपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाल्याचं अजित पवार म्हणाले.
आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली
तर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी, माझी खुली चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी त्या फाईलवर स्वाक्षरी केली. पण याबद्दल मला माहिती नव्हती. यादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा आम्ही काढून घेतला आणि सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागल्याने राज्यपालांनी त्यावर सही केली नाही. तर सरकार आल्यावर नवे मुख्यमंत्री सही करतील, असे सांगितले होते.
याप्रमाणे सरकार बदलले आणि २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्या फाईलवर सही केली. मात्र त्यांनी मला बंगल्यावर बोलवून याची माहिती दिली. आर. आर. पाटील यांनीच आपल्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगताना त्यांनी फाईलवर सही केल्याचे दाखवले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सहकार्य केलं. पण आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
रोहित पाटील यांचे प्रत्युत्तर
यानंतर रोहित पाटील यांनी, अजित पवार यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना, ते वयानं मोठे आहेत. त्यांच्या नेतृत्व आम्ही येथे काम केलं आहे. आबांच्या पश्चात त्यांचेच मार्गदर्शन मिळत होतं. पण पक्षफुटीनंतर आम्ही शरद पवार यांच्याबरोबर गेलो. आता आबा जाऊन नऊ-साडे नऊ वर्षे झालेली असताना अजित पवार यांचे वक्तव्य आलं आहे. यामुळे माझ्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांना दु:ख झाल्याचं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच आबांच्या पश्चात अजित पवार यांच्या आरोपांवर उत्तर देऊ शकत नाही. आबा प्रामाणिकपणानं, स्वच्छपणानं काम करत होते. गृहमंत्री पद ही प्रामाणिकपणानं हाताळले. पण आता त्यांच्यावर असे आरोप होत आहेत. तेही अजित दादा करत आहेत. आबा हयात असते तर त्यांनीच याबाबत उत्तर दिले असते, असेही रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.
आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला
१९९९ ते २००८ या काळात अजित पवार जलसंपदा मंत्री असताना बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पण सिंचन क्षेत्रात केवळ ०.१ टक्क्यांची सुधारणा झाल्याचे निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हेमध्ये होतं. याच आरोपावरून भाजपने रान उठवलं होतं. ज्यामुळे अजित पवार यांना तत्कालीन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.