Baramati News : बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलममेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊसशेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) प्रभावी वापराचा देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगामुळे ऊस उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, शिवाय खर्च आणि पाण्यातही सुमारे ३० टक्क्यांची बचत झाली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पहिल्या टप्प्यातील विविध वाणांच्या तीन प्लॅाटवरील ऊसतोडणी पूर्ण झाली असून, त्यातून एकरी १०४ ते १५० टनापर्यंतचे उत्पादन मिळाले आहे.
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टने मायक्रोसॅाफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रयोग राबवला. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त आणि ‘सकाळ माध्यम’ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मागच्याच वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आणि पारंपरिक शेती पद्धतीने ऊस लागवड केलेला असे दोन स्वतंत्र प्लॅाट तयार केले. त्यात ८६०३२, २६५, १०००१, १५०१२, ८००५ आणि १८१२१ या एकूण सहा प्रकारच्या ऊस वाणांची लागवड याठिकाणी करण्यात आली. त्यापैकी २६५, १५०१२ आणि ८००५ या तीन वाणांच्या उसाची तोडणी पूर्ण झाली. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आणि पारंपरिक पद्धतीच्या दोन्ही उसाची उत्पादकता, एकूण खर्च, पाण्याचा वापर याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत, हे निष्कर्ष आता या प्रयोगाची यशस्विता दाखवून देत आहेत.
‘एआय’चे ऊस उत्पादनातील निष्कर्ष
पहिल्या टप्प्यात ऊस तोडणी झालेल्या तीन वाणांपैकी २६५ या वाणाचे एकरी उत्पादन १५०.१०टन, १५०१२ या वाणाचे १२०.४० टन आणि ८०००५ या वाणाचे १०४.७८ टन उत्पादन मिळाले, सध्याच्या या वाणांच्या उत्पादकतेचा विचार करता, ही उत्पादकता वाढ जवळपास ४० टक्क्यांहून अधिक आहे. त्याशिवाय ‘एआय’ तंत्राच्या वापरातून २६५ या उसाची उंची २४.१ फूट आणि वजन प्रतिऊस ४.५६ किलोपर्यंत मिळाले.
जे की, पारंपरिक पद्धतीच्या ऊसात या वाणाची उंची १८.६ एवढी राहिली, तर वजन २.५ फुटापर्यंत मिळाले. तसेच याच वाणाच्या उसातील साखरेच्या ब्रिक्सचे प्रमाण २१.१ इतके राहिले. जे की पारंपरिक पद्धतीत ब्रिक्सचे प्रमाण २०.७९ इतके मिळाले.
'‘एआय’च्या वापरामुळे नेमकी आणि गरजेएवढीच खते मिळाल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्बही टिकून राहिला. ‘एआय’च्या प्लॅाटमधील सेंद्रिय कर्ब १.० टक्के मिळाला, तर पारंपरिक लागवडीच्या क्षेत्रात तो ०.६८ टक्के एवढाच राहिला. तर खर्चही ३० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित तीन प्लॅाटवरील ऊसतोडणी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर त्याचेही निष्कर्ष हाती येणार आहेत.
एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग
शेतीमध्ये तसेच ऊस शेतीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान तसेच विविध संशोधन समोर आले असतानाही आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात, शेतीतील परिपूर्ण माहितीच्या अभावामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादनदेखील घटते. पण आता ‘एआय’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयोगाने शेतकऱ्यांना उत्पादनातील शाश्वतता वाढली आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आज १००० शेतकऱ्यांच्या ऊसशेतीत या तंत्राचा वापर सुरू केला आहे. आता पुढे जाऊन शेतकरी गट किंवा गावांनाही सामूहिक पद्धतीने हा प्रयोग राबवता येऊ शकतो.
‘एआय’ नेमके करते तरी काय?
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) माध्यमातून वेदर स्टेशनच्या सेन्सरद्वारे आणि सॅटेलाईट मॅपद्वारे शेतीतील पिकांचे मॅानिटरिंग केले जाते. आपल्या शेतीमधील माती, जमिनीची, खतांची माहिती, वातावरण बदलाची माहिती आणि उसाला नेमकी गरज काय आहे, याची नेमकी माहिती त्यातून मिळते. या वेदरस्टेशनमध्ये जवळपास १२ प्रकारचे पॅरामीटर्स आहेत, त्यात झाडाच्या मुळाजवळ ७ इंचावर प्रायमरी सॅाईल मॉइश्चर आणि सेकंड सॉईल मॅाइश्चर असे दोन सेन्सर बसवले आहेत, ते हे सर्व कार्य करतात. त्यातूनच मग जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते.
तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण पिकाचे सॅटेलाइटद्वारे मॉनिटरिंग केले जाते आणि त्याबाबतचे अलर्टही सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अॅपवर मिळतात. त्यामुळे संबंधित क्षेत्रात उसाची वाढ कोणत्याप्रकारे आणि कशी झाली आहे, त्याचे प्रमाण त्यात दाखवले जाते. शिवाय कीडरोगाचा झालेला प्रादुर्भाव किंवा होऊ शकणारा याचीही माहिती मिळते.
पाणी कुठे कमी-जास्त झाले आहे, अन्नद्रव्याचे शोषण झाले का, ते कितीप्रमाणात झाले आणि उसाला कोणत्या भागात ताण पडला आहे, त्याचेही मॅपिंग या सॅटेलाईटद्वारे होते. याप्रमाणे लागवडीपासून काढणीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन एआय तंत्राद्वारे अगदी सहजगत्या मिळते. अर्थात, त्यातून पाण्याची, खताची, वेळेची बचत होतेच, पण ऊत्पादकता वाढताना पैशांचीही बचत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.